आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अभिनेत्रीचा दी एंड!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री जिया खानने केलेल्या आत्महत्येने संपूर्ण सिनेजगत ढवळून निघाले. कारणही तसेच आहे. जेमतेम 25 वर्षांची जिया एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून नावारूपास येत होती. याशिवाय बॉलीवूडमध्ये जम बसवायला लागणारे रूप, बोल्डनेसही तिच्याजवळ होते, तरीही तिला आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलावे लागले! जियाच्या मृत्यूमागे नेमके काय कारण असावे, यावर वावड्या उठत आहेत. अर्थात, पोलिस चौकशीत सत्य काय ते बाहेर येईलच; परंतु या आत्महत्येने सिनेजगताच्या लखलखत्या दुनियेची काळी बाजू पुन्हा एकदा दिसून आली हे मात्र नक्की.
जीवनात हताश आणि निराश होऊन आत्महत्या करणारी जिया पहिलीच अभिनेत्री नाही. यापूर्वीही काही अभिनेत्री व मॉडेल्सने स्पर्धांमध्ये टिकाव न धरू शकल्याने आत्महत्येचा मार्ग निवडला होता. जियाचे मृत्यूचे नेमके कारण अजून कळले नसले तरी मनासारखे काम न मिळाल्याने ती अत्यंत दु:खी व निराश होती, असे ऐकिवात आहे. अभिनयसंपन्न असलेल्या जियाला शोभेची बाहुली व्हायचे नव्हते; परंतु तिच्या अभिनय क्षमतेला वाव देणारा रोल तिला मिळत नव्हता. मागणी होती तिच्या सौंदर्याची. याचसोबत चित्रपटसृष्टीतील सूरज पांचोली या उदयोन्मुख नटासोबतच्या प्रेमात आलेले अपयश ती सहन करू शकली नाही. या सगळ्या प्रकाराने ती काही दिवसांपासून खूप तणावात असल्याचे बोलले जाते. कारण काहीही असो, परंतु नकार पचवण्याची तयारी नसल्यानेच एवढी टोकाची भूमिका जियाने घेतली, हे मात्र निश्चित.
जीवनात टाकलेले प्रत्येक पाऊल यशाकडेच जाईल असे नाही. यश, अपयश या जीवनाच्या पायर्‍याआहेत. याबाबतीत अनेक उदाहरणे देता येतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांची उदाहरणे अगदी ताजी आहेत. अमिताभ बच्चन यांना आज चित्रपटसृष्टीचा बेताज बादशहा म्हटले जाते. पण याच अमिताभला एके काळी याच चित्रपटसृष्टीने पूर्णत: डावलले होते. त्या वेळेस अमिताभ खचले असते तर महानायक कधीही झाले नसते. एवढेच नव्हे, तर मिळालेले भरघोस यश त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिले नाही. आज एक महान नायक असूनही त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात कुठेही अतिरेकीपणा किंवा घमेंड दिसून येत नाही. याउलट राजेश खन्ना यांचे झाले. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना त्यांच्याजवळ अनेक तोंडपूजे लोक जमा झाले होते, असे बोलले जाते. आपल्या स्वार्थासाठी कुणालाही हरभर्‍याच्या झाडावर चढवणारे आप्त व मित्रमंडळ परिस्थितीनुसार रंग बदलतात. राजेश खन्ना यांच्या पडत्या काळात त्यांना साथ देणारे लोक बोटावर मोजण्याएवढेच होते. तेही त्यांच्या स्वभावाने दूर झाले. आलेले अपयश सहन न करू शकल्याने राजेश खन्ना त्यांचा शेवटचा काळ अत्यंत एकाकी जगले. हे झाले कामाबद्दल. फिल्म इंडस्ट्रीत प्रेमभंग झालेले नट-नट्या काही कमी नाहीत. देवानंद-सुरैया, दिलीप कुमार-मधुबाला, राज कपूर-नर्गिस, प्र. के. अत्रे-वनमाला यांसारख्या किती तरी जोड्यांचे प्रेम अयशस्वी झाले; परंतु अपवाद वगळता आत्महत्येसारखा पर्याय फारच क्वचित निवडला गेला.
आजचे युग स्पर्धेचे आहे. या स्पर्धांमध्ये जो तरला तो चालला आणि जो थांबला तो संपला. डोळ्यासमोर अनेकानेक उदाहरणे असताना त्यातून जियाने काहीच बोध घेऊ नये याचे वैषम्य वाटते. फिल्म इंडस्ट्रीचे दुसरे नाव मायानगरी आहे. नावाप्रमाणेच येथे पदोपदी मायाजाल पसरले आहे. कोणताही गॉडफादर नसतानाही जियाला अमिताभ बच्चन व आमिर खान यांच्यासारख्या महान कलाकारांसोबत ‘नि:शब्द’, ‘गझनी’ हे दोन हिट चित्रपट मिळाले, हेही काही कमी नव्हते. तिला मिळालेला तिसरा चित्रपट अक्षय कुमारबरोबर होता. त्यानंतर तिला अपेक्षेनुसार रोल मिळाले नसतीलही; पण तिचे वय पाहता तिने थोडासा वेळ द्यायला हवा होता. गर्भश्रीमंत असलेली जिया मॉडेल व अभिनेत्री असण्यासोबतच एक ट्रेंड सिंगर आणि डान्सरही होती. करिअर करण्यासाठी तिला अनेक क्षेत्रे मोकळी होती. अर्थात, आत्महत्या हा पर्याय निवडला त्या अर्थी जियाचे मनोबल निश्चितच खूप खचले असले पाहिजे. तिच्या आईने तसे बोलूनही दाखवले आहे. पण मग तिच्या जवळची एकही व्यक्ती अशी नव्हती, जी तिला मानसिक आधार देऊ शकेल? तिच्या मनातील नकारात्मक विचारांना योग्य दिशा देऊ शकेल?
घरातील, समाजातील व्यक्तींनी आपली जबाबदारी ओळखून मानसिक स्थिती ढळलेल्या व्यक्तीला वेळेवर आधार द्यायला हवा, योग्य ते उपचार दिले पाहिजे. अन्यथा स्वत:चा ‘दी एंड’ करणार्‍या अनेक जिया खान वृत्तपत्रात रोजच जागा व्यापून घेतील.
स्मशानभूमीतील अन्नावर जगूनही एखाद्या फिनिक्स पक्ष्यासारखी भरारी घेणार्‍या व समाजाला दिशा देणार्‍यासिंधुताई सपकाळ यांच्याकडून लहानसहान गोष्टींवरून निराश होणार्‍यालोकांनी प्रेरणा घ्यायला हवी.