आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो जीता वही...! ( अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनिसच्या दुनियेतील सर्वात मानाचा असा विम्बल्डन चषकाचा किताब तब्बल सातव्यांदा पटकावून स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने इतिहास घडवला. त्याच्या तळपत्या रॅकेटने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या अँडी मरेला तीन तास 24 मिनिटांत चीतपट केले. वास्तविक, तब्बल 74 वर्षांनंतर विम्बल्डनच्या अंतिम फेरीपर्यंत धडकलेला अँडी हा इंग्लंडचा पहिला खेळाडू होता. फेडररच्या तुलनेत अगदीच नवख्या असलेल्या अँडीने एवढी चिवट झुंज दिली, की त्याने जेव्हा पहिला सेट जिंकला तेव्हा कदाचित फेडररलाही धक्का बसला असेल! दुसºया सेटमध्येही अँडी आक्रमक होता, पण पुढे फेडररच्या अनुभवापुढे त्याचा उत्साह आणि कौशल्य कमी पडले. ‘जो जीता वही सिकंदर’ या न्यायाने फेडरर सिकंदर ठरला. वास्तविक, दोन्ही प्रतिस्पर्ध्यांच्या ‘सर्व्हिस’ बंदुकीच्या गोळीच्या वेगाने एकमेकांचा वेध घेत होत्या. चपळतेच्या बाबतीतही हे तोलामोलाचे खेळाडू होते, पण सर्व्हिसप्रमाणेच ‘बॅकहॅण्ड’ आणि व्हॉलीमध्ये मजबूत असलेल्या फेडररने अखेर बाजी मारली. सातव्यांदा विम्बल्डन एकेरी जिंकणारा फेडरर हा तसा तिसरा खेळाडू. अमेरिकेचा पीट सॅम्प्रॅस आणि इंग्लंडचा विल्यम्स रेनशॉ यांनी ही स्पर्धा सात वेळा जिंकली होती, पण फेडरर 17 व्या वेळी ग्रँडस्लॅम यश मिळवून टेनिसचा बादशहा ठरला आहे. फेडररने आतापर्यंत तब्बल 75 वेळा आंतरराष्टीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने 847 सामने जिंकले, तर 192 सामने त्याला गमवावे लागले. विम्बल्डन स्पर्धा त्याने यापूर्वी 2003 ते 2007 आणि पुन्हा 2009 मध्ये जिंकली होती. फेब्रुवारी 2004 ते आॅगस्ट 2008 असे तब्बल 237 आठवडे तो अजिंक्य ठरला होता. आॅस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि यूएस ओपन या टेनिसच्या चार प्रमुख स्पर्धा म्हणजे ‘ग्रँड स्लॅम’. या स्पर्धांमध्ये फेडरर 24 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आणि 17 वेळा अजिंक्य ठरला आहे. विम्बल्डनच्या अंतिम फेरीपर्यंत 8 वेळा पोहोचणारा तो एकमेव पुरुष खेळाडू ठरला आहे. या यशामुळेच त्याला ऐतिहासिक कामगिरी बजावणारा जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू मानले जाते. टेनिसने फेडररला सुबत्ता जरूर मिळवून दिली, पण तो आत्मकेंद्रित राहिला नाही. अनेक क्षेत्रांना मदत करण्याचा त्याचा छंद आहे. त्याने 2003 मध्ये ‘रॉजर फेडरर फाउंडेशन’ स्थापन करून उपेक्षितांची मदत आणि क्रीडा प्रसाराचे काम सुरू केले. 2005 मध्ये आलेल्या कतरिना वादळात उद्ध्वस्त झालेल्या संसारांना त्याने हातभार लावला आणि 2004 मध्ये आलेल्या सुनामीतही मदत केली. या काळात तो तामिळनाडूतही येऊन मदत देऊन गेला. अशा या जिंदादिल खेळाडूने पुन्हा एकदा विम्बल्डन चषक पटकावल्यामुळे जगभरातील त्याचे आणि टेनिसचे चाहते रोमांचित झाले आहेत. फेडररसारखीच घोडदौड करत असलेल्या अमेरिकन विल्यम्स भगिनी ग्रँड स्लॅम स्पर्धा गाजवत आहेत. फेडररच्याच वयाच्या (31) सेरेनाने यंदाचे विम्बल्डन जिंकून पाचव्यांदा एकेरीचा किताब पटकावला आहे. तिने एकूण 14 वेळा ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. या वेळी विम्बल्डन दुहेरी चषकही तिने बहीण व्हीनसच्या साथीने पटकावला आणि ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. टेनिसचा सळसळता उत्साह जगभरात संचारलेला असताना भारतात मात्र वेगळेच वातावरण आहे. आॅलिम्पिकमध्ये कोणी खेळावे आणि कोणाच्या साथीने खेळावे, यावरच काथ्याकूट चालला आहे. एकाचे दुसºयाशी पटत नाही, तर दुसºयाला तिसºयासोबत खेळायचे नाही, असे त्रांगडे होऊन बसले आहे. वास्तविक, इंग्लंडमध्ये जेव्हा या खेळाला सुरुवात झाली, त्याच वेळी, इंग्रजांच्याच मार्फत तो भारतात आला. लंडनच्या विम्बल्डनमधील आॅल इंग्लंड क्लबमध्ये 1877 मध्ये विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात झाली आणि त्या वेळी तो लॉनवर (हिरवळ) खेळला जायचा म्हणून त्याला ‘लॉन टेनिस’ नाव पडले. पुढे 1880 मध्ये इंग्रज लष्करी अधिकाºयांनी हा खेळ भारतात खेळण्यास सुरुवात केली. 1885 मध्ये लाहोरमध्ये ‘पंजाब लॉन टेनिस चॅम्पियनशिप’ सुरू झाली. त्यामुळे भारतातही या खेळाला तेवढाच इतिहास आहे; पण देशात आजही हा खेळ रांगतोच आहे. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, स्वित्झर्लंड, रशिया या देशांचेच त्याच्यावर वर्चस्व आहे. विम्बल्डनमध्ये 1905 पासून भारतीय खेळाडू नशीब अजमावत आहेत. त्या वर्षी बी. के. नेहरू, त्यानंतर 1908 मध्ये सरदार निहाल सिंग, मो. सलीम फैजी बंधू, जगत मोहनलाल, रामनाथन कृष्णन, जे. मुखर्जी, विजय आणि आनंद अमृतराज यांनीही विम्बल्डनमध्ये धडक मारली. म्हणूनच भारतात टेनिसचा प्रचार आणि प्रसार झाला, पण सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे महानगरांच्या बाहेर तो अजूनही पडू शकलेला नाही. विम्बल्डन किंवा इतर ग्रँड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद भारताच्या वाट्याला येऊ शकलेले नसले तरी ताज्या दमाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी हा इतिहासच कारणीभूत आहे. त्यामुळे फुटबॉलच्या बाबतीत भारताची जी फरपट झाली, ती टेनिसच्या बाबतीत झालेली नाही. 1999 मध्ये लिएंडर पेस आणि महेश भूपती या जोडीने विम्बल्डनमध्ये दुहेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. या जोडीने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्याचाही विक्रम केला. त्या वर्षी ही जोडी जगातील सर्वोत्कृष्ट ठरली होती. अर्थात, क्रिकेटचा बोलबाला देशात एवढा आहे की इतर खेळांकडे सहसा कोणाचे फारसे लक्ष जात नाही. त्यामुळे या खेळाचे यश त्याच्या विश्वापुरतेच मर्यादित राहते. विम्बल्डन किंवा यूएस ओपनमध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकावे यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. फेडरर किंवा सेरेनासारखे यश लगेच मिळणार नाही, पण त्या दिशेने प्रयत्न करायला काय हरकत आहे !
संकटांवरच्या चर्चेचा फार्स (अग्रलेख)
पंतप्रधानांची पंचसूत्रे (अग्रलेख)
मोदींची मिजास, केशुभाईंचे बंड! (अग्रलेख)
देवालाच आव्हान! (अग्रलेख)
वसा आणि वारसा (अग्रलेख)
युरो कपचा थरार! (अग्रलेख)
चलाख राजकारणी (अग्रलेख)
सौजन्याची ऐशीतैशी (अग्रलेख)
अर्थकारणाचे सारथ्य (अग्रलेख)
टंचाईच्या झळा (अग्रलेख)