आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृतीशील पत्रकारितेचा आदर्श

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रजागरण आणि समाजसेवेचे महान कार्य जागृत अंत:करण असणा-या व्यक्तींचे कार्यक्षेत्र आहे. प्रचलित कार्यक्षेत्रापलिकडे ज्यांचे मन विचार करू शकते अशाच व्यक्ती समाजहित, राष्ट्रीय चेतना, जनक्रांती करू शकतात. सुधाकरराव डोईफोडे यांच्या जीवनातील घडामोडी व कार्याचा लोलक स्वार्थाच्या सीमेपलिकडचा होता. त्यांचे वडील विनायकराव काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते होते. शंकरराव बोधनकर, भगवानराव गांजवे, गोपाळशास्त्री देव इत्यादींकडून त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळाले.
सुधाकररावांचा जन्म 11 सप्टेंबर 1937 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण होळीवरील प्रतिभा निकेतन विद्यालयात झाले. पीपल्स महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुण्यातून एल. एल. बी. ची पदवी संपादन केली. वकिली करण्याच्या उद्देशाने त्यांनी न्यायालयात पाऊल ठेवले पण तेथील परिस्थिती पाहून वकिलीत त्यांचे मन रमले नाही. ते शेतीकडे वळले. शेतीमध्येही त्यांचे मन रमले नाही. मूळ पिंडच कार्यकर्त्याचा असल्याने वयाच्या 11 व्या वर्षीच ते राष्ट्रसेवेशी जोडले गेले. तो काळ रझाकारांच्या जुलूमशाहीचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडा मात्र निजामाच्या जुलमी राजवटीखाली होता. त्या राजवटीविरूद्ध सुरू असलेल्या हैदराबाद मुक्तिसंग्रामात सुधाकररावांनी सक्रिय सहभाग घेतला. वयाच्या 11 व्या वर्षीच मनाई आदेश झुगारून ते निझामाविरूद्धच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांना अटकही झाली होती.
काळाचे चक्र वेगाने फिरत होते. शिक्षण सुरू असतानाच 1962 मध्ये अजिंठा तालुक्यातील प्रसिद्ध शेतकरी दत्तोपंत महाजन यांची कन्या मालतीबाईंशी त्यांचा विवाह झाला. सुधाकररावांच्या कार्यात मालतीबाईंनी साथ दिली, म्हणूनच लोकविकासाचे लढे ते लढू शकले. 1956 मध्ये ते ‘लोकसत्ता’चे नांदेडचे पहिले प्रतिनिधी बनले. नवशक्ती, लोकमित्र आणि मराठवाडा या दैनिकांचेही त्यांनी प्रतिनिधित्व केले. प्रशासकीय, राजकीय अशा सर्वच स्तरांवर अनुशासनहिनता वाढीस लागली होती. त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. जनजागृतीचे अभियान चालवण्याची प्रेरणा त्यांच्या मनात जागी झाली. त्यामुळे त्यांनी त्यांचे समविचारी मित्र रामेश्वर बियाणी यांना सोबत घेऊन 1 जून 1969 रोजी नांदेडमधून ‘प्रजावाणी’ नियतकालिकाचा पाया घातला. सुरूवातीला साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक आणि नंतर दैनिकाच्या स्वरूपात त्यांनी प्रजावाणीला विश्वासार्हता प्राप्त करून दिली. प्रजावाणीमधून मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या सुधाकररावांची कार्यशैली सर्वांना सोबत घेऊन जाणारी होती.
प्रजावाणीतून त्यांची लेखणी तळपत होती. त्यांच्या अभ्यासपूर्ण अग्रलेखासाठी त्यांना तीन वेळा डहाणूकर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या अग्रलेखाचे संकलन ‘शब्दबाण’ या पुस्तक रुपाने प्रकाशित करण्यात आले आहे. मराठवाड्यातील रेल्वे रुंदीकरण हा सुधाकररावांच्या जिव्हाळ्याचा विषय. बांगलादेशात ब्रॉडगेज रेल्वे लाइन सुरू झाली तेव्हाच मनमाड- नांदेड हा रेल्वे मार्गही ब्रॉडगेज करवून घेण्याचा त्यांनी निश्चय केला होता. या मागणीसाठी प्रजावाणीतून मोर्चेबांधणी करून त्यांनी जनआंदोलन पेटवले. रेल्वे विभाग मीटरगेज रेल्वे मार्ग काढून ब्रॉडगेज रेल्वे मार्ग देणे शक्य नाही, असे सांगत त्यांच्या त्या काळच्या काही सहका-यांनी त्यांचे हे आंदोलन थांबवण्याचाही प्रयत्न केला मात्र सुधाकरराव मागे हटले नाहीत. रेल्वे आंदोलनात त्यांनी रस्त्यावर व रूळावर उतरून हा प्रश्न तडीस लावला. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळेच दक्षिण मध्य रेल्वेला मराठवाड्यात ब्रॉडगेज लोहमार्ग टाकणे भाग पडले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन , भूमीमूक्ती आंदोलन, कच्छ बचाव आंदोलन आणि मराठवाडा विकास आंदोलन आदि आंदोलनातूनही सुधाकरराव सक्रिय होते. सुधाकररावांचे भाषेवरही प्रचंड प्रेम होते. ते मराठी व्यतिरिक्त उर्दू, गुजराथी, पंजाबी आणि राजस्थानीही चांगल्या प्रकारे लिहू आणि बोलत असत. उदात्त चरित्र, सखोल चिंतन आणि समाजसेवा हा अनुबंध सुधाकररावांनी पूर्ण केला. सुधाकररावांनी त्यांचे सबंध आयुष्य समाजहित आणि कल्याणासाठी वाहिलेले होते. स्वभावत:च समाजवादी असलेल्या सुधाकररावांनी नेहमीच व्यापक अर्थाने जनतेचे लढे लढवले आणि ते यशस्वीही करून दाखवले.