पहाटेचे चार वाजत आहेत. न्याय मिळाला न्याय मिळाला, असा प्रतिध्वनी सगळीकडे ऐकू येत आहे. पण, रात्रभर एका दहशतवाद्यासाठी एवढी उठाठेव, अस्वस्थता का ? ज्याने की आपल्या कुटुंबियांच्या मदतीने बॉम्ब घडवून शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला त्याच्यासाठी ही तळमळ? ज्या ठिकाणीहून निरागस शाळकरी मुलांची बस जाते त्याच रस्त्यावर बॉम्ब पेरण्याचे काम या क्रुरक्रम्याने केले होते. त्याने केलेल्या दुष्मकर्माचा केवळ सेंचुरी बाजारापुरताच विचार केला तर आजही थरकाप उडतो. संवेदशनशील मन अधिकच संवेदनशील होते. याच ठिकाणी 113 चिमुकले, महिला आणि आजारी व्यक्ती मारल्या गेल्या होत्या. बाकी इतर ठिकाणची अवस्था वेगळीच. याकूब आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कट रचून, या रस्त्याने कोण येतेय, कोण जातेय याचा अभ्यास केला नि आरडीक्स ठेवले होते, ते यासाठीच की जास्तीत जास्त निर्दोष व्यक्ती मारल्या जाव्यात. मान्य की सर्वच कायदे हे न्याय देण्यासाठी आहेत. पण, हेही तितेकच खरे की न्यायावर पहिला अधिकार हा पीडित व्यक्तींचाच असतो; तर मग बॉम्बस्फोटातील व्यक्तींच्या आक्रोशाला, त्यांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी फोडलेल्या टाहोला दुर्लक्षित करून रात्र-रात्रभर आपण कोणत्या न्यायावर चर्चा केली, याचा विचार व्हायलाच हवा. या 22 वर्षांत काय काय झाले ते कोणीच काही सांगितले नाही. पण, आता अचानक यावरून राजकारण केले जात आहे. सर्वच कायदे हे न्यायासाठी बनलेले आहेत. मात्र, उच्च न्यायालयात याचिकेवर याचिका, राष्ट्रपती नंतर राज्यपालांकडे दयेचा अर्ज एका दहशतवाद्याला वाचवण्यासाठी अशी काय काय उठाठेव केली गेली. मात्र, अशीच तळमळ बॉम्ब हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या परिवारासाठी कुणी केली का? 257 खुनांची शिक्षा माफ होऊ शकेल का?
दया दाखवणारे दाखवतील, पण सगळा देश क्षमा करणार नाही. तेव्हा देश रक्तात न्हाला होता; आता रक्त खवळते.