आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलियुगाचे रामायण(अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ग. दि. माडगूळकर हयात असते तर त्यांनी नव्याने ‘गीतरामायण’ लिहायला घेतले असते. गीत रामायणात ‘कुश-लव रामायण गाती’ अशी वर्णनयुक्त सांगीतिक पंक्ती आहे. आता गदिमांना लिहावे लागले असते : ‘प्रवीण-अशोक रामायण सांगती’! कविता व गाण्याच्या मात्रांमध्ये ही ओळ तशी चपखलपणे बसली नसती. किंवा ‘विहिंप-साधू रामायण लिहिती’ अशी ओळ मीटरमध्ये बसू शकेल. आणि नाही बसली तर सुधीर फडकेंनी (आता श्रीधर फडकेंनी) बसवली असती. मराठी गीतांमध्ये काहीही बसवता येते, हे सर्व गीतकार-संगीत दिग्दर्शकांना माहीत आहे. त्यामुळे ‘संघ परिवार राममंदिर बांधती’ येथपासून ते ‘मोदी-शहा रामनाम जपती’ किंवा ‘समाजवादी रावण रामरथ अडविती’ अशा अनेक पद्धतींनी नव-रामायण लिहिता येऊ शकेल. नरेंद्र मोदींच्या राज्याभिषेकाला कलियुगातील दशरथाने ऊर्फ अडवाणींनी विरोध केला तो आधुनिक कैकयी ऊर्फ सुषमा स्वराज यांच्या दुराग्रहामुळे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वोच्च मंडळ पूर्णत: पुरुषप्रधान आहे. स्त्रियांना त्या मंडळात प्रवेश नाही. त्यामुळे नरेंद्राच्या राज्याभिषेकाचा निर्णय कोणत्याही आधुनिक कौसल्या, सुमित्रेच्या हाती नाही. या नव-रामायणाचे वाल्मीकी नागपूरस्थित मोहन भागवत आहेत आणि त्यांच्या मते, संपूर्ण रामायणाची पुनर्मांडणी करायची वेळ आली आहे. ‘संभवामि युगे युगे’च्या चालीवर आणि तेजस्वी हिंदू परंपरेनुसार भारतवर्षाला कलियुगाच्या भीषण खाईतून बाहेर काढण्यासाठी नरेंद्रावतार झाला आहे. फक्त आठ महिन्यांनी भारतवर्ष काँग्रेसमुक्त म्हणजे कलियुगमुक्त होईल. हा काळ नव-राज्याभिषेकाच्या नेपथ्यरचनेसाठी आवश्यक आहे. रावणाच्या काळात व कारकीर्दीत ‘अँटी डिफेक्शन लॉ’ नव्हता. त्यामुळे रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण ‘डिफेक्शन’ करून रामाच्या पार्टीत सामील झाला.

गीतरामायणातील रामराज्यात सेन्सॉरशिप नव्हती. त्यामुळे तत्कालीन परीटरूपी शोधपत्रकाराने थेट सीतेच्या चारित्र्याबद्दलच संशय व्यक्त केला. मर्यादापुरुषोत्तम रामानेही (परीटरूपी) तत्कालीन सोशल मीडियाच्या बदनामी मोहिमेला दाद-प्रतिसाद देऊन पत्नीचा त्याग (व नंतर अग्निपरीक्षा) केला. लव-कुशांचा जन्म आश्रमात झाला आणि म्हणून स्वत:च्या पित्यालाही न ओळखल्यामुळे त्यांनी थेट रामालाच आव्हान दिले - आणि रामायण सुनावले! जर त्या काळातील सोशल मीडिया असा सक्रिय नसता, तर सीतेवर अशी परिस्थिती ओढवली नसती आणि रामालाही आपल्याच मुलांसमोर अवहेलना पत्करावी लागली नसती. वाल्मीकी रामायणातील अशा चुका वा उणिवा आजच्या नव-रामायणात राहू नयेत, असा सरसंघचालकप्रणीत रामायणाचा प्रयत्न आहे; परंतु त्या महाकाव्यातील पात्रे स्वत:च्या इच्छेनुसार वागू लागली तर? मग वाल्मीकी काय करू शकले असते वा आता मोहनराव काय करू शकतील? संशोधक-तज्ज्ञ मंडळी म्हणतात, एकूण दोनशेवर रामायणे उपलब्ध आहेत. (त्यांचे प्रदर्शनही परिसंवादासहित दिल्लीत आयोजले गेले होते; पण एकच अस्सल रामायण आहे वा असले पाहिजे, या भूमिकेतून त्यावर बंधने टाकली गेली.) काही रामायणांमध्ये परिटाला म्हणजे तत्कालीन सोशल मीडियाला काहीच रोल नाही. त्यामुळे कथानकच बदलते. यावरून मीडिया व सोशल मीडिया हा वाल्मीकी किंवा आता मोहन भागवत यांच्यापेक्षाही ‘पॉवरबाज’ आहे, हे सिद्ध होते. म्हणूनच नरेंद्राच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली असताना आकस्मिकपणे प्रवीणचंद्र तोगडिया अवतरले. त्यांच्याबरोबर अशोक सिंघल आणि एकूणच विश्व हिंदू परिषदेची साधू-संतांची फौज अवतरली.

अयोध्या चळवळीची सूत्रे मोदींनी अमित शहांकडे सोपवली होती. (काही जण म्हणतात की, अमित शहा खरे म्हणजे रावणाच्या पार्टीत असायला हवेत; पण तो प्रश्न अमित शहांचा आहे. बिभीषणाला जर रामाच्या पार्टीत यायला परवानगी आहे, तर अमित शहाने का येऊ नये?) नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रवीणचंद्र तोगडिया आहेत, हे सर्वांना विदित आहे. संघ परिवाराच्या अंतर्गत चालू असलेल्या साठमारीत मोदींनी तोगडियांना तडीपार केले होते. आता तोगडियांनी त्याचा वचपा काढण्याचे ठरवलेले दिसते. त्यांनी व अशोक सिंघल यांनी म्हटले आहे की, साधू-संतांचे निर्णय पूर्णत: त्यांचीच समिती घेते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा भाजप यांचे त्यांच्यावर नियंत्रण नाही. त्यामुळे या अयोध्या मोहिमेचा पक्षीय राजकारणाशी काहीही संबंध नाही; पण काहींना वाटते की, साधू-संतांची ही चाल म्हणजे निवडणुकीची पूर्वतयारी आहे. अमित शहांची नेमणूक उत्तर प्रदेशचे भाजपचे प्रभारी म्हणून झाल्याझाल्याच त्यांनी राममंदिर बांधण्याला भाजप प्राधान्य देईल, असे म्हटले होते. मोदींनी मात्र त्यांची साधू-संतांबरोबरची एक बैठक रद्द केली होती. ‘डेव्हलपमेंट अँड गव्हर्नन्स’ - विकास आणि स्वच्छ कारभार हाच आपला अजेंडा आहे, असे मोदींनी जाहीर केले आहे.

संघ जरी एकचालकानुवर्ती असला (म्हणजे त्यांच्या संघटनेत अजिबात लोकशाही नसली) तरी वास्तवात त्यांच्या परिवारात बरेच परस्परविरोधी प्रवाह-अंत:प्रवाह आहेत. त्यातील काही नरेंद्र मोदींच्या कट्टर विरोधात. त्यांच्यावर दहशत बसवायलाही सोशल मीडियाचा उपयोग होतो. दुसरा प्रवाह विकासापेक्षा धर्म-परंपरा श्रेष्ठ मानणारा. या प्रवाहाची मुखंड संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषद. तिसरा प्रवाह ‘उजव्या’ अर्थकारणाचा, तर चौथा (गोविंदाचार्य प्रभृतींचा) प्रवाह संघातील ‘डावा’! एक प्रवाह एनडीए समर्थ करणा-यांचा, तर दुसरा एनडीएला टांग मारून पुढे मुसंडी मारणा-यांचा! या सर्व धांदलीत प्रत्येक गट स्वत:चे वर्चस्व/प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. म्हणूनच प्रत्येकाला स्वत:चे स्वतंत्र रामायण हवे आहे. कारण राम नसेल तर सत्तेत यायच्या स्वप्नालाही ‘राम’ म्हणावे लागेल!