आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षितिजावर नवतारे : ऐझवाल अन् मिझोरम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविधतेत एकात्मता हे भारताचे वैशिष्ट्य. म्हणून आता 
मिझोरम, मणिपूर, अरुणाचल यांना समजून घेऊया. आपले मानूया. 
जेजे लालपेरवलुआ, झोहमिंगालिना रालते, लालरिंडी रालते, रॉबर्ट लालथलामुओना आदी नावे उच्चारणे अंगवळणी पडून घेऊया. ‘हिंदी-हिंदू-हिंदुस्थान’ यांच्याबाहेरील उपरे, बोहले, भय्ये, लुंगीवाले हे सारे भारताचेच सुपुत्र मानूया... 
 
मिझोरममधील ऐझवाल फुटबॉल क्लबने, आय-लीग ऊर्फ इंडिया-लीग ही दहा व्यावसायिक संघांतील दुहेरी साखळी स्पर्धा जिंकली - ती किती नाट्यपूर्ण वातावरणात! भारतीय फुटबॉलच्या क्षितिजावर चमकू लागलेल्या या दोन नवताऱ्यांना, एेझवाल व मिझोरमला सलाम. 
कुणाच्याही खिजगणतीत नसलेल्या या संघाने बाजी मारून जावी, असा चमत्कार ब्रिटिश प्रिमीयरशिपमध्ये घडून गेला, तो जेमतेम वर्षभरापूर्वी. मँचेस्टर युनायटेड ऊर्फ एम.यू., अर्सेनाल ऊर्फ गनर्स, मँचेस्टर सिटी ऊर्फ सिटी, चेलसी ऊर्फ ब्लूज, लिव्हरपूल ऊर्फ रेड्स, टॉटनहॅम हॉटस्पर्स ऊर्फ स्पर्स, अन् वूलव्हरहॅम्पटन वाँडरर्स ऊर्फ वूल्व्स् या साऱ्या बुजुर्ग संघांना एखादा नवशिका संघ मागे सारेल, असे कुणी स्वप्नात तरी पाहिले असेल का? पण तो हिसका दिला, इतिहास घडवला होता तो लोस्टर सिटी ऊर्फ कॉक्सेस संघाने! त्याआधी आइसलँड अन् ग्रीस यांचा राष्ट्रीय संघांनी बड्या-बड्यांना चितपट केले होते, तेही आठवले का? 

असाच काही धमाका दाखवला छोट्या मिझोरमच्या ऐझवाल फुटबॉल क्लबने. ज्यांच्या पाठीशी शे-सव्वाशे वर्षांची (भारतापुरती) उज्ज्वल परंपरा आहे, असे मोहन बागान व इस्ट बंगाल यासारखे हेरिटेज क्लब-बंगळुरू फुटबॉल क्लबसारखा उदयोन्मुख बलवान संघ. ईशान्य भारताचा चेहरा म्हणून गेल्या दशकात मिरवणारा शिलाँग लाबोंज... या साऱ्यांपुढे विजयी आव्हान साकारले ऐझवालने. १८ सामन्यांच्या दुहेरी साखळीत सर्वाधिक अकरा विजय व सर्वाधिक ३७ गुण संपादले ऐझवालने. या स्पर्धेत त्यांनी स्थान मिळवले होते, ते केवळ गतशाली यंदा स्पर्धेबाहेर फेकले जाण्याची तलवार त्यांच्या डोक्यावर टांगलेली होती. तिथून शिखरावर झेप घेतली, तिला पार्श्वभूमी संघर्षाची, नाट्याची! 

अठराव्या व साखळीतील शेवटच्या फेरीतील एक सामना, ईशान्य भारतातील दोन संघांत. कुणी सांगावे, अशा परिस्थितीत पाचव्या स्थानवरील शिलाँगचा लानोंग संघ (तेव्हा २५ गुण व अखेरीस २६ गुण), शिलाँगमध्ये ईशान्य भारतातील ऐझवालशी (तेव्हा ३६ व अखेरीस ३७ गुण) मुद्दाम हरून घेईल, निदानपक्षी जिंकणार नाही! त्यामुळे त्याचवेळी चेन्नईत सुरू झालेल्या सामन्यात मोहन बागानने चेन्नई सिटीला कितीही गोलनी हरवले, तरीही ते ऐझवालपेक्षा एक गुणाने मागेच राहतील - अशी सामना सौदेबाजी, फिक्सिंग टाळण्यास अ.भा.फुटबॉल फेडरेशन किती तत्पर होती! 

फेडरेशनने भ्रष्टाचार-विरोधी (इंटिग्रिटी) अधिकारी जावेद सिरान यांना शिलाँगमध्ये खास पाठवले. सहसा ते सामन्याच्या दिवशी जात, पण या वेळी सामन्याच्या आदल्याच दिवशी, शनिवारी २९ एप्रिलला ते शिलाँगमध्ये अडकले. उभय संघांच्या बैठकीत त्यांनी सचोटीने खेळण्याचे महत्त्व समजावून सांगितले. अनेकांना शंका वाटते की, अंतिम लढत ईशान्य भारताऐवजी, कोलकातातील दोन संघांत वा इतरांच्यात असती, तर बंगाली प्रभुत्वाखालील भारतीय फेडरेशनने एवढी तत्परता दाखवली असती का? 

अशी शंका अनेकांना का वाटली? याचे एक कारण म्हणजे, ईशान्य भारतातील दोन संघांतील आपापसात संगनमत करून कोलकातातील मोहन बागानचा पत्ता काटू नये, याची फेडरेशनला केवढी काळजी! या काळजीतूनच ऐझवाल-लानोंग सामन्यासाठी त्यांनी सारेच्या सारे बंगाली पंच नेमले. पंच प्रांजल बॅनर्जी ऊर्फ बंडोपाध्याय हे बंगाली, सहायक पंच असितकुमार सरकार व सुमन मजूमदार हे दोघेही बंगालीच. आणि चौथे अधिकारी तन्मय धर हेही बंगालीच. या चौघांच्या नेमणुकीची माहिती, सामना सुरू होण्याआधी काही तास ऐझवालला दिली गेली. ऐझवालने साहजिकच त्याला आक्षेप घेतला. त्रयस्थ-तटस्थ पंच नेमण्याचा विचार का झाला नाही, हे फेडरेशनच जाणे! पण ऐझवालने सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली, पण प्रत्यक्षात समझोता केला. करंडक मैदानात जिंकण्याचा चंग बांधला व जिंकलाही! 

अठराव्या व अंतिम फेरीचे दोन सामने शिलाँगमध्ये यजमान लानाेंग वि. ऐझवाल आणि चेन्नईत यजमान चेन्नई सिटी वि. मोहन बागान हे अक्षरश: एकाच वेळी सुरू झाले तेही आंतरराष्ट्रीय संकेतांनुसार. यापैकी कोणताही एक सामना थोडा आधी लावला जाता, तर त्याच्या निकालाची कल्पना, दुसऱ्या सामन्यातील संघांना आधीच मिळून जाते. त्या निकालानुसार या सामन्यातील जयाचे वा बरोबरीचे वा किती गोल-फरकाने जिंकायचे ते लक्ष्य डोळ्यांपुढे आलेले असते. आपण मोबाइल व चॅनल्सवरून शिलाँगमध्ये लढणाऱ्यांना चेन्नईतील तसेच चेन्नईत झुंजणाऱ्यांना शिलाँगमधील ताजा-ताजा गोलफलक लगेच समजत होता. शिलाँगच्या असेर दियांदाने नवव्या मिनिटात गोल चढवला, तेव्हा त्याचे स्वागत शिलाँगपेक्षा चेन्नईत बागानच्या समर्थकांनी केले! पण ऐझवालने शिलाँगमध्ये ६७ व्या मिनिटात गोल बरोबरी केली, तेव्हा चेन्नईत बंगाली बाबू चूपचाप झाले! 

आम-लीगमधील एक नाट्य वेगळेच होते. प्रशिक्षक खलीद जमील आपल्या संघास जिंकवू शकत नाहीत, म्हणून मुंबई फुटबॉल क्लबने त्यांची हकालपट्टी गतसाल अखेरीस केली, पण काहीशा स्वस्तात ऐझवालने त्यांना करारबद्ध केले - अन् पहिल्याच फटक्यात त्यांनी ऐझवालला सिंहासनावर नेऊन बसवले! आणि गंमत म्हणा वा योगायोग (वा कलात्मक न्याय म्हणा) यंदा नवीन परदेशी प्रशिक्षकांच्या हाताखाली खेळणाऱ्या मुंबईचा क्रमांक शेवटून पहिला लागला! अठरापैकी सर्वात कमी म्हणजे केवळ दोन सामने त्यांना जिंकता आले व सर्वात कमी तेरा गुण त्यांना खात्यात जमा करता आले! 

गतसाली साखळीतील असंख्य सामन्यात त्यांनी मुंबईस विजयी केले. स्पर्धेबाहेर फेकले जाण्याचा धोका टाळला व पाचव्या जागेवर नेले. तेव्हा मुंबईचे काही अधिकारी बरळले : ‘यात काय विशेष! आय-लीगमध्ये स्थान टिकवण्यास काय खास कर्तृत्व लागते? मजा आहे करंडक जिंकवून देण्यात.’ मुंबईतील काही अधिकारी म्हणत. खलीद जमील यांच्या आवडी-निवडी काय!  त्यांचे डावपेच अतिसावध, बचावावर भर देणारे. पण हे लोक लक्षात घेत नव्हते, की मुंबई वा ऐझवाल यांचे वार्षिक आर्थिक अंदाजपत्रक बेताबाताचे. ऐझवालचे अधिकृत बजेट दोन कोटींचे (अनधिकृत बजेट असू शकेल साडेतीन कोटींचे) त्यातून बऱ्यापैकी देशी वा परदेशी खेळाडू कसे करारबद्ध करणार? साहजिकच प्रशिक्षकाला सावध पवित्रा घ्यावाच लागतो. 

ऐझवालतर्फे गेली काही वर्षे एकच एक संघ खेळत आहे. सिरियाचा महमद अल अमना व लिबेरियाचा आलफ्रेड जेरीअॅन ही मधल्या फळीतील जोडी हे त्यांचे परदेशी खेळाडू गुरू खलीदशी आपल्यासह मुंबईतून नेलेले आशुतोष मेहता व जयेश राणे अन् गोमंतकीय गोली अलवियन गोम्स हे त्रिकुट मिझोरमबाहेरचे. अशा एकवटलेल्या संघात गुरू खलीदचे गुण उभारून आले. सराव दुपारी बारापासून पण प्रशिक्षक तीन तास आधीच हजर. सराव सत्रातून सर्वात शेवटी बाहेर पडणार गुरुजीच. दारूपासून दूर राहण्याची प्रवृत्ती, कदाचित इस्लामिक धार्मिक प्रवृत्ती, इतकी दृढ की दारू कंपन्यांनी पुरस्कृत संघांतर्फे (मोठमोठ्या संघांतर्फे) खेळण्यास त्यांचा स्पष्ट नकार. सामनावीर ठरल्यावर शॅपेेनच्या बाटल्या मिळाल्या. त्या त्या त्यांनी विकल्या. त्यातून घेतलेली मिठाई झोपडपट्टीत वाटली. अशा त्यांच्याविषयीच्या ‘दंतकथा’. मिझोरमचे ऐझवाल आता देशात अव्वल. सव्वाशे कोटींच्या भारतात ११ लाख वस्तीचे मिझोरम अव्वल! आय-लीगमधील दहा संघांत मिळून ५३ फुटबॉलपटू मिझोरमचे! त्यांच्या प्रिमीयर लीगमध्ये आठ-आठ संघ. त्यापैकी अव्वल आठ संघांकडे युवा गुणवत्ता हेरणारे व जोपासणारे, १८ वर्षांखालील तरुणांचे संघ. आठपैकी सहा जिल्ह्यांत, तीन गटांत स्पर्धा मोजकी शहरी भाग सोडल्यास सर्वत्र फुटबॉल मैदानाचे जाळे. क्रिकेटवेड्या भारतात बंगाल केरळ खालोखाल, गोमंतकासह मिझोरम फुटबॉलचे बेट, फुटबॉलचे नंदनवन!
 
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार,
समीक्षक
prakaaaa@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...