आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव : एकीतील बेकी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन आठवड्यांपूर्वी मी सहा-सात दिवस भोपाळमध्ये होतो. मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. तेथे पक्षाच्या सरचिटणीसांच्या कुलदीपकाने दारूच्या नशेत एका पोलिसाला कुत्र्यासारखी मारझोड केल्याचे प्रकरण गाजत होते. आता मी बेळगाव मुक्कामी होतो. कर्नाटकातही भाजपचेच सरकार आहे. परंतु राज्यात भाजपविरोधी वारे वाहत आहे. भाजपला राज्यात नेस्तनाबूत करणे हा माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचा एककलमी कार्यक्रम आहे. परवा उत्तर कर्नाटकात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभा झाल्या. तेव्हा त्यांनी 24 तास पाणीपुरवठा, सिंचनाकरिता पाणी व तरुणांना नोकर्‍या देण्याची आश्वासने पाळली नसल्याची टीका केली. भाजपचे अनुकरण करत काँग्रेसनेही मतदारांना भुलवण्यासाठी लॅपटॉप, एक रुपयात किलोभर तांदूळ वगैरे आश्वासने दिलेली आहेत. केंद्रात सत्तेवर येण्यासाठी भाजपला किमान हातात असणारी राज्ये तरी राखावी लागतील. कारण राज्यात सत्ता असली तरी लोकसभेत अधिक खासदार निवडून आणण्यासाठी शिबंदी मिळते. परंतु कर्नाटकात केवळ काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध जनता दहा धर्मनिरपेक्ष असाच सामना नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीदेखील रिंगणात आहे.

एकीकरण समितीत मध्यंतरी बेदिली निर्माण झाली होती. त्याचा फायदा मराठीद्वेष्ट्या कर्नाटकी सत्ताधार्‍यांनाच झाला. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक समितीने एकी हेच बळचा प्रत्यय आणून दिला होता. कर्नाटकात समिती खानापूर, दक्षिण बेळगाव, उत्तर बेळगाव व बेळगाव ग्रामीण या चार ठिकाणी उमेदवार उभे करते. या वेळी या चारपैकी एका ठिकाणी मात्र समितीत वाद निर्माण झाला आहे.

बेळगाव दक्षिणमध्ये एकूण दहा उमेदवार उभे असून, त्यात भाजपतर्फे अभय पाटील रिंगणात आहेत. मराठीवाद्यांना त्रास देण्याचे त्यांचे धोरण राहिले आहे. तेथे एकीकरण समितीचे संभाजी लक्ष्मण पाटील उभे आहेत. बेळगाव ग्रामीणमध्ये समितीचे शिवाजी सुंडकर आहेत. तर रेणू किल्लेकर आणि अरविंद पाटील अनुक्रमे बेळगाव उत्तर व खानापूरमध्ये समितीतर्फे निवडणूक लढवीत आहेत.

म. ए समितीच्या तिघा अधिकृत उमेदवारांसाठी कलश हे चिन्ह मिळाले आहे. या तिघांनाही अनुकूल वातावरण आहे, असा दावा केला जातो. समिती गरीब आहे. उलट बडे पक्ष आपल्या मतदारांना दारू, पैसे वगैरे वाटप करत आहेत. दैनंदिन रोजगारावर ज्यांचे पोट अवलंबून आहे, त्यांना पगाराच्या दुप्पट रकमा दिल्या जात आहेत. इतके दिवस दुचाकीवरून गावठी दारूची वाहतूक करण्यात येत होती. आता यासाठी बेळगावात चक्क कारचा वापर केला जात आहे. दोन-चार दिवसांपूर्वी 200 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. बेकायदा दारूसाठा थोपवण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.

सगळ्यात धमाल चालली आहे ती बेळगाव ग्रामीण मतदारसंघात. तेथील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार शिवाजी सुंठकर यांच्या प्रचाराचे वाहन नुकतेच फोडण्यात आले. समितीचे नेते किरण ठाकूर व त्यांच्या सहकार्‍यांनी सुंठकरांची उमेदवारी जाहीर केली असताना मनोहर किणेकर यांनी आपली उमेदवारी परस्पर घोषित केली. आपणच अधिकृत उमेदवार असल्याचा त्यांचा दावा. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील समितीने आपल्याला निवडले असल्याचे त्यांचे म्हणणे. वास्तविक एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूरच आहेत. शिवाय ठाकूर व एन. डी. यांच्यात द्वैत निर्माण झाल्याचे चित्र तयार करण्याचे कारण नव्हते.

माजी आमदार बी. आय. पाटील हे तालुका समितीचे अध्यक्ष आहेत. समितीचे स्वयंघोषित उमेदवार किणेकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी बी. वाय. यांचे धाकटे बंधू आर. एच. पाटील यांना बोलावण्यात आले होते. या आर. आय. ने वृत्तपत्रास मुलाखती देऊन तोंडाला येईल ते आरोप केले. पैसे देऊन उमेदवारी देण्यात आली, असे वक्तव्य त्यांनी केले. समितीच्या आमदाराचा भाऊच अधिकृत उमेदवार सुंठकर यांच्याविरुद्ध आहे, हे दाखवण्यासाठी हा खेळ मांडण्यात आला.

विशेष म्हणजे सुंठकर यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी कामाला लागण्याचा सल्ला आपण आपले कनिष्ठ बंधू आरआयना दिला आहे. सुंठकरांची बदनामी करण्यासाठी आरआयचे ब्लॅकमेलिंग केले गेले होते, असे उद्गार बी. आय. पाटील यांना काढले आहेत. त्यामुळेच आरआयना किणेकरांच्या कार्यक्रमात दीपप्रज्वलन करण्यास भाग पाडले गेले. सुंठकरांची बदनामी करणारे वाक्य त्यांच्या तोंडी घालून वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याचे कारस्थान केले गेले, असा आरोप बी. आय. पाटील यांनी केला. यातही कमाल म्हणजे या निवडणुकीत वृत्तपत्रे राजकीय पक्षांचे पॅनल घेऊन सुपार्‍या घेत आहेत. तटस्थतेचा व नैतिकतेचा आव आणून सुपारीच्या रकमेवर कोणत्या व कशा मुलाखती छापायच्या ते ठरत असते.

आर. आय. यांच्या नावे एका प्रतिष्ठित बड्या वृत्तपत्रात मुलाखत आली. या बदनामीकारक वृत्ताचा निषेध करण्यासाठी सुंठकरांनी उपोषण सुरू केले, तेव्हा आर. आय. नी आपला माफीनामा सादर करून सुंठकरांना उपोषण समाप्तीची विनंती केली.

सुंठकर हे गेली 25 वर्षे म. ए. समितीच्या कार्यात सहभागी आहेत. महापौर, उपमहापौर, गटनेता आदी पदे त्यांनी भूषवली असून, आजवर त्यांच्यावर कोणतेही आरोप झाले नव्हते. ग्रामपंचायती, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, एपीएमसी यातही समितीची सत्ता राखण्यासाठी त्यांनी होऊन कामगिरी बजावलेली आहे. मात्र काही पैसेवाल्या प्रवृत्तींनी समितीत गटबाजी निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. कन्नड सक्ती, नोकर्‍यांत उपेक्षा आणि मराठी भाषकांना दुय्यम वागणूक हे प्रश्न कायम आहेत. आपसातील मतभेदांमळे सत्ता जाते हे ठाऊक असूनही बेळगाव ग्रामीणमध्ये मनोहर किणेकर आपले नाव काडेकर असल्यासारखेच वागत आहेत. किणेकरांना महाराष्ट्र बेकीकरण समितीचे अध्यक्ष समजण्यास हरकत नाही.

(hemant.desai001@gmail.com)