आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शतकोत्सवातील काव्य दिन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी जागतिक काव्य दिन साजरा केला जातो आहे, त्याचा संदर्भ आणखीनच वेगळा आहे. 1913 मध्ये अनेकानेक कलांचे संमेलन म्हणून ज्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलले गेले, त्या रवींद्रनाथ टागोरांना साहित्यातले नोबेल जाहीर झाले होते...

21 मार्च हा दिवस युनेस्कोने जाहीर केल्याप्रमाणे जगभर काव्य दिन म्हणून साजरा केला जाणारा दिवस. 1999 मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या युनेस्कोच्या तिसाव्या अधिवेशनात हा दिवस घोषित करण्यात आला. त्या तारखेला तसा काही विशेष संदर्भ होता अशातला भाग नाही; पण कविता लिहिणे, कविता वाचणे, कविता प्रकाशित करणे आणि कविता शिकवणे या सा-याच उपक्रमांना सन्मान देण्यासाठी आणि ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी युनेस्कोने या दिवसाची निवड केली. पण भारतात असा काव्य दिन पाळण्याची परंपरा मात्र कधीच नव्हती, आणि रामायणाच्याही आधी रचले गेलेले वेद अपौरुषेय मानले गेल्याने रामायणाचा रचयिता वाल्मीकी हाच भारतातील आद्यकवी म्हणून ओळखला जात होता. महाभारताचा रचयिता व्यास हा कदाचित त्यानंतरचा, कालिदास तर आणखी पुढचा. व्याधाने मारलेल्या बाणाने विव्हळ झालेल्या क्रौंच पक्ष्याला पाहून वाल्मीकींना सुचलेल्या ओळी या आपल्याकडे आद्य कविता म्हणून पाहिल्या गेल्या हे खरेच... पण त्याहीआधी केव्हातरी कुणातरी मातेला सुचलेले अंगाईगीत किंवा जात्यावर दळण दळताना तिने गायलेली ओवी हेच खरे तर आद्य काव्य म्हणून ओळखले गेले असणार. ते काव्य कोणते, त्याचा रचयिता कोण हे सारे अज्ञात, त्यामुळेच जागतिक काव्य दिन साजरा करताना त्याचा भारतीय संदर्भ शोधणे खूपच औत्सुक्याचे ठरावे.
यंदाचा 2013 चा जागतिक काव्य दिन ज्या वर्षात साजरा केला जातो आहे, त्याचा संदर्भ आणखीनच वेगळा आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी 1913 मध्ये अनेकानेक कलांचे संमेलन म्हणून ज्या व्यक्तिमत्त्वाविषयी बोलले गेले, त्या रवींद्रनाथ टागोरांना साहित्यातले नोबेल जाहीर झाले होते. त्याचे यंदा शतकोत्सवी वर्ष आणि त्या वर्षातला यंदाचा काव्यदिन. शिक्षण, वक्तृत्व, काव्यरचना, कथालेखन, कादंबरीलेखन, नाट्यलेखन, निबंधलेखन, टीकाकार, भाष्यकार, तत्त्ववेत्ता, गीतकार, चित्रकार, अभिनेता, गायक, संगीतकार, प्रवासक असे त्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू. खरे तर या सर्वच क्षेत्रांत अजोड कामगिरी केलेले एक हुन्नरी, प्रतिभावंत व्यक्तित्व हीच त्यांची ओळख. रवींद्रनाथांनी भारताचेच राष्ट्रगीत रचले असे नव्हे, तर बांगलादेशानेही राष्ट्रगीत म्हणून रवींद्रनाथांचेच गीत स्वीकारले आणि रवींद्रनाथांच्याच गीताचे सिंहली भाषेतील रूपांतर श्रीलंकेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. एकाच कवीची गीते तीन राष्ट्रांनी राष्ट्रगीते म्हणून स्वीकारल्याचे जगाच्या पाठीवरचे रवींद्रनाथ हे एकमेव उदाहरण. रवींद्रनाथ हे भारताचे पहिले नोबेल विजेते, तसेच ते संपूर्ण आशियाचेही पहिलेच नोबेल विजेते. जालियनवाला बाग हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन ब्रिटिश सरकारने दिलेला सर हा किताब भिरकावून देणारे रवींद्रनाथच. रवींद्रनाथ म्हणजे गीतांजली, रवींद्रनाथ म्हणजे जन गण मन, रवींद्रनाथ म्हणजे शांतिनिकेतन, रवींद्रनाथ म्हणजे रवींद्रसंगीत आणि रवींद्रनाथ म्हणजे आधुनिक भारताची सांस्कृतिक आणि साहित्यिक नाममुद्रा.
7 मे 1861 हा रवींद्रनाथांचा जन्मदिवस तर 7 ऑगस्ट 1941 हा रवींद्रनाथांचा मृत्युदिन. तब्बल 80 वर्षांचे आयुष्य रवींद्र्रनाथांना लाभलं. त्यांचे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत बनले, पण भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहणे त्यांच्या नशिबात नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चाललेल्या आंदोलनातील गांधीजींचे तत्कालीन मार्ग रवींद्रनाथांना अजिबातच मान्य नव्हते. बहिष्कार, परदेशी कापडाच्या होळ्या, सत्याग्रह, चरखा मोहीम हे गांधीजींचे मार्ग आत्मक्लेशाचे आहेत, असे ते मानत व म्हणत. औद्योगिक युगात तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याऐवजी चरख्यावर सूत कातत बसणे आणि वेळ, श्रम, पैसा यांचा अपव्यय करणे रवींद्रनाथांना पसंत नव्हते. पण तरीही राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधींच्या नावामागे महात्मा ही उपाधी लावली ती रवींद्रनाथांनीच. फेब्रुवारी 1940 मध्ये गांधीजी कस्तुरबांना घेऊन शांतिनिकेतनात गेले होते. रवींद्रनाथांनी आम्रकुंजात बसवून गांधीजींची स्वत:च्या हाताने पूजा केली होती. गांधीजी रवींद्रनाथांचा आशीर्वाद मागायला आले होते आणि प्रत्यक्षात रवींद्रनाथच गांधीजींची पूजा करत होते. गांधीजी त्या दिवशी आश्रमात राहिले, आश्रमभर उत्साहाने फिरले, रवींद्रनाथांचे चाण्डालिका हे नाटक त्यांनी रात्री जागून पाहिले. दुस-या दिवशी निघताना रवींद्रनाथांनी गांधीजींच्या हातात एक कागद दिला. गांधीजींनी तो गाडीत बसल्यावर वाचला, त्यात लिहिले होते, ‘माझ्या पश्चात आश्रमावर तुमची दृष्टी राहू दे..’ गांधीजी मुक्कामाच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी उत्तर पाठवले, शांतिनिकेतन हे माझेच आहे असे मी मानतो. गांधीजींचे आणि रवींद्रनाथांचे नाते असे गुंतागुंतीचे होते.
लंडनमधील ख्यातनाम चित्रकार रोदेन्स्टाइन भारतात आले असताना ठाकुरवाड्यात राहिले होते, रवींद्रनाथांची त्यांची भेट तिथे झाली होती. प्रकृती सुधारण्यासाठी परदेशी जायचा विचार रवींद्रनाथांनी केल्याचे त्यांना कळले होते. पूर्व-पश्चिमेला जवळ आणण्यासाठी काही प्रयत्न करायचे त्यांच्या मानत आहे, हेही रोदेन्स्टाइनना ठाऊक होते. लंडनला जाण्याचा प्रवास मोठ्या अवधीचा होता, त्यामुळे या प्रवासात मिळेल तो वेळ अजितकुमार चक्रवर्तींनी सुचवल्याप्रमाणे कवितांचा इंग्रजी अनुवाद करण्यासाठी वापरायचा, हे जणू काही रवींद्रनाथांनी मनोमन ठरवूनच टाकले होते. रवींद्रनाथ पॅरिसला गेले, तिथून ते लंडनला गेले आणि रोदेन्स्टाइन यांच्या घराजवळच एका घरात राहिले. उभयतांच्या भेटीगाठी होत राहिल्या आणि साहित्यात रस असलेल्या रोदेन्स्टाइन यांनी रवींद्रनाथांकडे त्यांची कवितांची वही मागितली. अक्षरश: भारावलेल्या अवस्थेतच त्या भाषांतरित कविता त्यांनी आयरिश कवी यीट्स यांना दाखवल्या. यीट्स यांनीच गीतांजलीला प्रस्तावना लिहिली, मॅकमिलन कंपनीकडून त्याच्या प्रती छापून घेतल्या. त्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले होते, ‘आम्ही पानामागून पानं लिहितो, पण एकाही पानात जीवन आनंदमय करण्याची इच्छा नसते, याउलट टागोरांनी आत्म्याचा शोध घेणाºया भारतीय संस्कृतीप्रमाणे कलानिर्मितीचा आणि तिच्या उत्स्फूर्ततेचा आत्मा शोधण्यात सुख मानले...’
गीतांजलीची ती मुद्रित प्रतच नोबेल फाउंडेशनकडे गेली आणि 13 नोव्हेंबर 1913 ला गीतांजलीला नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची तार शांतिनिकेतनात आली. त्या पुरस्कारापाठोपाठ कोलकाता विद्यापीठाने त्यांना डी.लिट. देऊ केली, लॉर्ड र्हाडिंज यांनी पोएट लॉरिएट ऑफ इंडिया हा बहुमान देऊ केला, लॉर्ड कारमायकेल यांनी सर हा किताब देऊ केला. गीतांजलीची मागणी इतकी वाढली की त्या दोन वर्षात गीतांजलीचे 19 वेळा पुनर्मुद्रण झाले.
गीतांजली हे रवींद्रनाथांचे विश्वविख्यात काव्य. पण अशा तीन हजारांहून अधिक काव्यरचनांचे त्यांचे शंभर संग्रह प्रसिद्ध झाले, सुमारे 1400 गीते त्यांनी लिहिली, पन्नासेक नाटके लिहिली, त्यांनी लिहिलेल्या कथांचे 40 संग्रह प्रसिद्ध झाले, 15 निबंधसंग्रह झाले, तीनेक हजार पेंटिंग्ज त्यांनी केली आणि रवींद्र संगीत नावाच्या एका अनोख्या ग्रामीण शैलीच्या संगीत प्रकाराला जन्म दिला. रवींद्रनाथांचे हे साहित्यविश्व मोजताही न येण्यासारखे; सूर्याची किरणे मोजता येत नाहीत, तसेच!