आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसे - देवकर यांची ‘युती’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधीपक्षनेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्याबरोबर आघाडी करण्याची तयारी दाखवून मागच्याच चर्चेला नवे आयाम दिले आहेत. प्रत्यक्षात या दोघांची आघाडी होईल ना होईल हा भाग अजून दूर आहे, पण या निमित्ताने घरकुल घोटाळा प्रकरणातील खडसे यांची भूमिका आता अधोरेखीत केली गेली तर आश्चर्य वाटायला नको.

जळगावचे आमदार (सध्या शिवसेना) सुरेश जैन यांना नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार म्हणून अटक झाली त्याला 10 जून 2013 रोजी सव्वा वर्ष पूर्ण होत आहे. सन 2006 मध्ये पोलिसांकडे दाखल झालेले हे प्रकरण 2011 मध्ये उकरून काढण्याचे काम खडसे यांनी केले आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्याला खतपाणी घातले, असा आमदार जैन सर्मथकांचा दावा आहे. आमदार जैन यांचे नाव मूळ फिर्यादित आरोपी म्हणून नसताना खडसे यांच्यामुळेच त्यांना आरोपी करून सव्वा वर्षापासून अटकेत ठेवण्यात आले असल्याचाही आरोप ही मंडळी करते. काहींना जैन यांची ही अवस्था राष्ट्रवादी कॉँग्रेसला सडविण्याची भाषा केल्यामुळे पवार काका-पुतण्याने केली, याची खात्री वाटते. कारण, काहीही असो, जैन यांच्या विरोधात खडसे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्र आली आहे, असा आरोप घरकुल घोटाळा प्रकरणाच्या तपासाला गती मिळाल्यापासून केला जातो आहे.

खरं तर गुलाबराव देवकर हेदेखील या घरकुल घोटाळ्यातील एक आरोपी आहेत. त्यामुळे त्यांना पोलिसांनी एकदा अटकही केली होती; पण ते काही तासांतच जामिनावर सुटले आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देवकर यांना जामिनावर सोडण्याचा निर्णय रद्दबातल ठरवित त्यांना ताबडतोब अटक करण्याचे निर्देश दिले होते; पण सर्वोच्च न्यायालयात त्या आदेशाला स्थगिती मिळाल्याने त्यांची कोठडी अजूनही रिकामी आहे. देवकरांना सत्ताधारी वाचवताहेत असा आरोप करीत त्यांनाही अटक झाली पाहिजे, अशी मागणी सुरेश जैन सर्मथकांनी वारंवार केली. त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात यावे, अशीही ओरड त्या काळात उच्चारवाने होत होती; पण पवारांनी त्यांना सांभाळून घेतले आहे. विधानसभेत आक्रमकता दाखविणारे, सत्ताधार्‍यांवर तुटून पडणारे विरोधीपक्षनेते खडसे घरकुल घोटाळ्यातील आरोपी असलेल्या देवकरांवरही तुटून पडतील,त्यांच्या अटकेसाठी दडपण आणतील, त्यांचा राजीनामा मागतील अशी शक्यता वाटत होती; पण खडसे यांनी तो मुद्दा लावून धरला नाही. तेव्हापासूनच खडसे आणि देवकर यांची ‘युती’ असल्याचा आरोप होत आला आहे. आता जळगाव महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खडसे यांनी देवकरांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य सुरेश जैन विरोधकांबरोबर महाआघाडी करण्याची तयारी दाखवून या जुन्या आरोपांनाच खतपाणी घातले आहे. महापालिकेतल्या सत्ताधारी गटाचे नेते पालिकेतल्याच घोटाळा प्रकरणात अटकेत असल्यामुळे ‘घरकुल घोटाळा’ प्रकरण या निवडणुकीत गाजणार आहे. खडसे यांना त्याच मुद्दय़ावर सुरेश जैन आणि त्यांच्या सर्मथकांना कोंडीत पकडायचं आहे. त्यामुळे घरकुल घोटाळ्यातले आरोपी नगरसेवक आपल्याला उमेदवार म्हणून चालणार नाहीत, अशी अटच त्यांनी महाआघाडीत सामील होण्यासाठी घातली आहे. असे असतानाही याच घोटाळ्यातले आरोपी असलेले गुलाबराव देवकर आणि त्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष त्यांना कसा चालणार आहे? हा प्रo्न आहेच. एकनाथ खडसे आणि गुलाबराव देवकर यांनी आपल्या पक्षांना या कथित महाआघाडीत समाविष्ट करण्याबाबत प्राथमिक चर्चा केली असली तरी या चर्चेला भवितव्य किती असेल, हा प्रo्नच आहे. कारण अशी आघाडी झाली तर त्या आघाडीचे नेतृत्व कोण करेल, दोन्ही प्रमुख पक्षांचे हे नेते सभांसाठी एकाच व्यासपीठावर येतील का, आले तरी घरकूल प्रकरणावर खडसे टीकेची झोड उठवतील तेव्हा देवकर काय करतील, जर देवकरांनी व्यासपीठावर यायचेच नाही असे ठरवले तर राष्ट्रवादी खडसेंच्या दावणीला बांधली गेल्याची भावना राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांमध्ये आणि उमेदवारांमध्ये निर्माण होणार नाही का, महाआघाडीतल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना देवकरांचा पैसा मिळणे आणि त्यावर ते निवडून येणे खडसे यांना चालणार आहे का, निवडणुकीनंतर या आघाडीला बहुमत मिळालेच तर महापालिका कोणाच्या आदेशाने चालेल, खडसेंच्या की देवकरांच्या? असे अनेक प्रo्न निर्माण होणार आहेत.

महाआघाडी झालीच तर आमदार सुरेश जैन यांची महापालिकेतली सद्दी संपविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे खडसे-देवकर सांगतीलही; पण केवळ तेवढच एक कारण त्यामागे नक्कीच नसेल. हे दोन्ही नेते कितीही सांगत असले तरी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची झाली तर दोघांनाही आपल्या पक्षातर्फे 75 उमेदवार देणे ही अशक्य कोटीतली बाब आहे. त्यातही 38 महिला उमेदवार द्याव्या लागणार आहेत. पुरेसे सक्षम उमेदवार मिळणार नाहीत, ही दोन्ही नेत्यांची खरी पंचाईत आहे आणि तिच्यावर पांघरूण घालण्यासाठी दोघांनाही महाआघाडीचा मार्ग सोयीचा वाटतो आहे. समजा उमेदवार उभे केलेच तर त्यांना आर्थिक मदतही करावी लागेल. त्यामुळे आपल्यावर जबाबदारी असलेल्या उमेदवारांची संख्या र्मयादित ठेवणे हेच दोघांनाही सोयीचे वाटत असणार. अर्थात, या वाटण्याला वर उपस्थित केलेल्या प्रo्नांचा अडथळा आहेच. त्यामुळे आमदार सुरेश जैन यांना कोंडीत पकडण्यासाठी एकत्र येण्याची हवा हे नेते करीत असले तरी प्रत्यक्षात तसे घडेलच, याची शाश्वतीही नाही. एक मात्र खरं, या निमित्ताने एकनाथ खडसे यांना सुरेश जैन यांच्यापेक्षा गुलाबराव देवकर परवडणारे वाटतात, यावर पुन्हा शिक्कामोर्तब झालं आहे.

deepak.patwe@dainikbhaskargroup.com