आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्रांत चाले माझी लेखणी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माझ्या लेखन निर्मितिक्षमतेकडे वळून पाहतो तेव्हा मीच विस्मयचकित होतो. माझ्या गेल्या सहा पुस्तकांच्या प्रकाशन समारंभांमध्ये प्रत्येक वेळी मी आता हे माझे अखेरचेच पुस्तक अशी घोषणा करतो. पण तसे अद्याप तरी घडताना दिसत नाही. या पुस्तक प्रकाशनांसाठी माझ्या ओळखीच्या व्हीआयपी लोकांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहावे म्हणून मी त्यांना गळ घालायचो.
त्यामध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग, अमिताभ बच्चन, जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी यासारख्या अनेक नामवंतांचा समावेश होता. या नामवंतांच्या उपस्थितीने माझ्या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाला झळाळी प्राप्त व्हायची. त्याचे खूप फायदेही मला झाले. पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर या माझ्या ‘हाइम्स आॅफ गुरुज्’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला अध्यक्ष या नात्याने उपस्थित होत्या. आणि काय आश्चर्य! पेंग्विनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती प्रकाशन समारंभाच्या संध्याकाळीच एका झटक्यात विकल्या गेल्या. आपले पुस्तक खपावे म्हणून मला एक नया पैसाही खर्च करावा लागला नाही! या पुस्तक प्रकाशन समारंभाचा सगळा खर्च हॉटेल ला मेरिडिअनच्या मालकीण हरजीत कौर यांनी केला होता. विश्वास ठेवा अगर ठेवू नका. माझे आता अजून एक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत आहे. माझ्या दोन साप्ताहिक स्तंभांमध्ये मी लिहिलेल्या लेखांचे संकलन या नव्या पुस्तकामध्ये असणार आहे. हे संकलन व संपादनाचे काम पेंग्विन किंगसाठी नंदिनी मेहता हिने केले आहे. या नव्या पुस्तकाला नंदिनीने ‘खुशवंतसिंगनामा’ असे नाव दिले आहे. आता मी खूपच वृद्ध झालोय. कोणीतरी मला आधार देऊन नेल्याशिवाय मी एका खोलीतून दुस-या खोलीतही जाऊ शकत नाही. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला मी कसा जाऊ शकेन याचा मी विचार करतो. कोणीतरी मला स्ट्रेचरवरून समारंभस्थळी नेण्याचीही टूम काढू शकतो. माझ्या नव्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ पार पडेपर्यंत काय काय होते ते बघायचे...
माकडचाळा
कसौली येथे मी उन्हाळ्याच्या सुटीत वास्तव्य करीत असे त्या वेळी तेथे असलेल्या माकडांच्या (ज्यांना हिंदीत बंदर असे म्हणतात) करामतींनी माझी खूप करमणूक होत असे. घराच्या व्हरंड्यात बसून मी समोरच्या बागेचे निरीक्षण करीत असे. सूर्योदयानंतर उन्हे या बागेत हलकेच आपले हातपाय पसरायची. त्यानंतर काही वेळातच 30 ते 40 माकडांचा कळप त्या बागेत टपकायचा. ही माकडे एकमेकांशी खेळायची, भांडायची, मारामारीसुद्धा करायची. त्यातील एखादे माकड व्हरंड्यात मी जिथे बसलेला असेन तिथे यायचे, माझा चेहरा न्याहाळायचे, दात विचकायचे आणि जणू मला विचारायचे, ‘तू इथे काय करतोयस?’ या माकडांनी फार जवळ येऊ नये म्हणून मी नेहमी माझ्या खुर्चीपाठी एक काठी लपवून ठेवत असे. एखादे माकड जवळ आले की त्याच्यावर गुरकावत मी म्हणे, ‘मी इथे कशाला आलोय हे तुला आता माझी काठीच सांगेल.’ आणि मी त्या माकडावर काठी उगारत असे. त्यानंतर माकडही माझ्याकडे पुन्हा दात विचकून पाही. मी घाबरावे यासाठी ते थोडे आक्रमक झाल्यासारखे दाखवे. हे सगळे होत असले तरी माकडांचे निरीक्षण करण्याचा माझा उत्साह दांडगा होता. जणू त्याचे मला व्यसनच लागले होते. माकडांविषयी टीव्हीवर एखादा कार्यक्रम सुरू असेल तर मी तो हटकून पाहतोच. आपल्या आईपासून अलग झालेले माकडाचे एक छोटुकले पिल्लू एकदा माझ्या माळ्याच्या मुलाला कुठेतरी सापडले. त्याने माकडाच्या पिल्लाला लहान मुलांची जी मिल्क बॉटल असते त्यातून दूध प्यायला दिले. या पिल्लाला त्या मुलाचा खूपच लळा लागला. हे पिल्लू त्याच्याबरोबरच असायचे. रात्री त्या मुलाच्या कुशीतच हे माकडाचे पिल्लू झोपी जायचे. माकडांचा कळप माझ्या कसौलीतील बागेत रोज येत असे. पण मात्र हे पिल्लू ढिम्म त्यांच्याकडे जायचे नाही. ते नेहमी माळ्याच्या मुलाभोवतीच घुटमळत असायचे. काही माकडांचे तोंड व पार्श्वभाग हा लालबुंद का असतो याचे कारण मला माहीत होते. पण आता मी ते साफ विसरलोय. माकडांच्या लालबुंद असण्यामागचे नेमके कारण काय हे वाचकांनी कळवल्यास मी त्यांना मनापासून धन्यवाद देईन. माकडांमध्येही काही प्रकार असतात. -हेसस मंकींपेक्षा लंगूर माकडे अधिक धिप्पाड व बलवान असतात. लंगुरांना -हेसस मंकी टरकून असतात. -हेसस मंकी नजरेस पडला की त्याला लंगुराने चोप दिलाच म्हणून समजा. माणसाच्या वस्तीत येऊन माकडांना आपले अन्न मिळवावे लागते अशी वेळ आपण त्यांच्यावर आणली आहे. जंगले नष्ट होत आहेत. त्यामुळे साहजिकच माकडे सिमेंटच्या जंगलांकडे वळत आहेत.

चूक...- आर्किटेक्ट आपल्या चुका झाकतात वाइनची भेट देऊन जाहिराती बनवणारे चुकांचे माप टीव्हीवर ढकलून देतात कुक आपल्या चुका मेयोनाइज सॉसखाली दडवतात डॉक्टर आपल्या चुका ‘गाडून’ टाकतात वकील आपल्या चुकांची तुरुंगात जाऊन भेट घेतात! प्रत्येक जण आपल्या चुकीला देतात ‘अनुभवाचे’ नाव... - ऑस्कर वाइल्ड