पाटण्याच्या स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटने (आंदोलन) एका नव्या विचाराने सकारात्मक मोहीम चालवून मुलांच्या शिक्षणाला त्यांनी शाळा आणि पाठशाळांच्या चार भिंतीबाहेर काढून त्यांना एका विशिष्ट उद्देशाशी जोडण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळवले आहे.
पाटण्यातील शैक्षणिक कार्यकर्ता विनोद सिंह यांनी तेरा वर्षांपूर्वी स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटचा प्रारंभ केला होता. आज एकट्या पाटण्यातून शंभराहून अधिक शाळांचे हजारो विद्यार्थी या आंदोलनाशी जोडले गेलेले आहेत. पाटण्यात मुलेच स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटच्या बॅनरखाली शिक्षण शिस्त, संस्कार आणि चरित्र निर्माणासह रचनात्मक कार्यक्रम आखत तयार करतात आणि ते संचालितही करतात. हे विद्यार्थी दर रविवारी कुठल्या कुठल्या शाळेत एकत्र भेटतात आणि मुख्यत: शिक्षण अथवा सामाजिक मुद्द्यांवर चर्चा करतात. बालमजुरीच्या मुक्ततेसाठीचा मार्ग अधिक प्रशस्त, मजबूत करतात. आठवड्यातून किमान एकदा तरी खादी घालावी अशी मोहीमदेखील ते चालवतात. तसेच कोचिंगच्या विरुद्ध वातावरण निर्मितीदेखील करतात. ग्रीटिंग कार्ड तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामुळे मुलांना आर्थिक मदत मिळते पण यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास जागवला जातो.
स्टुडंट मूव्हमेंट शिक्षणव्यवस्थेतील त्रुटींबाबत सामान्य व्यक्ती शासनाला विचार करण्यास भाग पाडत आहे. सध्याच्या शिक्षणव्यवस्थेने या देशातच दोन देश तयार केले आहेत. एक संपन्न श्रीमंत लोकांचा देश आहे आणि दुसरा देश गरीब लोकांचा आहे. मिशनरी आणि कॉन्व्हेंट शाळांत शिकणाऱ्या मुलांना अॅक्टिव्ह लर्निंग बोर्डच्या मदतीने स्मार्ट क्लासरूममध्ये शिकवताहेत. शहरात अशा शाळेत नर्सरीत प्रवेश मिळणेदेखील कठीण आहे. अशा शाळांत प्रवेश मिळविण्याआधीची अट असते आर्थिक कुवतीची. तर दुसऱ्या बाजूने गाव शहरातील सरकारी विद्यालयांत साहित्याची फारच वानवा असते. विद्यार्थ्यांना ना एकसमान पाठ्यक्रम आहे, ना एकसमान सुविधा; मात्र महाविद्यालयातील प्रवेशासाठी त्याच श्रीमंत विद्यार्थ्यांशी सरकारी शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा करावी लागते. दुसऱ्या अनेक स्पर्धा परीक्षांमध्येही दोघांना एकसारखीच स्पर्धा करावी लागते. स्पर्धा परीक्षांमध्ये दोघांनाही एकसारखेच प्रश्न विचारले जातात. देशातील सर्व विद्यार्थी जेव्हा एकच अभ्यासक्रम शिकतील तेव्हा एकाच पातळीवर पुढे येतील. भारतात साडेसहाशेहून अधिक विद्यापीठे आणि साधारणत: ३५ हजार महाविद्यालये आहेत, तरीही १८ ते २५ वयोगटातील युवकांपैकी केवळ सात टक्केच विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. सध्याची शिक्षणव्यवस्था जोपर्यंत समाजातील सर्व वर्गांसाठी ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या एकसारख्या संधी देण्यास कटिबद्ध होत नाही तोपर्यंत शिक्षणक्षेत्रात नवे युगांतर आणि आमूलाग्र परिवर्तन येणार नाही. याच आमूलाग्र परिवर्तनासाठी स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटसारख्या संस्था रचनात्मक आणि पारदर्शकतेसह संघर्ष करत आहेत.
पारदर्शकता स्वीकारल्यानंतर कधीही गुणवंतांची उपेक्षा होऊ शकत नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात कोणतेही गुणात्मक परिवर्तन पारदर्शकता आणूनच केले जाऊ शकते. आता केंद्र सरकार नव्या शिक्षण धोरणाच्या प्रारूपाला अंतिम रूप देण्यात गढून गेले आहे आणि राज्यांशीही सल्लामसलत करत आहे. राज्य सरकार आणि विशेषज्ञाशिवाय केंद्र सरकारच्या शिक्षणाशी संबंधित तमाम मुद्द्यांवर स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटसारख्या संस्थांशीही सल्लामसलत केली पाहिजे. स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटसारख्या संस्थांकडून सरकारला तळागाळातील सूचना मिळतील. ज्याप्रमाणे स्टुडंट ऑक्सिजन मूव्हमेंटने विद्यार्थ्यांच्या हितासाठी, प्रतिष्ठेसाठी ज्याप्रमाणे एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन सरकार त्यास मोठ्या प्रमाणात रूपांतरित करू शकते आहे.
(अध्यक्ष जनसंचार विभाग, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धा.)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)