आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुजबुज : दादागिरी नव्हे, सावधगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात ‘दादा’ म्हटले की राष्ट्रवादीचे दबंग नेते अजित पवार यांचा चेहरा चटकन समोर येतो. अजितदादांची तोफ एकदा धडाडू लागली की कोण लक्ष्य होईल हे सांगताच येत नाही. एका कार्यक्रमात तर दंडुके घेऊन पत्रकारांनाच चोपा, असे आदेश दादांनी दिले होते. प्रचंड टीकेनंतर दादा आपल्या शैलीत बदल करतील अशी भाकिते वर्तवली गेली. खुद्द मोठे साहेब अर्थातच काका शरद पवारांनीही तंबी दिल्याच्या वृत्तामुळे दादागिरी कमी होईल असे चित्र होते. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात दादांचा तोल असा काही घसरला की, सार्‍या इभ्रतीची माती माती झाली. प्रसारमाध्यमांपासून तर काकासाहेबांनी यथेच्छ टोलेबाजी केल्यानंतर दादांनी आत्मक्लेश आंदोलन करून जनता जनार्दनासमोर माफीचा पदर फिरवला. जनतेनेही दादांची चूक पदरात घातली. आता मात्र दादा भलतेच सावध झाल्याचे दिसत आहे. नाशिक दौर्‍यात पत्रकारांच्या प्रश्नांच्या भडिमारासोबत अजितदादा भलत्याच डिफेन्स मूडमध्ये होते. नाशिकमध्ये दादांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून पालकमंत्री छगन भुजबळांचे नाव वगळल्याचा प्रश्न विचारल्यावर दादा फ्रंटफूटवर जाऊन फटका मारतील, अशी अपेक्षा होती. मात्र दादांनी भुजबळ साहेब परदेशात असून, आम्ही त्यांच्याशी चर्चा करूनच नाव वगळल्याचा गौप्यस्फोट केला. राष्ट्रवादीत सर्व काही समजून उमजून चालते असे सांगतानाच नाव टाकून आले नसते तर, उगाच दादांच्या उपस्थितीत भुजबळांची दांडी अशी तुम्ही ब्रेकिंग केली नसती का, याची जाणीवही त्यांनी करून दिली. थोडक्यात नेते बॅकफूटवर आले तर मीडियाला फटकेबाजी करता येत नाही ही गोम कळल्यामुळे दादागिरीपेक्षा सावधगिरीचा मार्ग तर अजितदादांनी निवडला नाही, असा प्रश्न उपस्थित नेतेगणांना पडला.