आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lacking Of Imaginative Power By Political Parties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय पक्षांचे कल्पनादारिद्र्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील राजकीय घडामोडीतून सर्वच राजकीय पक्षांच्या कल्पनादारिद्र्याचे विदारक प्रदर्शन होत आहे. अयोध्या मुद्द्यावरून वातावरण तापवण्याचा प्रयत्न विश्व हिंदू परिषदेने केला. त्याला भाजपची छुपी साथ होती. अमित शहा यांच्याकडे उत्तर प्रदेश भाजपची सूत्रे गेल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या राममंदिरावरील प्रेमाला उकळी फुटावी हा योगायोग नव्हे तर सुनियोजित राजकीय व्यूहरचना आहे. उत्तर प्रदेशातील वातावरण भाजपला अनुकूल होत असल्याचा दावा जनमत चाचण्यांतून व्यक्त झाला होता. अनुकूलता म्हणजे हिंदुत्वाची सुप्त लाट असे सुलभ समीकरण मांडण्यात आले. ही सुप्त लाट अधिक उग्र करण्यासाठी राममंदिराचे आंदोलन हाती घेण्यात आले. पण ते फसले.


मुस्लिम मतदारांना पुन्हा आपलेसे करण्यासाठी आसुसलेल्या मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीला मात्र विहिंपच्या या आंदोलनामुळे थोडी तरतरी आली. मुलायमपुत्र अखिलेश यांच्या हाती उत्तर प्रदेशाची सूत्रे आली तेव्हा अनेकांच्या आशा उंचावल्या होत्या. नवी भाषा बोलणारा, जमातवादाच्या राजकारणाबद्दल उघड तुच्छता व्यक्त करणारा, तरुण, उच्चविद्याविभूषित अखिलेश, मुलायमसिंहांच्या, बाहुबली राजकारणाला सोडचिठ्ठी देऊन विकासाचे राजकारण सुरू करील अशी अपेक्षा होती. ती पुरती फोल ठरली. उत्तर प्रदेशाला वळण मिळण्याऐवजी मुलायमसिंह यांच्या भोवतालच्या बाहुबलींनी अखिलेशला नरम केले. दंग्याधोप्यांना ऊत आला. गुंडगिरी वाढली. मुलायमसिंह यादवांना चिंता होती ती जातीय दंग्यांची. नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशाकडे लक्ष देऊन हिंदू मतांचे ध्रुवीकरण आरंभले तर मुस्लिम मते काँग्रेसकडे वळतील ही धास्ती त्यांना वाटते. नरेंद्र मोदी उद्या पंतप्रधानपदासाठी निवडणुकीत उतरले की त्यांना वेसण घालील असा समर्थ पर्याय मुस्लिमांना शोधावाच लागेल. हा पर्याय म्हणून आपली निवड व्हावी अशी अपेक्षा मुलायमसिंह, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार यांच्यापासून अनेकांची आहे. परंतु दिल्लीत असा समर्थ पर्याय फक्त काँग्रेसच देऊ शकते हे मुस्लिमांना माहीत आहे. मुस्लिमांना काँग्रेसबद्दल प्रेम नसेल, पण मोदींना धडा शिकवण्यासाठी मुलायम, लालू, नितीशपेक्षा मुस्लिमांनी राहुलची निवड केली तर आश्चर्य वाटायला नको.


अशा परिस्थितीत मुस्लिम मतदारांना खेचण्यासाठी अयोध्या यात्रेवरील कारवाई उपयोगी पडेल, असा समाजवादी पार्टीचा होरा आहे. म्हणून विहिंपवर कारवाई करण्याआधी वातावरण पुरेसे तापेल अशी व्यवस्था अखिलेश यादव यांच्या सरकारने केली. मुलायमसिंह यांचे एकेकाळचे शागिर्द व सध्या काँग्रेसवासी असलेले बेनीप्रसाद वर्मा यांनी भाजप-सपातील मॅचफिक्सिंग या शब्दात या राजकारणाचे वर्णन केले आहे. बेनीप्रसाद हे काही आदर वाटावा असे नाव नाही. परंतु ते बोलले ते खरे आहे, यातही शंका नाही. मतांचे ध्रुवीकरण होऊन हिंदूंची मते आपल्या वाट्याला यावीत व मुस्लिमांची, काँग्रेसकडे न जाता मुलायमसिंह यांच्या पारड्यात पडावीत हा राजकीय डाव त्यामागे आहे. बेनीप्रसाद वर्मा यांना या डावाचे दु:ख नाही. या खेळात काँग्रेसच्या पारड्यात काही पडणार की नाही ही चिंता त्यांना आहे.


भाजप व सपा हे एकमेकांच्या साहाय्याने असा राजकीय डाव टाकीत असतील तर त्याबद्दल काँग्रेसने तक्रार करण्याची गरज नाही. काँग्रेस असे खेळ गेली साठ वर्षे खेळत आहे आणि आजही असे खेळ पक्षाकडून खेळले जातच आहेत. परंतु सपा-भाजपचा खेळ म्हणावा तसा रंगला नाही हा यातील महत्त्वाचा मुद्दा आहे आणि देशातील राजकीय पक्षांच्या कल्पनादारिद्र्याशी तो संबंधित आहे. देशातील वातावरण बदलले असताना प्रत्येक राजकीय पक्ष गेली अनेक वर्षे वापरात असलेल्या पटकथेनुसार राजकीय व्यूहरचना आखतो हा यातील अत्यंत दुर्दैवी भाग म्हणता येईल. एका नव्या राजकीय , सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विचारांची देशाला गरज आहे. तरुण वर्गालाच नव्हे तर बहुतांश सर्व मतदारांना विचारातील नावीन्य हवे आहे. नेमके तेच देण्यात सर्व राजकीय पक्ष कमी पडत आहेत.


नरेंद्र मोदींनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली तेव्हा देशातील चर्चेचे स्वरूप ते बदलतील असे वाटले होते. आर्थिक विषयांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी सुरू केलेल्या विकासाच्या चर्चेला पुन्हा पुन्हा गुजरातच्या दंग्यांकडे खेचले जात असले तरी तरुणाईला त्याची भूल पडत होती. यामुळेच नितीशकुमार यांनीही पहिल्या टप्प्यात मोदींच्या हिंदुत्वावर प्रहार केला नाही तर मोदींचा आर्थिक आराखडा हा भांडवलदारांच्या हिताचा असल्याची टीका केली होती. परंतु हेच मोदी नंतर हिंदू अनुनयाच्या पातळीवर उतरले. आपली हिंदू ओळख गर्जून सांगू लागले. ते पुन्हा संघ व जनसंघाच्या जुन्या स्क्रिप्टनुसार भूमिका वठवू लागले. दुसरीकडे सपाही मुस्लिम अनुनयाची त्यांची स्क्रिप्ट धरून बसली आहे, तर गरिबांना भ्रांत आश्वासने देण्याची 70च्या दशकातील स्क्रिप्ट आजही मते मिळवून देईल, असे काँग्रेसला वाटत आहे. अन्य प्रत्येक पक्षही - मग राज ठाकरेंची मनसे असो वा नितीशकुमारांचा जनता दल असो - ठरलेल्या साच्यानुसार काम करतो आहे.


पुढील निवडणुकीतील किमान 11 कोटी मतदार, 1991 नंतर, म्हणजे आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर जन्माला आलेले आहेत. त्यांच्या भावना उद्दीपित करणारे विषय हे धार्मिक, प्रादेशिक वा गरिबीचे गोडवे गाणारे नाहीत. त्यांचे प्रश्न मुख्यत: आर्थिक आहेत. रोजच्या जगण्यातील व्यवहाराशी निगडित आहेत. रोजगार, कामातील कौशल्य, स्वस्त शिक्षण, स्वस्त घरे, चांगले राहणीमान या त्यांच्या अस्मिता आहेत. मुस्लिमांचा अनुनय त्यांना नकोसा वाटतो तसा गरिबीचा खोटा कळवळाही नकोसा वाटतो. समस्या आहेत म्हणून ओरड करण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी आत्मविश्वासाने सामोरे कसे जाता येईल हे सांगा, अशी मागणी हे नवे मतदार करीत आहेत. मोदींचा हिंदुत्ववाद त्यांना आकर्षित करीत नाही तर मोदींचा आत्मविश्वास त्यांना आकर्षित करतो. हा आत्मविश्वास धार्मिक नव्हे तर आर्थिक क्षेत्रात प्रकटावा अशी मतदारांची अपेक्षा आहे. परंपरेचे गोडवे गाण्याची गरज त्यांना वाटत नाही. कारण परंपरेकडे आत्मविश्वासाने पाहण्याची नजर ते कमावत आहेत. देशापुढील समस्यांची मांडणी व त्यावरील उत्तरे या सर्वांमध्ये त्यांना नावीन्य हवे आहे. मात्र ही अपेक्षा केवळ राजकीय पक्षच नव्हे तर प्रसारमाध्यमेही पुरी करीत नसल्याने मतदारांमध्ये उदासीनता वाढते. राजकारण असो, महिलांवरील अत्याचार असोत वा दाभोलकरांची हत्या असो, विचारांची बंदिस्तता तोडणे हे माध्यमांनाही कसे जमत नाही हे टीव्हीवरील चर्चांमधून सहज लक्षात येते. 2014 च्या प्रचारात पठडीतील चर्चांना निरोप मिळणार काय, हा प्रश्न उत्तर प्रदेशातील घडामोडींनी उपस्थित केला आहे.


prashant.dixit@dainikbhaskargroup.com