आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lalit Modi Back On Cricket Pitch News In Marathi

एक ‘मोदी’ निवडून आले!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटमध्ये वादाचे मोहोळ उठवणार्‍या आयपीएलचे वादग्रस्त जनक ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी जाहीर करण्यात आले. या असोसिएशनच्या निवडणुका 19 डिसेंबर रोजीच झाल्या होत्या. ललित मोदी यांची राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर होताक्षणी बीसीसीआयने राजस्थान क्रिकेट असोसिएशन बरखास्त केली. राजस्थानमधील क्रिकेटपटू व क्रिकेट यांचे नुकसान होऊ नये यासाठी लवकरच हंगामी क्रिकेट समितीची स्थापना करण्यात येईल, असेही बीसीसीआयने जाहीर केले आहे. आयपीएल स्पर्धेत घोटाळा केल्याचा आरोप ठेवून चौकशीसाठी हजर न होणार्‍या ललित मोदी यांच्यावर बीसीसीआयने आजीवन बंदी लादली आहे. ललित मोदी यांनी आयपीएलचे प्रक्षेपण हक्क विकताना घोटाळे केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या आरोपांना उत्तर देण्यात ललित मोदी आतापर्यंत अयशस्वी ठरले आहेत. एवढेच नाही, तर बंदीच्या निर्णयाआधीपासूनच ते भारत सोडून ब्रिटनमध्ये राहत आहेत. राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूकही त्यांनी भारतात न येता तेथूनच लढवली. याचाच अर्थ भारतातही काही शक्ती त्यांना मदत करत आहेत. एन. श्रीनिवासन यांच्या जावयाच्या प्रतापांमुळे सध्या अडचणीत आलेल्या बीसीसीआयची कोंडी करण्याचा ललित मोदी व त्यांचा समर्थकांचा प्रयत्न आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ललित मोदींची निवड हे त्याचेच द्योतक आहे. या निवडीनंतर ललित मोदी भारतात परतणार काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मोदी यांच्यावर बीसीसीआयची बंदी आहेच. राजस्थान क्रिकेट असोसिएशन बरखास्त करून हंगामी क्रिकेट समितीद्वारे पुढचा कारभार सुरू झाल्यानंतर त्या संघटनेला बीसीसीआयकडून मिळणारी आर्थिक मदत व अन्य रसद थांबवली जाण्याचा आता प्रश्न कदाचित उद्भवणार नाही. फलंदाज अशोक मणेरिया याची भारताच्या उदयोन्मुख संघात निवड झाली आहे. मध्यमगती गोलंदाज अभिमन्यू लांबा भारताच्या 19 वर्षांखालील संघात आहे. राजस्थानमधील या दोन क्रिकेटपटूंबद्दलही बीसीसीआय योग्य तो न्याय करेल यात शंका नाही.