आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भू आणि जल सीमावादावरून तणावग्रस्त देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मेक्सिकोच्या सीमेवर भली मोठी भिंत बांधणार आहेत. मात्र यासाठीचा अब्जावधी डॉलरचा खर्च कोण करणार हे अद्याप स्पष्ट नाही. ट्रम्प यांच्या कार्यकाळात या भिंतीचा मुद्दा चर्चेत राहील. तिकडे इस्रायल-गाझा-पॅलेस्टाइनची सीमा, दक्षिण चीन सागरापासून चीन आणि आणि आठ पूर्वीय आशियाई देशांदरम्यान तणावाची स्थिती आहे. भारत-चीन, भारत-पाकिस्तानच्या सीमेवरील वाद तर कित्येक दशकांपासून सुरूच आहेत. 
 
चीनचा तैवानसोबत, तर युक्रेनचा रशियाशी सीमावाद आहे. विविध देशांमधील तणाव केवळ जमिनीच्याच नव्हे, तर सागरी सीमेवरूनही सुरु आहे. हंगेरी या युरोपियन देशाने सर्बियाच्या सीमेवर नवी फेन्सिंग लावण्याची तयारी सुरू केली आहे. सर्बियातून मोठ्या संख्येने येणारे निर्वासित रोखण्यासाठी हंगेरीने हे पाऊल उचलले आहे. अमेरिका आणि कॅनडादरम्यानची सीमा जगात सर्वाधिक शांत सीमा मानली जाते. सहसा सीमेवरील वाद हे राष्ट्रीय साधनसंपत्तीवरून असतात किंवा पूर्वी झालेल्या करारावरील मतभेदांमुळे असतात. अशाच काही वादांबद्दल जाणून घेऊयात... 

सेनकाकू बेटसमूह : जपान-चीन
जपान आणि चीनच्या सीमेदरम्यान या बेटसमूहावर जपानचे नियंत्रण आहे. मात्र चीनचाही त्यावर दावा आहे. या बेटावर तेल आणि वायूचा मोठा साठा असल्याचे बोलले जाते. याच बेटाचा एक भाग जपानच्या एका श्रीमंत कुटुंबाने जपान सरकारला विकला होता. त्यामुळे या परिसरातील चिनी कुटुंबांमध्ये तणाव वाढला आणि संघर्षही झाला. तज्ज्ञांच्या मते, चीन ज्या प्रकारे आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहता हा बेटसमूह मोठ्या संघर्षास कारणीभूत ठरू शकतो.  

अंटार्क्टिका : ब्रिटन-फ्रान्स-अर्जेंटिना 
६० च्या दशकापासून ब्रिटन, फ्रान्स, अर्जेंटिनासह अनेक देशांनी या खंडावर दावे-प्रतिदावे केले आहेत. १९५९ मध्ये अंटार्क्टिकावरून एक करार झाला होता. यानुसार, कोणत्याही देशाला अंटार्क्टिकाच्या कोणत्याही भागावर ताबा मिळवता येणार नाही. मानवाचे कल्याण तसेच शांततेसाठी अंटार्क्टिकावरील कोणत्याही भागाचा वापर करता येईल. तसेच येथील आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी कुणालाही देण्यात आलेली नाही.  

कुरील बेट : जपान-रशिया
५६ बेटसमूहाच्या या परिसरात विरळ वस्ती आहे. त्यापैकी काही जण स्वत:ला जपानचा, तर काही जण स्वत:ला रशियाचा भाग मानतात. या परिसरात ज्वालामुखी सक्रिय असल्यामुळे तो संवेदनशील आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हियत रशियाने कुरील बेटसमूहावर ताबा मिळवला. याल्टा करारानंतर सोव्हियत रशियाने या भागावर आपला हक्क सांगितला आहे. मात्र इतिहासाचा दाखला देत जपानही या भागावर आपला दावा सांगतो. 

सहारा : मोरोक्को-सहारावी
पश्चिम सहारातील रहिवाशांना ‘सहारावी’ असे म्हणतात. त्यांच्या पोलिसारियो फ्रंट या संघटनेला ७० च्या दशकापासून मोरोक्कोपासून स्वतंत्र व्हायचे आहे. १९९१ मध्ये दोन्ही पक्ष जनमत चाचणीसाठी तयार झाले. यात सहारावियांना स्वातंत्र्य मिळेल किंवा मोरोक्कोत विलीन व्हायचे ठरवायचे होते. त्या वेळी मोरक्कोने हजारो सहारावियांना स्थलांतरित केले. त्यामुळे चाचणीवर परिणाम झाला. पोलिसारियो फ्रंटने शस्त्रास्त्रे हाती घेतली. हा संघर्ष सुरूच आहे. 

तैवान : चीन
१८९४-९५ या वर्षी जपान-चीनदरम्यानच्या युद्धात चीनचा पराभव झाला. तैवान आणि इतर दोन बेट जपानच्या नियंत्रणात गेले. दुसऱ्या महायुद्धात तैवान पुन्हा चीनमध्ये आले. १९४९ मध्ये तैवानचे अधिकृत नाव ‘रिपब्लिक ऑफ चायना’ असे झाले तर चीनला ‘पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ म्हटले गेले. त्यानंतर दीर्घकाळ चीनने तैवानवर दावा केला. २००५ मध्ये तैवानने आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले तरीही दोन्ही देशांदरम्यान संघर्ष सुरूच असतो.}britannica.com
 
बातम्या आणखी आहेत...