आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Latest Marathi News Talathi Attendance Application

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तलाठ्याच्या ललाटी "अ‍ॅप'चा बडगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रशासनातल्या उतरंडीतील शेवटच्या स्तरावर औषधोपचार केल्यामुळे ही यंत्रणा सशक्त होईल, पण वरिष्ठांनाही तंत्रज्ञानाच्या जाळ्यात आणून जनतेप्रती उत्तरदायी करणे गरजेचे आहे.
सरकारी कारभार पारदर्शक, सुसूत्र, भ्रष्टाचाररहित करायचा असेल तर या कारभारात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे लोकप्रशासन शाखेचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचे एकमत आहे. सरकारी कारभाराची उतरंड ही भारतीय प्रशासनाची खरी ओळख आहे. या उतरंडीच्या माध्यमातून प्रशासन सुलभ करण्याचा प्रयत्न असला तरी या उतरंडीतील प्रत्येक घटक हा शक्तिमान असतो. गावचा तलाठी हा प्रशासनातील असाच एक शक्तिशाली घटक आहे, जो राज्य सरकार व जनता यांच्यामधील अखेरचा दुवा असतो. अशा तलाठ्याची प्रतिमा नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. तलाठी आपल्या कार्यालयामध्ये हजर नसल्यापासून ग्रामप्रशासनातील दप्तर िदरंगाईपर्यंत सर्वच समस्यांचे बोट तलाठ्यांकडे दाखवले जात असताना या महिन्यापासून तलाठ्यांना स्वत: ते प्रत्यक्ष हजर असणाऱ्या गावातून सेल्फी (मोबाइलमधील स्वत:चे छायाचित्र) पाठवण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी तलाठ्यांना अँड्रॉइड मोबाइल घेणे बंधनकारक केले आहे. या मोबाइलवर राज्य सरकारने विकसित केलेले "हजेरी अ‍ॅप’ डाऊनलोड करावे लागेल. बऱ्याचदा तलाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पूर्वसूचना न देता गैरहजर असतात, आपल्या कार्यालयात हजर न राहता ते तालुक्याच्या गावात जाऊन तेथून काम करतात, अशा तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारला तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली हे महत्त्वाचे आहे. हे अ‍ॅप्लिकेशन पुढे भविष्यात ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस पाटील, कृषी सहायक अशा ग्रामपातळीवरील महसुली यंत्रणेवर राबवण्यात येणार असल्याचीही चर्चा असल्याने तळागाळात पसरलेली महसूल यंत्रणा जनतेसाठी अधिक उत्तरदायी ठरेल असे समजावयास हरकत नाही. प्रशासनातल्या उतरंडीतील शेवटच्या स्तरावर औषधोपचार केल्यामुळे ही यंत्रणा सशक्त होईल, पण जे उतरंडीतल्या मध्य व शीर्षस्थानी असतात त्यांनाही तंत्रज्ञानाच्या जाळ्यात आणून जनतेप्रती उत्तरदायी करणे गरजेचे आहे. नाहीतर हा केवळ दिखावा ठरेल.