आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायकाचा चेहरा असलेला लेखक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्याच्या नकाशावर डोंबिवली हे तसं अपरिचित गाव आलं ते सुप्रसिद्ध लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे अर्थात ‘पु. भा. भावे’ डोंबिवलीत राहायला आल्यानंतर. भावे हे व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यासारखे तसे उग्रच. भावे यांच्यामुळे तमाम मराठी जनतेला ‘पु. भा. भावे - डोंबिवली’ हा पत्ता तोंडपाठ झाला. डोंबिवलीची ही पहिली ओळख.
भावे गेल्यानंतर ती जागा जणू शं. ना. नवरे यांना मिळाली. बघता बघता शं.नां.चे साहित्य वाचकांना इतके आवडायला लागले की त्यांचे नामकरण ‘शन्ना’ केव्हा झाले हे कळलेही नाही. मराठीत लेखक लोकप्रिय झाला की त्याच्या दोन आद्याक्षरांनी ओळखला जातो. जसे श्रीना (पेंडसे) पुल (देशपांडे), पुभा (भावे) तसेच शंकर नारायण नवरे यांचे ‘शन्ना’ झाले. मात्र शन्ना खासगीत हळूच सांगत, ‘मला पहिल्यांदा शन्ना म्हटले ते कॉलेजातल्या मैत्रिणीने. . . .’. शन्ना हे पहिल्यापासूनच, अगदी डोंबिवली गाव असल्यापासूनचे. गावावर सुरुवातीपासून मनापासून प्रेम करणारे शन्ना पुढे मोठे लेखक, नाटककार झाले. मुंबईत राहण्यासाठी ‘ऑफर्स’ देखील आल्या, पण शन्नांनी शेवटपर्यंत ‘गड्या आपला गाव बरा’ हेच पक्कं ठरवलं आणि ते पाळलंही. गोष्ट सांगण्याचा वारसा आपल्या आईकडून मिळाल्यानंतर त्या ऐकता ऐकता त्यांना पण गोष्ट लिहावीशी वाटली, सांगावीशी वाटली. शन्नांच्या बहुतेक कथा निवेदनाने सुरू होतात. त्याचे कारण हेच तर नाही ना?


रात्री मच्छरदाणीमध्ये कंदील ठेवून, कंदिलातले रॉकेल गादीला लागू नये म्हणून त्याच्याखाली वर्तमानपत्र ठेवून कथा लिहिल्या, असे तेच सांगत असत. प्राथमिक शिक्षण डोंबिवलीत झाल्यावर पुढे ते किंग जॉर्ज शाळेत जायला लागले. त्या वेळच्या त्यांच्या वर्गमित्रांपैकी एक जण संपादकदेखील झाला. ते म्हणजे माधव गडकरी आणि शन्ना कथाकार, नाटककार, ललित लेखक, चित्रपट लेखक अशा विविधांगांनी यशस्वी होत गेले. ही झाली पुढची गोष्ट.
शन्ना हे विज्ञानाचे विद्यार्थी. ते सिद्धार्थ महाविद्यालयात होते. नोटीस बोर्डवर कॉलेजच्या मासिकासाठी विद्यार्थ्यांनी लेखन पाठवावे, असे आवाहन करण्यात आलेले होते. त्या वेळच्या काहीच नाव नसलेल्या शंकर नारायणने एक कथा पाठवली आणि ते तो विसरूनही गेला. एके दिवशी त्याला पसंतीचे पत्र आले आणि शंकर नारायण मोहरूनच गेला. त्याची कथा सर्वोत्कृष्ट असल्याची दाद दिली होती ती ग्रंथपाल म्हणून नावाजलेल्या शा. शं. रेगे यांनी. रेगे सहजासहजी कुणाला चांगले म्हणत नसत अशी त्यांची ख्याती होती.


शन्नांना ही दाद आयुष्यभर पुढे जायला पुरेशी ठरली. शन्ना कथांवर कथा लिहू लागले. आपल्या काही कथा त्यांनी त्यांचे अत्यंत आवडते लेखक वि.वा. बोकील यांना दाखवल्या आणि मार्गदर्शनाची अपेक्षा केली. तेव्हा या पोरगेलेशा मुलाला बोकील म्हणाले, या वयात कथा-कविता सगळ्यांनाच होतात. तू वीसएक कथा लिही आणि मगच मला भेट. पुढे काही दिवसांनी हा मुलगा बोकिलांपुढे उभा राहिला आणि म्हणाला, मी 30 कथा लिहिल्या आहेत. आता तरी मार्गदर्शन कराल ना ? शन्नांच्या कथा वाचकांना आवडू लागल्या होत्या आणि एके दिवशी त्यांना पत्र आले, तुमच्या कथा घेऊन या, आपण एक कथासंग्रह काढू. हे पत्र केशवराव कोठावळे यांचे होते. मॅजेस्टिक प्रकाशन नुकतेच सुरू झाले होते. हा पहिलाच कथासंग्रह ‘तिळा उघड’. जणू या संग्रहामुळे या नव्या अलिबाबाला मराठी साहित्याची गुहा सापडली होती. त्यानंतर शं. ना. नवरे हे नाव कथाकार म्हणून प्रस्थापित झाले. दरम्यान, शन्नांना सचिवालयात नोकरी लागली. दिवसा नोकरी करायची, ऑफिस सुटल्यानंतर गिरगावातल्या मॅजेस्टिकमध्ये. जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, रमेश मंत्री यांची जानपेहचान होऊन गेली. आजच्या भाषेत तेथे ‘कट्टा’ सुरू झाला. मॅजेस्टिकचा पहिला लोगो शन्नांच्या हस्ताक्षरात होता! या मंडळींच्या कल्पनेतूनच ललित मासिकाचा जन्म झाला. चर्चा, गप्पा, प्रवास, नाटक असे सगळे चाललेले असायचे. जेमतेम शेवटची गाडी पकडून शन्ना घरी परतत असत. या गोष्टीचा त्रास घरच्यांना होऊ नये म्हणून त्यांच्या पत्नी गजर लावून जाग्या होत. ही साथ शन्नांना यशाच्या वाटेकडे घेऊन गेली. पुढे आत्माराम भेंड्यांच्यामुळे ते नाटक लिहायला लागले. ती वाट पण त्यांना गवसली. मन पाखरू पाखरू, सूर राहू दे, सुरुंग, धुम्मस अशी यशस्वी नाटके त्यांनी दिली. त्याचबरोबर ‘ग्रँड रिडक्शन सेल’ सारखी प्रायोगिक नाटकंदेखील त्यांनी लिहिली.


शन्ना म्हटले की प्रसन्न लेखन ही मुद्रा ठरून गेली. मग ते नाटक असो की कथा असो, कादंबरी असो वा चित्रपट. सुंदर लेखन करणा-या लेखकाची छबीदेखील तेवढीच सुंदर क्वचितच असते. शन्नांच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी जमून आल्या होत्या. म्हणून तर श्री. ज. जोशींनी शन्नांच्या बाबतीत म्हटलं होतं, ‘ना. सी. फडक्यांच्या नायकाचा चेहरा असलेला लेखक.’ शन्नांनी हे बिरूद शेवटपर्यंत टिकवलं. लोकांना पण ते सार्थ वाटलं ही शन्नांची कमाई. जन्माला आलेला माणूस जाणारच असतो. 82 वर्षांचे सफल आयुष्य त्यांना लाभले. ते गेले असले तरी त्यांच्या साहित्यातून ते आपल्याला भेटतील-दिसतील. हाच त्यांचा विशेष कायम राहील.