आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकला पर्याय चामड्याचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेदर इंडस्ट्री म्हटले की गाय, म्हैस, शेळी आणि मेंढ्याच्या कातड्यांपासून बनवल्या जाणार्‍या चपला, बूट, शोभेच्या वस्तू किंवा मनगटी घड्याळाचे पट्टे व तत्सम वस्तू चटकन डोळ्यासमोर येतात. या वस्तू बनवणारे बरेच कारखाने भारतभर पसरले आहेत, परंतु याव्यतिरिक्त या प्राण्यांच्या कातड्यापासून अनेक औषधे बनवली जातात. उदा. आगीपासून झालेल्या जखमा भरून काढण्याकरिता तयार केलेली औषधे, दातांच्या सर्जरीकरिता लागणारी औषधे किंवा कुष्ठरोग्यांकरिता लागणारी ही सर्व औषधे या प्राण्यांच्या कातडी अथवा चरबीपासून बनवली जातात. तसेच आपण घेत असलेल्या काही औषधी कॅप्सूल्सचे आवरणदेखील याचपासून तयार केले जाते. ही सर्व संशोधने भारतातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट’अर्थात (सीएलआरआय) येथे केले जाते. 1948 मध्ये मद्रास येथे स्थापन झालेल्या या संशोधन केंद्राचा मूळ उद्देश कातड्यावर संशोधन करणे व पर्यावरणस्नेही प्रक्रिया तयार करणे हाच होता.

जगभरातील कातडी कमावणारे कारखाने अर्थात टॅनिंग इंडस्ट्री प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांमध्ये आढळतात. याचे प्रमुख कारण या कारखान्यांमुळे निर्माण होणार्‍या प्रदूषणास अमेरिका, युरोप आदी पुढारलेल्या देशांमधील शासन आणि तेथील जनतेचा प्रखर विरोध. परंतु चामड्याच्या वस्तूंची मागणी पाहता अशा इंडस्ट्रीसाठी लागणारे मनुष्यबळदेखील पुढारलेल्या देशांपेक्षा तिसर्‍या जगामध्ये जास्त मिळणार हे गृहीत धरून या देशांनी हे कारखाने आशिया-आफ्रिकेतील देशांमध्ये हलविण्यास सुरुवात केली. या उद्योगापासून निर्माण होणारे प्रदूषण ही महत्त्वाची समस्या आता या तिसर्‍या जगाला भेडसावत आहे. हल्ली ‘प्लास्टिक’चा मोठ्या प्रमाणात चामड्याला पर्याय म्हणून वापर केला जातो व प्लास्टिकचे विघटन न होण्यामुळे यातून नवीन समस्या निर्माण झाली आहे. यामुळे लेदर इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणात धोका आणि स्पर्धा निर्माण झाली आहे. यासाठी ‘सीएलआरआय’ ही संस्था सातत्याने नवीन संशोधन करून हा व्यवसाय अधिक सक्षम करीत आहे.

शतकानुशतके कच्चा माल म्हणून वापरण्यात येणारे चामडे टॅनिंगला पाठवण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात मिठाचा वापर करत असत. टॅनिंग करताना हे मीठ काढून टाकण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी वापरत. हे पाणी व मीठ चामड्यातून काढल्यानंतर जमिनीमध्येच सोडले जात असे. यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढे व पाण्याची नासाडी होत असे. यावर ‘सीएलआरआय’ने संशोधन करून मिठाव्यतिरिक्त टॅनिंग पद्धती शोधून काढली असून त्यामुळे मीठ आणि पाण्याचा वापर कमी झाला. त्याचबरोबर टॅनिंगमधील एक प्रक्रिया वगळल्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक बचतदेखील झाली. ही नवीन प्रक्रिया संस्थेने भारतातील आणि कतार, सौदी अरेबिया येथील कातडी कमावणार्‍या संस्थांना उपलब्ध करून दिली. प्रदूषित पाण्याच्या शुद्धीकरणाबाबतही संस्थेने महत्त्वपूर्ण संशोधन केले असून, टॅनिंग उद्योगातील एका महत्त्वाच्या समस्येवर उत्तर शोधून काढले. टॅनिंग प्रक्रिया सुरू असताना पाण्याचा वापर खूप करावा लागतो.

इतर प्रदूषणाबरोबरच या पाण्याला अतिशय घाण वास येतो. ‘सीएलआरआय’ने संशोधन केलेल्या नवीन पद्धतीने वासाबरोबरच हे पाणी पुन:वापरासाठी उपयोगात आणता येते. प्रामुख्याने भारतामध्ये गाय, म्हैस, शेळी आणि मेंढी या प्राण्यांच्या कातड्यांपासून चामड्याच्या वस्तूंची निर्मिती होते, परंतु या प्राण्यांची हाडे, चरबी आदी अवशेषांपासून मानवाला उपयोगी पडणार्‍या बर्‍याच औषधांची निर्मिती होते. उदाहरणार्थ, शस्त्रक्रियेनंतर होणार्‍या वेदनांपासून मुक्तता मिळवण्यासाठी वापरण्यात येणारे औषध तसेच शस्त्रक्रियेदरम्यान वापरली जाणारी औषधे, दंतवैद्यकांसाठी लागणारी औषधे तसेच यापासून अस्थिरोगतज्ज्ञ किंवा सौंदर्य प्रसाधनांकरिता याचा वापर करतात. या सर्व उपचारांचे भारतामध्ये ‘सीएलआरआय’ या संस्थेने पेटंट मिळवले आहे. त्याचबरोबर कुत्रा आणि पोल्ट्री व्यावसायिकांसाठी खाद्यदेखील या अवशेषांपासून बनवले जाते. भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या सहकार्याने ‘सीएलआरआय’ या संस्थेने चामड्याच्या वस्तूंमध्ये नवीन कलात्मक डिझाइन तयार केले आहे. यामुळे भारतातील या प्रदेशातील कलाकुसर इतर राज्यांमध्ये पोहोचवली. त्यामुळे या प्रदेशातील कलाकारांना काम आणि उत्पन्नाचे साधन निर्माण करून दिले. ‘सीएलआरआय’ ही संस्था नवीन तंत्रज्ञान जगातील इतर राष्ट्रांना देण्याबरोबरच या तंत्रज्ञानाची देखभाल करण्याचे काम करते. सुदान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश या देशांमध्ये प्रामुख्याने तांत्रिक सल्ला देण्याचे कार्य संस्थेतर्फे केले जाते. ही संस्था पर्यावरणाच्या संतुलनाबरोबरच या उद्योगाची आर्थिक घडी सांभाळण्याचे महत्त्वाचे काम करते म्हणूनच महात्मा गांधींनी 1934 मध्ये या उद्योगाच्या मूलभूत विकासासाठी दिशादर्शक पावले उचलणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. ते उद्दिष्ट या संस्थेने देशी गुणवत्तेचा वापर करून गेल्या काही वर्षात साध्य केले आहे.