आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बरब्बाला सोडा, येशूला क्रुसावर खिळा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येशू ख्रिस्ताच्या वेळचा समाज कर्मठ धर्मकल्पना आणि कर्मकांडाच्या प्रभावाखाली होता. ज्यू लोकांचा महत्त्वाचा प्रेषित मोशे याचे नियमशास्त्र हे त्यांच्या रोजच्या जगण्याचे अधिष्ठान होते. मोशे जणू त्यांचा मनु (Law-giver) होता. त्याच्या ईशकल्पनेत (The concept of God) देवाला मानवापासून खूप दूर ठेवलेले होते. शिवाय ‘डोळ्याकरिता डोळा’ आणि ‘दाताकरिता दात’ अशा अत्यंत प्राथमिक न्यायकल्पनेत समाजाला बांधले होते. त्या वेळचा रांगडा समाज पाहता मोशेपुढे दुसरा पर्यायही नव्हता.


एक मोठे मंदिर, तेथे नित्य होणारे प्रायश्चित्त, अर्पण, होमहवन, पशुबळी इत्यादींतून मोठे हितसंबंध विकसित झालेले होते. धर्माच्या आधाराने धर्ममार्तंड समाजावर हुकमत गाजवीत होते.


येशू ईश्वराशी सरळ संबंध जोडणारे त्याचे तत्त्वज्ञान सांगू लागला तेव्हा पौरोहित्यावर अवलंबून असणा-या मध्यस्थांच्या व्यवस्थेला धोका निर्माण झाला. येशूच्या हातून अनेक चमत्कार झाल्याचे आपण बायबलमध्ये वाचतो, पण तो त्याचेही श्रेय स्वत:ला किंवा ईश्वराला देत नव्हता. अगदी आंधळ्यांना दृष्टी, कुष्ठरोग्याला रोगमुक्ती दिल्यावरही हा अवलिया सांगत होता, ‘तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे.’ (ल्यूककृत शुभवर्तमान 18:42) त्याचे प्रमुख निवेदन होते ‘आपले आचरण शुद्ध ठेवा, इतरांवर आणि ईश्वरावर स्वत:इतकेच प्रेम करा.’ प्रेम आणि क्षमा ह्या जीवनमूल्यांना येशूच्या तत्त्वज्ञानात सर्वात जास्त महत्त्व होते. त्यामुळे तो सांगत होता, ईश्वर कुणी न्यायाधीश नाही, तो तुम्हाला शासन करायला उत्सुकही नाही तर तो तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारा तुमचा वत्सल पिता आहे. तुम्हीही त्याच्यासारखी सर्वांवर प्रीती करा. येशूच्या तत्त्वज्ञानामुळे देवाच्या दलालांची दुकाने बंद होणार होती. शिवाय गोरगरीब समाज येशूमध्ये एक आदर्श राजा पाहू लागला होता. त्याने राज्य ताब्यात घेऊन लोकांचे जीवन सुधारावे, अशीही जनसामान्यांची इच्छा होती. म्हणून येशूच्या शिकवणुकीमुळे तेथील धर्मसत्ता आणि राजसत्ता चिंतेत पडली. ते सतत त्याच्या लोकप्रियतेला कसे रोखता येईल हा विचार करीत. येशूच्या जीवनात मात्र नवनवे चमत्कार होत होते. त्याने स्पर्श केला तर कुष्ठरोगी बरे होत, (ल्यूक 17: 11 ते 19) अंधांना दृष्टी प्राप्त होत असे, पक्षाघात झालेली माणसे आपल्या खाटेवरून उठून तीच खाट डोक्यावर घेऊन चालू लागत. काही मृत व्यक्ती कमरेतून उठून जिवंत बाहेर आल्या. यामुळे दुखणाईत आणि पीडित लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्याचे गुणगान करीत परत जात. हे सर्व शास्त्री-पंडितांना असह्य झाले. देवाच्या भक्तीचे, पापाच्या प्रायश्चित्ताचे, मोक्षाचे पेटंट तर त्यांच्याकडे होते आणि हा माणूस त्यांचा धंदा बिघडवून टाकीत होता. म्हणून ते सगळे मग एकत्र आले. त्यांनी प्रभूवर अनेक आरोप करून पाहिले.

‘हा मोशेचे नियमशास्त्र बाद ठरवतो, उपवासाच्या पवित्र दिवशी काम करतो. (योहानकृत शुभवर्तमान 9:16) कर देत नाही, स्वत:ला ईश्वराचा पुत्र म्हणवतो’, असे आरोप लावूनही त्याला गप्प करता येईना. शेवटी मंदिराच्या याजकाने 30 रुपयांची लाच देऊन त्याच्या यहुदा नावाच्या शिष्याला फोडले. रोमन शिपायांनी त्याला अटक केली आणि त्याच्यावर राजसत्तेविरुद्ध बंड केल्याचा तसेच स्वत:ला देवाचा पुत्र म्हणवून ईश्वरनिंदा (Blasphemy) केल्याचा आरोप लावला. (ल्यूककृत शुभवर्तमान 22:70,71) मात्र रोमन अधिकारी पिलात याला आपल्या चौकशीत प्रभू निर्दोष आढळला, त्याने तसे जाहीरही केले, पण लोकांनी ‘त्याला निर्दोष ठरवाल तर तुम्ही रोमन सम्राटाचे विरोधी ठराल’, अशी धमकी दिली. तेव्हा पिलाताने येशूला राजा हेरोदाकडे पाठवले. त्यानेही त्याला निर्दोष घोषित केले व परत पाठवले.

आता पिलाताकडे उपाय राहिला नाही. ज्यू लोकांच्या रीतीप्रमाणे एका कैद्याला सणाच्या दिवशी मुक्त करता येत असे. ह्या नियमाचा लाभ येशूला देण्याचा प्रयत्न केल्यावर लोक म्हणाले, बरब्बाला सोडा, येशूला वधस्तंभी खिळा! बरब्बा हा कैदी दंगा आणि खून ह्या संबंधात तुरुंगात टाकलेला होता. लोकांनी सणाचा नियम पाळण्यासाठी त्याला सोडण्याची आणि येशूला मृत्युदंड देण्याची मागणी केली! पिलात म्हणाला ह्या माणसाच्या हत्येचा दोष माझ्यावर नको, तुम्हीच त्याचे काय ते करा. शेवटी येशूला अनन्वित छळ करून, हातापायात खिळे ठोकून ठार मारण्यात आले. एकदा समाजाचा विवेक सुटला की तो खुनी आणि दंगेखोर माणसालाही सोडायला तयार होतो. मात्र, कर्मठ धर्मविचाराच्या प्रभावाखाली प्रेषितालाही फाशी देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज 2013 वर्षानंतरही ज्या समुदायाने येशूला ठार केले त्यातील एकाचेही नाव शिल्लक नाही. मात्र, प्रभू येशूचे नाव जगात लाखो अनाथाश्रम, मोफत दवाखाने चालवीत मानवजातीचे दु:ख निवारण करीत आहे. हाच त्याच्या तत्त्वज्ञानाचा खरा विजय आहे.


shreeneevas@gmail.com