आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगपुरुष राजर्षी शाहू महाराज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजगादीवरून अस्पृश्यवर्गाचा उघडपणे कैवार घेऊन तहहयात त्यांच्या उद्धाराचा ध्यास घेणारे राजर्षी शाहू महाराज एकमेव संस्थानिक असावेत. त्यांनी देशोद्धाराचा संबंध थेट अस्पृश्योद्धाराशी निर्भयपणे जोडला. सामाजिक ऐक्याशिवाय स्वराज्य हे अनिष्ट व अस्थिर होईल, हे पुन्हा पुन्हा सांगितले. ते म्हणत,‘अस्पृश्य हा शब्द निंद्य आहे. तुम्ही अस्पृश्य नाहीत, तुम्हास अस्पृश्य मानणा-या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान, जास्त पराक्रमी असे तुम्ही हिंदी राष्‍ट्रवादाचे घटक अवयव आहात, मी तुम्हास अस्पृश्य समजत नाही. निदान आपण बरोबरीची भावंडे आहोत.’
सामाजिक समता व राष्‍ट्रीय एकात्मता यासाठी राजर्षींनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन ते घडवूनही आणले. अस्पृश्य वस्तीत जाऊन त्यांच्या हातचे चहापाणी, जेवण घेण्यात धन्यता मानत. सहभोजनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी घडवून आणले. गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्याला त्यांनी उपाहारगृह चालवण्यास प्रोत्साहन दिले. त्यांच्या या कृतीकडे अनेकांनी आश्चर्य-कौतुकाने पाहिले, तर काहींनी तिरस्काराने-द्वेषाने आगपाखडही केली.


राजर्षींनी सर्वप्रथम 1902 मध्ये आरक्षणाचा कायदा व अंमलबजावणी करून देशात आरक्षणाचे व अस्पृश्यवर्गाच्या मानवी हक्काचे जनक म्हणून प्रथम मान पटकावला. ब्राह्मणी वर्चस्व समतेच्या आड येत असल्याची प्रचिती आल्याने त्यांनी प्रथम 25 जून 1918 रोजी कुलकर्णी व ग्रामजोशी वतने रद्द करून 29 जुलैपासून तलाठी पद्धत कायम केली. बहुजन समाजातून त्यांनी तलाठ्यांची पदे भरणे सुरू केले. संस्थानातील सर्व खात्यांत अस्पृश्यांना अग्रक्रम दिला. शिवाय खात्याचे मुख्याधिकारी म्हणून नेमणुका देण्याची सक्ती केली. 26 जून 1918 रोजी अस्पृश्यांवर कामाची सक्ती करू नये, अशी घोषणा केली व वेठबिगारीतून त्यांची कायमची सुटका केली. 27 जुलै 1918 रोजी एका खास आज्ञेद्वारे गुलामगिरी नष्ट करण्याचे ठरवून चावडी व पोलिस ठाण्यावरील हजेरी कायमची बंद करून अस्पृश्यावरील गुन्हेगारीचा डाग कायमचा पुसून टाकला. 1 जानेवारी 1919 रोजी खास हुकूम काढून अस्पृश्यांना सामाजिक समतेच्या मूलभूत तत्त्वाप्रमाणे वागणूक द्यावी, तो कोणी पशू आहे,असे समजून त्याला हाकलून देऊ नये, अशी आरोग्य खात्यास आज्ञा केली. ही राजाज्ञा ज्यांना मान्य नसेल, त्यांनी राजीनामा द्यावा, मात्र अशा नोकराला निवृत्तिवेतन मिळणार नाही, असे आदेशच जारी केले.


अस्पृश्यवर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाचा त्यांनी पुरस्कार केला. या संबंधाने त्यांची संकल्पना होती की, ‘सत्ता केवळ अल्पसंख्याक उच्चवर्गीयांच्या हातात जाण्यात स्वराज्याचे पर्यवसान होऊ नये म्हणून निदान दहा वर्षे तरी आम्हास जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असला पाहिजे.’


स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सरकारने मान्य करावी म्हणून राजकारणातील अस्पृश्यांच्या सहकार्याबद्दल महाराजांनी ब्रिटिश सरकारला आश्वासन दिले होते. राजर्षींनी असे सांगितले की, सरकारी नियुक्त सभासद आणि स्वतंत्र मतदारसंघाने निवडून दिलेला प्रतिनिधी यात मोठा फरक असून नियुक्त सभासद अत्यंत निष्प्रभ असतो. त्याच्या मताची किंमत कमी असते, हेही महाराजांनी नमूद केले.


अस्पृश्यवर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ मिळावेत यासाठी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचार करण्यासाठी कोठारी यांना रक्कम देऊन तयार केले होते. मुंबईचे पुढारी सी. के. बोले यांच्या लोकसंघ युनियनचे राजे आश्रयदाते होते. स्वतंत्र अस्पृश्य मतदारसंघ निर्माण करण्याचे युनियनचे ध्येय होते. एके ठिकाणी तर स्वत: राजर्षींनी घोषणा केली की,‘मी लवकरच स्वराज्याचे अधिकार मोठ्या प्रमाणावर देणार आहे. त्याचा फायदा सर्वांना आणि अस्पृश्य मानलेल्यांनाही झाला पाहिजे.’ याच काळात कोल्हापूर नगरपालिकेच्या निवडणुकीला स्वतंत्र मतदारसंघाचे तत्त्व लागू केले. त्यांना स्वतंत्र मतदारसंघच पाहिजे होते. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्वतंत्र मतदारसंघाला कडवा विरोध केला होता. त्यांनी मराठा लीगची स्थापना केली.


मुंबईचे राज्यपाल जॉर्ज लॉईड यांनी स्वतंत्र मतदारसंघ मंजूर करावेत म्हणून राजर्षींनी त्यांचे मन वळवण्याचे अनेक प्रयत्न केले. हे पाहून इंग्रज अधिकारीही चकित झाले होते. याचाच परिणाम म्हणून मद्रास प्रांतात स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आला. गुन्हेगारीबद्दलची हजेरी, वेठबिगारी, अस्पृश्यता निर्मूलन, आरक्षणाबद्दलही असेच म्हणता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती देऊन शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवले. डॉ. आंबेडकरांना आपले नेते म्हणून स्वीकार करण्याबद्दल राजर्षींनीच अस्पृश्य समाजाला चालना दिली. डॉ. बाबासाहेब विलायतेहून भारतात परतले तेव्हा त्यांना भेटण्यासाठी महाराज स्वत: मुंबई येथील चाळीत गेले. तसेच बाबासाहेबांच्या कोल्हापूरभेटीत सजवलेल्या घोड्यावरून त्यांची मिरवणूक काढली. मानगावच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भरजरी फेटा बांधून त्यांचा सत्कार केला.