आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ वाचवण्याचा संकल्प करूया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच दोन महत्त्वाच्या घटना घडल्या, ज्यांनी व्याघ्रप्रेमींच्या भावविश्वाला हादरवून सोडले. पहिली म्हणजे देशातील वाघांचा सर्वात मोठा शिकारी आणि तस्कर अशी ओळख असलेल्या संसारचंदची सबळ पुराव्याअभावी राजस्थान तुरुंगातून सुटका झाली. दुसरी घटना म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क (उत्तराखंड) मध्ये एकाच आठवड्यात तीन वाघ मृतावस्थेत आढळले. हिमालयाच्या कुशीतही वाघ सुरक्षित नसल्याचेच यावरून स्पष्ट होते. देशातील या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन-अडीच वर्षांत 32 वाघ मारले गेले आहेत. हा आकडा निश्चितच क्लेशकारक आणि धोकादायक आहे. 1973 च्या एप्रिल महिन्यात याच अभयारण्यातून ‘प्रोजेक्ट टायगर’ला प्रारंभ झाला; पण आता तेथे अशी परिस्थिती आहे.


आज जागतिक व्याघ्र दिन. गेल्या सहा-सात वर्षांपासून हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. जगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात. जगातील एकूण वाघांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे जगभरातील सर्व पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरण संरक्षकांची आशा भारतावरच टिकून आहे...पण भारतात तरी वाघ पूर्णपणे सुरक्षित आहेत का? ‘वाघ वाचवा’ अभियानात प्रत्यक्षात काही काम सुरू आहे की फक्त भावनिक पातळीवर हळहळ व्यक्त होतेय? वाघ, सिंह, हत्ती, हरिण, माकड, अस्वल, गेंडा, खार, निरनिराळ्या चिमण्या, साप, कासव, नाजूकशी भिरभिरती फुलपाखरे या सगळ्यांचे पालनपोषण करणारी नैसर्गिक वने आणि डोंगर-द-यांचे संरक्षण खरेच आवश्यक आहे का? जागतिक व्याघ्रदिनी या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण शोधायला हवीत. काही ठोस संकल्प करायला हवेत. ज्यांंनी जंगलात एकदाही मुक्काम केलेला नाही आणि जे आयपीएल-बॉलीवूडचे मसालापट-चकाकत्या मॉल्समध्ये खरेदीतच कदाचित आनंद मानतात, त्या हजारो-लाखो भारतीयांना जंगलाचे महत्त्व पटवून देणे कठीण असू शकते; पण जे लोक उपभोगवादाच्या अतिरेकाचे धोके जाणतात त्यांना वने वाचली तर पाणी वाचेल, वने वाचली तरच वाघ वाचतील याची जाणीव आहे. आज तर अशी परिस्थिती आहे की, वाघ वाचले तरच वने वाचणार आहेत.

वनराई, डोंगर-द-या किंवा नद्यांच्या प्रवाहात केलेल्या हस्तक्षेपाचे भयंकर परिणाम आपण उत्तराखंडात पाहिले,
सोसले आहेत. वने वाचवण्याविरोधात कार्यरत असलेली सशक्त लॉबी भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, असे प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरूचे माजी प्राध्यापक डॉ. माधव गाडगीळ यांचे मत आहे. आज सतत आणि बेसुमार जंगलतोडीमुळेच वाघांच्या संरक्षणावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. एकीकडे वाघांचे नैसर्गिक निवासस्थान उद्ध्वस्त होत असताना खासदार मात्र मौन बाळगून आहेत. व्याघ्रतज्ज्ञ डॉ. उल्हास कारंथ यांच्या मते, वाघांच्या नैसर्गिक निवासस्थानात (टायगर हॅबिटॅट) मानवाचा वावर बंद होत नाही तोवर वाघांची शिकार होतच राहील. वाघ वाचवण्याच्या मोहिमेत हे मोठे आव्हान आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात आपला निर्णय दिला आहे.

फोफावलेला भ्रष्टाचार, उपभोगवादाचा अतिरेक आणि वने तसेच खाण माफियांना मिळणारे राजकीय संरक्षण या बाबी वनसंपदेला वाळवीसारख्या नष्ट करीत आहेत. माफियांना हे संरक्षण कसे मिळते हे सर्वश्रुत आहे. फक्त कॉर्बेट (उत्तराखंड) अभयारण्यातूनच वाघांच्या शिकारीच्या दु:खद बातम्या येत नाहीत, तर बांधवगड (मप्र), ताडोबा (महाराष्‍ट्र), नागरहोळे (कर्नाटक) तसेच रणथंबोर (राजस्थान) येथूनही येत असतात. 50 हजार किंवा फार तर एक लाख रुपयांच्या मानवी मोहासाठी वाघांना जीव गमवावा लागतोय. बेकायदा शिकारीचा धोका आहेच; पण एखाद्या भुकेल्या वाघाने जंगलाजवळच्या शेतातून एखादे जनावर (गाय, म्हैस, बकरी इ.) मारून पोट भरले तर ते पशुपालकही वाघाच्या जिवावर उठतात. वाघाचा काटा काढण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. याच कारणाने तामिळनाडूत सत्या मंगलम व्याघ्र अभयारण्यास स्थानिक लोक विरोध करत आहेत.
अशा प्रकरणांत केंद्र सरकारने जनावरांच्या नुकसानभरपाईची तरतूद केली आहे, पण तरीही वाघ आणि मानव यांच्यातील हे द्वंद्व संपलेले नाही.

वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर (डब्ल्यूडब्ल्यूएफ) सारख्या बिगरशासकीय संस्था जनावरांची नुकसानभरपाई रोखीने देतात. आजही अनेक राष्‍ट्रीय उद्याने वा अभयारण्यांमध्ये गावे वसलेली आहेत. एवढे सगळे असले तरी 1973 मध्ये इंदिरा गांधी यांनी जातीने लक्ष घालून सुरू केलेला ‘प्रोजेक्ट टायगर’ म्हणजेच सध्याचे ‘राष्‍ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण’, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील ‘राष्ट्रीय वन्यप्राणी मंडळ’ आणि केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतूनही वाघ संरक्षणासाठी ठोस उपाययोजना का होऊ शकत नाहीत?


निसर्गाचा विनाश विरुद्ध मानवाचा विकास, ही जुनी लढाई आता वाढत्या लोकसंख्येमुळे अक्राळविक्राळ रूप घेते आहे आणि बिचारा वाघ त्यात भरडला जाऊन अखेरच्या घटका मोजतो आहे. प्रत्यक्षात संरक्षण उपायांची सध्या वानवा नाही, जनजागृतीचा वेगही चांगला आहे, वाघ संरक्षणासाठी खासगी क्षेत्रानेही पुढाकार घेतला आहे. मात्र, 2011 च्या व्याघ्र गणनेनुसार वाघांच्या सध्याच्या 1706 या संख्येत पुढच्या गणनेपर्यंत किती वाढ होते किंवा घट होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या वेळच्या गणनेत वाघांची संख्या 1411 वरून 1706 झाली होती. देशभरातील 39 व्याघ्र प्रकल्पांमध्ये 295 वाघ वाढले होते. संरक्षणासाठी चोहीकडून वाढणारा दबाव, नवा कायदा आणि जनजागृती यामुळेच हे शक्य झाले होते. ही वाढ कायम ठेवणे हेच सर्वांपुढील प्रमुख आव्हान आहे.
आज जागतिक व्याघ्रदिनी आपण सगळे देशबांधव हा सुंदर वारसा जपण्याचा संकल्प करू शकणार नाही का? आपली वनसंपदा आणि एकूणच पर्यावरणाचे संरक्षण-संवर्धन याबाबत आपण आता तरी गांभीर्याने विचार करणार आहोत का?


(लेखक मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाचे सदस्य
आणि ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर आहेत.)
abhilash@dainikbhaskargroup.com