आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घे भरारी...(अग्रलेख )

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील आघाडीच्या टाटा उद्योगसमूहाने ‘सिंगापूर एअरलाइन्स’ समवेत संयुक्त क्षेत्रात हवाई उद्योगातील नवीन कंपनी स्थापन करून कॉर्पोरेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. खरे तर ‘टाटा समूह’ व ‘सिंगापूर एअरलाइन्स’ यांच्यात पडद्यामागे वाटाघाटी पूर्वीच झाल्या होत्या. पण पुढे ते प्रकरण गुलदस्त्यात गेले. म्हणूनच आश्चर्य यासाठी की, जेमतेम सात महिन्यांपूर्वीच टाटा उद्योगसमूहाने आशिया खंडातील आघाडीची लो-कॉस्ट एअरलाइन्स ‘एअर एशिया’समवेत देशात हवाई कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी लवकरच कार्यान्वित होण्याच्या अवस्थेत असताना आता या नवीन कंपनीची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन कंपनीत 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावानुसार, या कंपनीत टाटा समूहाचे 51 टक्के व सिंगापूर एअरलाइन्सचे 49 टक्के भांडवल असेल. सुमारे 70 अब्ज डॉलर गुंतवणूक असलेल्या व पाचही खंडांत उलाढाल करणा-या टाटा समूहाने मात्रहवाई उद्योगात प्रवेश करण्याचा निर्णय अतिशय व्यवहारी व धोरणात्मकरीत्या घेतला आहे. टाटा समूह मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या अनेक क्षेत्रांत कार्यरत असला तरीही हवाई उद्योगात स्थिरावणे सोपे नाही, याची पूर्ण कल्पना टाटांना असल्याने त्यांनी दिग्गज सहकारी कंपनी निवडली आहे. ‘एअर एशिया’ने जगापुढे लो-कॉस्ट एअरलाइन्सचा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन देशातील मध्यमवर्गीयांची बाजारपेठ काबीज करण्यासाठी लो-कॉस्ट विमान सेवा सुरू करण्याचे टाटांनी ठरवले. तर उच्च आर्थिक गटातील व कॉर्पोरेट क्लायंटसाठी सिंगापूर एअरलाइन्सप्रमाणेच आलिशान सेवा देणारी दुसरी एक हवाई कंपनी स्थापन करण्यात आली.

आज भारतात या दोन्ही बाजारपेठांचे आकारमान मोठे आहे आणि झपाट्याने विस्तारत आहे. या दोन्ही कंपन्यांच्या परस्पर हिताला बाधा येणार नाही याची पूर्ण दखल घेण्याची खबरदारी टाटांनी घेतली आहे. सध्या दिवाळखोरीत निघालेल्या विजय मल्ल्या यांच्या ‘किंगरफिशर एअरलाइन्सने’देखील या दोन्ही ग्राहकांना डोळ्यापुढे ठेवून विमान कंपनी सुरू केली होती. मात्र त्या एकाच कंपनीचा भाग असल्याने त्यांचा पूर्णपणे विचका झाला होता. त्यामुळेच टाटांनी या दोन भिन्न आर्थिक गटांतील प्रवाशांची गरज भागवण्यासाठी दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्याचे ठरवले. सध्या अर्थव्यवस्थेत मरगळ असताना व विकास दर पाच टक्क्यांवर घसरलेला असताना ‘सिंगापूर एअरलाइन्स’ व ‘एअर एशिया’ या दोन हवाई कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत. त्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास दृढ होतो. सध्याची ही मरगळ अर्थातच फार काळ टिकणारी नाही. येत्या दोन वर्षांत पुन्हा अर्थव्यवस्था पूर्वीसारखी वेग घेईल, असा विश्वास या विदेशी गुंतवणूकदारांना वाटतो. हवाई क्षेत्र थेट विदेशी गुंतवणुकीसाठी खुले झाल्यावर आलेला हा तिस-या विदेशी कंपनीचा प्रस्ताव आहे. त्यामुळे सध्या जागतिक पातळीवर मंदी असतानाही थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ आपल्याकडे येत आहे, ही सकारात्मक घटना म्हणावी लागेल. हवाई उद्योग हा नेहमीच तेजी-मंदीच्या हेलकाव्यांवर अवलंबून असतो. मंदीची चाहूल लागताच पहिला फटका याच उद्योगाला सहन करावा लागतो. हे वास्तव स्वीकारले तरी भारतीय हवाई उद्योगाची बाजारपेठ झपाट्याने विस्तारत असल्याचा फायदा या बहुराष्ट्रीय कंपन्यांना उठवायचा आहे. सध्या देशांतर्गत व विदेशी अशा 15 कोटी भारतीय हवाई प्रवाशांची एकूण बाजारपेठ आहे. 2020 मध्ये ही बाजारपेठ 45 कोटी प्रवाशांवर पोहोचेल आणि अमेरिका, चीनच्या खालोखाल भारतात तिसरी मोठी हवाई बाजारपेठ होईल, असा अंदाज आहे. गेली तीन वर्षे देशातील हवाई उद्योगासाठी अत्यंत वाईट गेली. मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या ‘किंगफिशर’ने दिवाळे काढल्यावर ‘इंडिगो’ ही कंपनी वगळता देशातील सर्वच हवाई कंपन्या तोट्यात गेल्या आहेत. इंधनाचा वाढीव खर्च व कर्मचा-यांवरील खर्चात झालेली वाढ ही यामागची प्रमुख कारणे. यातील सरकारी कंपनी एअर इंडियाचा तोटा तर 5700 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याच्या जोडीला ‘जेट एअरवेज’, ‘जेट लाइट’, ‘स्पाइसजेट’, ‘गो एअर’ या सर्वच कंपन्यांचे तोटे चिंताजनक आहेत. असे असतानाही टाटा उद्योगसमूहाने विदेशी कंपन्यांना सोबत घेऊन हवाई कंपनी स्थापन करणे, हे एक धाडसच ठरावे. परंतु सतत ‘बॅड वेदर’चा सामना करणारा हा उद्योग मंदीतच सुरू केला तर पुढील काळात चांगली तग धरतो, हे सूत्र ‘एअर एशिया’ने सिद्ध करून दाखवले आहे. कदाचित यातून टाटांनी धडा घेण्याचे ठरवले असावे. स्वातंत्र्यानंतर सरकारने ‘टाटा एअर’ या टाटा समूहाच्या मालकीच्या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केल्यावर गेल्या अर्धशतकात जे.आर.डीं.पासून ते रतन टाटा यांनी या उद्योगात पुन्हा आपले पाय रोवण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यांच्या या स्वप्नाची पूर्तता आता टाटा समूहाचे विद्यमान अध्यक्ष सायरस मिस्त्रींच्या काळात झाली आहे. दोन दशकांपूर्वी अर्थव्यव्यवस्था खुली झाल्यावर टाटांनी यासंबंधी केलेला प्रयत्न काही यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर 12 वर्षांपूर्वी ‘सिंगापूर एअरलाइन्स’ समवेत संयुक्त कंपनी स्थापन करण्याची घोषणाही केली होती. मात्र टाटांच्या या विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही. वर्षापूर्वी सरकारने हे क्षेत्र खुले केल्यावर टाटांनी एक नव्हे, दोन कंपन्या या उद्योगात स्थापन केल्या आणि हा समूह हवाई क्षेत्र काबीज करण्याच्या ईर्षेने पेटला आहे. अर्थात, सध्याच्या या उद्योगातील कंपन्या व नव्याने येणा-या कंपन्या यांच्यातील व्यापारी युद्धाचा ग्राहकांचा फायदा होणार, हे नक्की. त्यामुळे टाटांची ही भरारी ग्राहकांना फायदेशीर ठरावी व यातून हवाई उद्योगाची बाजारपेठही विस्तारावी, अशी अपेक्षा आहे.