आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंजारांचा ‘लेटरबॉम्ब’(अग्रलेख)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबूराव अर्नाळकरांपासून शेरलॉक होम्सपर्यंत आणि अगदी अ‍ॅगाथा ख्रिस्तीपासून रहस्य चित्रपट बनवणा-या बी. आर. चोप्रांपर्यंत सर्वांनी त्यांच्या साहित्य-संशोधनातून एक गोष्ट वारंवार आणि आवर्जून सांगितली आहे की, खुनाला वाचा फुटतेच! जेव्हा एक नव्हे तर अनेक खून झालेले असतात किंवा हत्याकांडेच झालेली असतात, तेव्हा त्या सर्व मृतांना ती वाचा फुटते. हिटलरने भूतलावरील सर्व ज्यूंना ठार करण्याचा विडा उचलला होता. ठिकठिकाणी छळछावण्या उभारून हिटलरने एक प्रकारचे कत्तलखानेच सुरू केले होते. एकूण साठ लाख ज्यूंना ठार मारले गेले. अवघे जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या हिटलरला त्या रक्ताची नशा चढली होती. परंतु त्या छळछावण्या पुढे बोलू लागल्या आणि नाझींनी केलेल्या सर्व खुनांना वाचा फुटली. अर्थातच त्या हत्याकांडांना युरोपियन इतिहासाचे परिमाण होते. तुलनेने गुजरातमधील 2002मध्ये झालेले हत्याकांड हे तसे मर्यादित म्हणावे लागेल-जरी त्यातही जवळजवळ दोन हजार मुस्लिम मारले गेले.

अतिरेकी हिंदुत्वाचा तो उग्र उन्मादी आविष्कार होता. त्या हिंसाकांडाच्या वेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या हत्याकांडानंतरही दहशतवाद्यांचे ‘एन्काउंटर’ करण्याचे निमित्त करून काही निष्पापांचे बळी घेतले गेले. त्या वेळेस गुजरातचे गृहमंत्री होते अमित शहा. गेल्या 10 वर्षांत या सर्व खुनांच्या अनेक चौकशा झाल्या. कधी राज्यपातळीवर तर काही सीबीआयमार्फत. काही चौकशा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून केल्या होत्या. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थात असे काहीही घडल्याचा इन्कार केला होता. परंतु चौकशांमधून जसजसे पुरावे बाहेर येऊ लागले, तसतसे मोदींचे काही सहकारी मंत्री, काही पोलिस अधिकारी आणि काही नोकरशहा जाळ्यात सापडू लागले. परंतु हिंदुत्वाचा उन्माद आणि नरेंद्र मोदींचे प्रचारकौशल्य यामुळे एक प्रकारचे वातावरण गुजरातमध्येच नव्हे तर देशभर निर्माण झाले होते. त्या उन्मादाची दहशत प्रशासनावर होतीच, पण संघ परिवारामध्येही बसू लागली होती.

मोदींची लोकप्रियता जितकी वास्तव होती तितकीच अवास्तवही. त्या लोकप्रियतेचाही दबदबा तयार झाला होता. ज्या नोकरशाहीमार्फत व पोलिस अधिका-यांमार्फत हे दरा-याचे प्रशासन चालवले जात होते, त्या दरा-याचा पडदा पूर्वीच फाटू लागला होता. संजीव भट यांच्यासारखे ज्येष्ठ पोलिस अधिकारी मोदींचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न करीत होते. पण त्याच वेळेस 2012च्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. नरेंद्र मोदी लागोपाठ तिस-यांदा बहुमताने निवडून आले आणि त्यामुळे त्यांच्या समर्थकांना आणि त्यांनाही आपण अजिंक्य असल्याचा भास होऊ लागला. गेली सुमारे 10 वर्षे जोपासलेली पंतप्रधान बनण्याची मोदींची महत्त्वाकांक्षा आता थेट अश्वमेधावर चढवली गेली. लोकसभा निवडणुका मे महिन्यात, म्हणजे आणखी आठ महिन्यांनी होणार असल्या तरी मोदींना स्वत:चा राज्याभिषेक करण्याची इतकी घाई झाली आहे की त्यांनी मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी मागणी केली आहे. भाजपचे एक शिष्टमंडळ तशी मागणी करण्यासाठी राष्ट्रपतींनाही भेटले होते.

काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार चक्रव्यूहात सापडलेले असल्यामुळे त्यांची प्रतिकारशक्तीही क्षीण झाली आहे. म्हणजेच वातावरण भाजपला व मोदींना अनुकूल आहे, असे वाटत असतानाच गुजरातमधील एका ज्येष्ठ, आयपीएस, पोलिस अधिका-याने त्या वातावरणात एक ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. डी. जी. वंजारा हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अतिशय विश्वासू पोलिस अधिकारी. वंजारांनी तर त्यांच्या पत्रात म्हटले आहे की, ते मोदींना ‘देवासमान’ मानत होते. त्यांची इच्छा म्हणजे त्यांची आज्ञा. मोदींचे अत्यंत निकटचे आणि विश्वासातले सहकारी अमित शहा मोदींचे गृहमंत्री. मोदींचे 10 वर्षांपूर्वी असलेले गृहमंत्री हरेन पंड्या यांची हत्या झाली होती. त्या हत्येचे गूढ अजून अधिकृतपणे उलगडले नसले तरी पंड्यांचे वडील त्या खुनाला मोदींनाच जबाबदार धरतात. अमित शहा यांची गृहमंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर ‘एन्काउंटर’चे प्रकार वाढू लागले.

इशरत जहाँच्या ‘एन्काउंटर’मुळे तर देशभर निषेधाची लाट उसळली आहे. सोहराबुद्दीन शेख आणि तुलसीराम प्रजापती यांच्याही हत्येची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमार्फत होऊ लागली. अमित शहा यांच्यावरच ‘एन्काउंटर’चा कट रचल्याचा आरोप होेऊन त्यांना अटकही झाली. तो खटला चालू आहे. पण अमित शहा यांना राजकीय संरक्षण पुरवण्याचे मोदींनी व भाजपने ठरवले. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश हे 80 जागा असलेले सर्वात मोठे राज्य अमित शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात हिंदुत्वाच्या उन्मादाचे आणि दोन समाजात राजकीय फाळणी करण्याचे धोरण अवलंबले. उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेला समाजवादी पक्ष आणि केंद्रातील काँग्रेस बचावात्मक पवित्र्यात गेले. या स्थितीत वंजारांनी ‘लेटरबॉम्ब’ टाकून येणा-या निवडणुकांच्या राजकारणाला जबरदस्त कलाटणी दिली आहे. वंजारा गेली सात वर्षे खुनाच्या आरोपामुळे तुरुंगात आहेत. त्यांचे बरेच पोलिस सहकारीही तुरुंगाची हवा भोगत आहेत.

मोदी व अमित शहा यांनी या सर्व ज्येष्ठ-कनिष्ठ पोलिसांना त्या ‘हवेवर’ सोडून दिले आहे, पण स्वत: मात्र सत्तेच्या राजकारणात मश्गूल आहेत. ‘आपण (म्हणजे या सर्व पोलिसांनी) सर्वकाही शहांच्या आदेशानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व त्यांच्या हमीवर केले, परंतु आता आमचा बळी देऊन आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले जात आहे; खरे गुन्हेगार बिनदिक्कत आणि बिनधास्त मोकाट सुटलेले आहेत आणि आज्ञेचे पालन करणारे आम्ही तुरुंगात खितपत पडलो आहोत,’ असे वंजारा यांनी म्हटले आहे. ज्यांना आम्ही ‘देवासमान’ मानले त्या मोदींनी आम्हाला वा-यावर सोडून देऊन आपली पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी जंग जंग पछाडायला सुरुवात केली आहे. सत्य लोकांसमोर यावे म्हणूनच मी हे पत्र लिहीत आहे,’ असे वंजारांनी म्हटले आहे. वंजारांच्या या पत्राने मोदींचा अश्वमेध अडवला आहे आणि विशेष म्हणजे, संघ परिवारातील मोदीविरोधक आता खासगीत वंजारांच्या बाजूने बोलू लागले आहेत!