आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीकृष्ण : एक कुशल प्रशासक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान श्रीकृष्णाचे चरित्र अनेक ऋषिमुनी, पंडित, भक्त यांनी आपापल्या परीने गायिले आहे. महाभारत, श्रीभागवतपुराण, श्रीविष्णुपुराण, हरिवंश इ. ग्रंथांतून ते विस्ताराने वर्णित आहे. बहुधा सर्व भारतीय भाषांतून उपलब्ध आहे. या सर्वांतून श्रीकृष्ण कुशल योद्धा, निपुण राजनीतिज्ञ, उत्तम वक्ता, आदर्श मित्र असे चित्र रेखाटले आहे. तो आदर्श पिता, आज्ञाधारी पुत्र, गुरुनिष्ठ शिष्य, जिवलग बंधू होता हे स्पष्ट होते.


परंतु तो कुशल प्रशासकही होता, हे जरी अनेक प्रसंगांतून दिसून येते, तरी त्याच्या जीवनाचा हा पैलू अनेकदा झाकोळून गेल्यासारखे वाटते. अद्भुत वर्णनाच्या हव्यासापोटी हे घडले असावे. उपकार आणि अपकारसुद्धा जाणून सतत आठवणारा, तपोवृद्ध-ज्ञानवृद्ध यांची सेवा करणारा, विनयशील, सत्त्वशील, कुलीन, सत्यवक्ता आणि पवित्र असावा. याशिवाय योग्य कार्याचा शीघ्र निर्णय घेणारा शास्त्रज्ञही असला पाहिजे. ही सारी लक्षणे श्रीकृष्णामध्ये होती. त्याच्या जीवनातील काही प्रसंग पाहिले तर लक्षात येते. वस्तुत: तो राजा नव्हता. परंतु समकालीन प्रबळ राजांवर त्याचा प्रभाव होता. त्याने त्या राजांना प्रशासनाचे धडे दिले होते. जरासंध हा त्याचा प्रबळ शत्रू. त्याने शतावधी तरुणांना कारागृहात डांबून ठेवले होते. तो त्यांचा बळी देणार होता. जरासंधाचा वध करून श्रीकृष्णाने त्यांना सोडवले आणि उत्तम प्रशासन कसे करावे, याचा पाठच शिकवला. धर्मानुसार राज्य चालवावे, अहंकार पूर्णत: वर्ज्य करावा, प्रजाहित हेच उद्दिष्ट मानावे, त्यासाठी स्वत: वाटेल तो त्याग करावा. प्रसंगी कोणतेही दु:ख सहन करावे, अशी शिकवण दिली.


वयाच्या अकराव्या वर्षी तो वृंदावनातून मथुरेला गेला. त्याने कंस आणि त्याचे दुरात्मे सहकारी यांचा वध केला. इथून त्याचे प्रशासनाचे कार्य सुरू झाले. त्याने आई देवकीच्या चुलत्याला अर्थात उग्रसेनाला गादीवर बसवले. हे सत्तापद खरे तर श्रीकृष्णानेच स्वपराक्रमाने मिळवले होते. पण नि:स्वार्थ श्रीकृष्णाने ते आजोबांकडे सोपवले. लगेच त्याने मृतांच्या - ते शत्रू होते तरी - कुटुंबीयांना सुरक्षिततेचे दृढ आश्वासन दिले आणि मृतांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार सन्मानपूर्वक केले. तत्काळ त्याने दुसरा निर्णय घेतला. कंसाच्या अन्यायाच्या भयाने पळून जाऊन परदेशात अज्ञात जीवन जगणा-या मूळ मथुरावासी नागरिकांना त्याने प्रेमादराने बोलावून आणले. कंसाने लुटलेली त्यांची सर्व संपत्ती त्यांना परत तर दिलीच, किंबहुना त्यांना आपल्या व्यवसायाचे पूर्ण स्वातंत्र्य देऊन सुरक्षिततेची खात्री दिली. यामुळे मथुरेला पूर्वीचे वैभव प्राप्त झाले. मथुरेत दोन गणराज्ये होती. एक उग्रसेनाचे व दुसरे शूरसेनाचे. पण श्रीकृष्णाने दोन्ही राज्ये एकत्र आणून एक बलिष्ठ राज्य उभे केले. प्रशासकाने शीघ्र निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणी कशी करावी, याचे हे एक आदर्श उदाहरण होय. असे निर्णय घेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती लागते, ती श्रीकृष्णामध्ये होती, हे निर्विवाद सत्य होय.


समाजरूढींचा आदर प्रशासकामध्ये असायलाच हवा, हे श्रीकृष्णाने आपल्या आचरणाने दाखवून दिले. अकराव्या वर्षी क्षत्रियाचे उपनयन करावे, ही शास्त्राज्ञा व समाजरूढी. श्रीकृष्णाने ती अगदी मन:पूर्वक पाळून गायत्री मंत्रदीक्षा पुरोहिताकडून घेतली. गायत्री जप, अग्निकार्यही केले. नंतर विद्याध्ययनासाठी सांदिपनीकडे गेला. आपण एका राज्याचे प्रशासक आहोत, लोक आपल्याला अवतार मानतात, असा कुठलाच आव न आणता गुरूंकडे तो क्षात्रोचित विद्या शिकला. आपण युद्ध करतो, त्याचा उपद्रव निरपराध प्रजेला होता कामा नये. प्रजा ही ख-या संपदेची, संपन्नतेची वास्तविक चावी आहे, एवढे भान असलेला तो एक उत्तम प्रशासक होता, असेच म्हणावे लागते. जरासंध आणि कालयवन या समर्थ शत्रूंना त्याने धूळ चारली. युद्धानंतर पराजित शत्रूंची सर्व युद्धसामग्री त्याने लुटली व ती राज्यप्रमुख उग्रसेनाला अर्पण केली. नि:स्वार्थ प्रशासकाचा आणखी एक आदर्श त्याने उभा केला. धर्मराजाच्या राजसूय यज्ञात त्याने कुशल प्रशासकाचे कार्य केले. राजकारणातच नव्हे तर धर्मकार्यातही त्याने प्रशासन कौशल्याचे दर्शन घडवले. दीर्घकाळ चालणा-या यज्ञाचे व्यवस्थापन त्यानेच ठरवून दिले. त्याने कणीकडे दानाचे, द्रौपदीकडे स्वयंपाकसिद्धीचे, भीमाकडे भोजन प्रबंधनाचे कार्य सोपवले. स्वत:कडे मात्र येणा-या अतिथींच्या स्वागताचे कार्य घेतले. यानिमित्ताने यज्ञात कोणी विघ्नकर्ता येणार नाही, याकडे त्याला लक्ष ठेवता येणार होते.


बाकीची माणसे आपापल्या कामात निपुण होतीच. इथे कृष्णाचे प्रशासन सुफल संपूर्ण झाले. भारतीय युद्धात धृष्टद्युम्न हा जरी सेनापती होता, अर्जुन हा निष्णात धनुर्वेत्ता, भीम हा समर्थ गदायोद्धा होता, पण या सर्वांवर नियंत्रण होते ते श्रीकृष्णाचेच. त्यांच्यात मंत्रणेने युद्धयंत्रणा कार्यरत असायची. त्यामुळे पांडवांना निर्विवाद विजय मिळाला. एकूण तो राजनीती, धर्मक्षेत्र, युद्धशास्त्र अशा सर्वच क्षेत्रांत अत्यंत कुशल प्रशासक होता, हे स्पष्ट होते.