आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम आणि मैत्रीचा फार्म्युला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुनियादारी हा मराठी चित्रपट सध्या तिकीटबारीवर तुफान यशस्वी झालेला आहे. अनेक ठिकाणी याचे शो वाढवावे लागले, काही ठिकाणी ब्लॅकमध्ये तिकिटे विकली जात आहेत. चित्रपटाला रिपिट ऑडियन्स आहे. बुक माय शो या ऑनलाइन तिकीट विक्री करणा-या साइटवरून याची तिकिटे मोठ्या प्रमाणात विकली जात आहेत. मुख्य म्हणजे या चित्रपटाला तरुणाईची गर्दी आहे. सहसा मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट बघत नाही. त्यातही मराठी चित्रपट बघणारे मराठी तरुण तर फारच कमी असे चित्र असताना दुनियादारीला इतके यश कसे मिळाले?
लेखक सुहास शिरवळकर यांची दुनियादारी ही 1970 दशकातील कादंबरी. त्या काळी अतिशय गाजलेली. तिच्या अठ्ठावीस आवृत्त्या निघालेल्या आहेत. ही कादंबरी व सुहास शिरवळकरांचा निष्ठावंत वाचकवर्ग यामुळे चित्रपटाला यश नक्कीच मिळाले. तथापि सुहास शिरवळकर हे नाव माहीत नसलेलेही चित्रपटाला गर्दी करतात. त्यामुळे चित्रपटाच्या यशात कादंबरीच्या नावाचा वाटा मोठा आहे, हे मान्य करूनही तरुणवर्ग त्यांच्या नावामुळे चित्रपटाला गेला, असे म्हणता येणार नाही. दुसरे कारण असे चित्रपटाचे मार्केटिंग म्हणजे चित्रपट येण्याआधीची व नंतरची पब्लिसिटी. याकरता चित्रपटाच्या टीमने अनेक मार्ग वापरले, सोशल मीडियाचा उपयोग केला, सहा महिने आधीपासून पब्लिसिटी सुरू केली. झी ग्रुपने चित्रपटाचे मार्केटिंग केल्यामुळे त्याचा भरपूर लाभ मिळाला. चित्रपटातील गाणी गाजली आणि वाजत राहिली. अंकुश, स्वप्निल, ऊर्मिला, सई, जितेंद्र अशी तगडी स्टारकास्ट आणि दिग्दर्शक म्हणून खुद्द संजय जाधव यांचे नाव लोकांना माहीत आहे, त्यांच्या नावामुळेसुद्धा लोक विश्वास ठेवून चित्रपटाला येतात. अशीसुद्धा यशाची काही कारणे आहेत.


काकस्पर्श हाही यशस्वी चित्रपट होता, पण त्याला तरुणाईची गर्दी होती असे दिसत नाही. त्याचा प्रेक्षक वर्ग वेगळा होता. तो टीव्हीवर पहिल्यांदाच दाखवला गेला तेव्हाही पालकांनी बघितला, पण तरुणांनी बघितला असे दिसत नाही. सर्वसामान्य कमर्शियल हिंदी चित्रपट ही प्रेमकथा असतो आणि हीरो-हिरोइनच्या लग्नावर तो संपतो तर मराठी चित्रपट हा हीरो-हिरोइनच्या लग्नापासून सुरू होतो आणि विवाहोत्तर समस्या उदा: त्या मुलीचे घरात अ‍ॅडजस्ट होणे इत्यादी त्या चित्रपटात येतात. सर्व समस्या सुटून गोड शेवटावर चित्रपट संपतो. हा तरुणाईचा विषय नाही. त्यांना प्रेमकथा हव्या असतात, त्यामुळे त्यांना गुदगुल्या होतात आणि शिवाय त्यात त्यांना ग्लॅमर असलेले हीरो-हीरोइन हवे, तर ते या चित्रपटांना गर्दी करणार. दुनियादारीत प्रेम आणि मैत्री हे तरुणांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय असल्याने तो यशस्वी झाला हे कारण आहे, असे मला वाटते. दुसरीकडे देऊळ चित्रपट घ्या. चांगला व दर्जेदार चित्रपट, विषय चांगला, पण किती शहरी तरुणांनी तो बघितला? शिवाय ग्लॅमर असलेले चेहरे, ज्यांच्या केवळ नावावर तरुण वर्ग गर्दी करेल, असेही नाव मराठीत नाही. दुसरे अनेक मराठी चित्रपट हे विनोदी असतात, त्यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर इत्यादी हीरो असतात. याही चित्रपटांना तरुण वर्ग मिळणार नाही.
तरुण वर्ग असे आपण म्हटले तरी तो एकजिनसी वर्ग नाही.

संख्येने खूप कमी असले तरी असा मराठी तरुण वर्ग निश्चित आहे, जो मराठीच काय हिंदीसुद्धा चित्रपट बघत नाही की हिंदी गाणी ऐकत नाही. फक्त इंग्लिश चित्रपट बघतो व इंग्लिश गाणी ऐकतो. हे तरुण केवळ उच्चभ्रू वर्गातील आहेत हा गैरसमज आहे. आता मध्यमवर्गातील तरुणही इंग्लिश चित्रपट-गाण्यांचे फॉलोअर दिसतात. इंग्लिश की मराठी हा मुद्दाही इथे गैरलागू आहे. कारण, मराठी माध्यमातून शिक्षण झालेलेसुद्धा इंग्लिशकडे वळताना दिसतात. त्यांच्या हातात इंग्लिश पुस्तके असतात. तरुणाईमधील दुसरा वर्ग आहे ज्याचा ओढा हिंदीकडे आहे. मराठी चित्रपट नियमित बघणारे कोण, ते ग्रामीण भागातले आहेत की शहरी, कोणत्या स्तरातले आहेत याचा तपास करायला हवा. तसेच दुनियादारी चालला याचे मुख्य कारण आहे की, तो चित्रपट म्हणजे प्रॉडक्ट चांगला आहे, जमून आलेला चित्रपट आहे म्हणून तो चालला.


जानेवारी ते जुलै 2013 या सात महिन्यांत सुमारे पन्नास मराठी चित्रपट आले. त्यातील काही चित्रपट चांगले होते, कथानक वेगळे होते, पण त्यात कमर्शियल एलिमेंट नव्हता, त्याचे वितरणही बरोबर झाले नाही. त्यामुळे त्यांना व्यावसायिक यश मिळाले नाही. काही चित्रपट सामान्यच होते, ते अयशस्वी होणारच होते. कोणता चित्रपट चालेल कोणता नाही सांगता येत नाही. यशाचा हमखास फॉर्म्युला कोणालाच मिळालेला नाही, पण प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचे विश्लेषण केले, त्यांनी जो व्यवसाय केला त्यामागची कारणे काय जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर त्याचा चित्रपट उद्योगाला फायदा होईल.