आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिशांचा कर्दनकाळ : मदनलाल धिंग्रा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

17 ऑगस्ट 1909 हा दिवस कुणीही सच्चा देशभक्त कधीही विसरणार नाही. कारण याच दिवशी सर विल्यम हट कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याचा वध करणारे हुतात्मा मदनलाल दित्तमल धिंग्रा हसत हसत फासावर चढले. 1 जुलै 1909 रोजी पिस्तुलाच्या चार गोळ्या झाडून धिंग्राजींनी कर्झन वायलीचा वध केला होता. 'एका इंग्रज अधिकार्‍याचा भारतीय क्रांतियोद्धय़ाने केलेला वध' एवढेच केवळ या घटनेचे महत्त्व नाही, तर हा होता अजिंक्यतेचा तोरा मिरवणार्‍या ब्रिटिशांच्या भूमीवर राहून त्यांच्याच एका अधिकार्‍याचा केलेला वध! अभूतपूर्व अशीच घटना होती ही. याआधी आम्ही भारतीयांनी कुणी गोरा अधिकारी कधी मारलाच नव्हता, असे नाही. दु:शासनी कारवाया करणार्‍या रँडला चापेकर बंधूंनी घातलेले कंठस्नान इंग्रज विसरलेले नव्हते; पण ते सारे भारतात. प्रत्यक्ष शत्रूच्या भूमीवर राहून, त्यांच्याच उच्चाधिकार्‍यास मारण्याचा पहिला मान जातो तो केवळ धिंग्राजींकडेच!
या घटनेनंतर सबंध हॉलमध्ये पळापळ माजलेली असताना मदनलालजींची नाडी सामान्य गतीनेच चालत होती. एवढेच काय, तर त्यांना अटक करून ठाण्यात नेल्यावरही ते पाचच मिनिटांत घोरू लागले होते. धिंग्राजींची झडती घेऊन त्यांच्याजवळ सापडलेल्या एकूणएक वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यातच धिंग्राजी ज्यांना गुरुस्थानी मानत त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहून दिलेले कोर्टात मांडावयाचे निवेदन challenge हेही गेले. पुढे न्यायी (!) इंग्रज शासनाने ते निवेदन दाबून टाकले व कोर्टात मांडूच दिले नाही.
इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे वायलीला धिंग्राजींनी मारले 1 जुलै 1909 ला. धिंग्राजींना फाशी झाली ती 29 जुलैला. फाशी देण्यात आली ती 17 ऑगस्ट 1909 ला. म्हणजे अवघ्या महिनाभरातच इंग्रज शासनाने त्यांच्या दृष्टीने शत्रू असलेल्या क्रांतिवीरास फाशी जाहीर केली व दीडच महिन्यात तिची अंमलबजावणीही करून टाकली. आता या गोष्टीची तुलना अफजल गुरू वा कसाब यांना आपण किती वष्रे पोसतोय (आणि आणखी किती वष्रे पोसणार आहोत!) याच्याशी करा म्हणजे समजेल की इंग्रजांनी आपल्यावर इतकी वष्रे राज्य कसं काय केलं आणि आजही आपण केवळ एक 'विकसनशील देश'च का आहोत ते.
असो. धिंग्राजींच्या कृत्यामुळे जगभरात इंग्लंडची अब्रू गेलीच होती. उरलेली अब्रू वाचवण्यासाठी 5 तारखेला धिंग्राजींचा निषेध करणारी सभा घेण्याचा प्रयत्न केला गेला, तर तोही स्वा. सावरकरांनी हाणून पाडला. तोपर्यंत इंग्रज याच भ्रमात होते की, धिंग्राजींच्या अखेरच्या निवेदनाच्या सर्व प्रती आपण जप्त करून टाकल्या आहेत. जेव्हा धिंग्राजींच्या फाशीच्या आदल्या दिवशी, म्हणजे 16 ऑगस्ट 1909 ला 'डेली मेल'मध्ये जेव्हा सावरकरांनी धिंग्राजींचे challenge नावाचे निवेदन प्रसिद्ध करविले, तेव्हा तर ब्रिटिश शासन कोलमडलेच. ज्या आपल्या निवेदनानंतर धिंग्राजी जगभरच्या क्रांतिकारकांचे प्रात:स्मरणीय प्रेरणास्थान झाले, त्यात ते म्हणतात :''एक हिंदू म्हणून माझी भावना अशी आहे की, माझ्या देशाचा अपमान हा परमेश्वराचाच अपमान होय.
कृश प्रकृतीच्या आणि सामान्य बुद्धिमत्तेच्या अशा मजसारख्या भारतपुत्राजवळ मायभूमीसाठी देता येईल असे काही असलेच तर ते केवळ स्वत:चे रक्तच होय. तेच मी माझ्या मातृभूमीच्या वेदीवर अर्पिले आहे! माझ्या मातृभूमीचा पक्ष हा प्रभू रामचंद्रांचा पक्ष आहे. तिची सेवा ही प्रत्यक्ष भगवान र्शीकृष्णाचीच सेवा आहे. हिंदू आणि इंग्लिश हे दोन वंश अस्तित्वात आहेत आणि त्यांच्यात सध्या असलेले हे अनैसर्गिक राजकीय संबंध कायम आहेत, तोपर्यंत हा स्वातंत्र्यसंग्राम चालूच राहील.
आत्मबलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानला शिकवण्यायोग्य आहे आणि ते शिकवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान देऊन मोकळे होणे होय! याच जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करीत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान आहे. या भारतभूची संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो एवढीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना आहे.''
धिंग्राजींचे हे ओजस्वी निवेदन मुळातूनच वाचण्याजोगे आहे. ते केवळ चांगले आहे म्हणून नव्हे, तर ज्या मार्गावरून छत्रपती संभाजी, राणी लक्ष्मीबाई, सेनापती तात्या टोपे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदीसारखे असंख्य महान वीर चालले, तो हौतात्म्याचा मार्ग चालण्याची प्रेरणा तुम्हा-आम्हाला मिळावी म्हणून! त्या राजमार्गाचे आकर्षण तुम्हा-आम्हाला निर्माण व्हावे म्हणून! कारण आजघडीलाही आपला देश काळोखातच बुडालेला आहे आणि देशातील अंधार दूर करायचा असेल तर त्या देशातील तरुणांनी अखंड जळणे आवश्यकच नव्हे, तर योग्यच आहे. तीच मदनलाल धिंग्राजींना खरी र्शद्धांजली ठरेल, अन्यथा त्यांचे बलिदान फुकटच गेले असे म्हणावे लागेल.