आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकुंभमेळा : अर्थ व अन्वयार्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आपल्या पूर्वजांनी समाजोद्धारकाची भूमिका निभावत, समाज संघटित कसा होईल, याचा विचार केला. इथला समाज धर्मप्रवण असल्याने तो धर्माच्या नावाने एकत्रित होईल; अशा समाजावर उत्कृष्ट धर्मसंस्कार करता येतील, हे त्यांनी जाणले, असा दृष्टिकोन बाळगून त्यांनी सणांचे, पर्वांचे नियोजन केले. महापुरुषांचे स्मृतिदिन, ज्योतिषशास्त्रानुसार येणारे योग, यानुसार उचित आखणी केली आणि अशा पर्वदिनी अमुक कर्म केले तर अमुक फळ, असे प्रलोभन किंवा न केले तर अमुक वाईट फळ, असे भय दाखवून समाज धर्मप्रवृत्त राहून समाजात समाधान नांदेल, अशी व्यवस्था केली.

संक्रांतीचेच उदाहरण घेतले तर हे चटकन लक्षात येईल. संक्रांती : संक्रमण : (Transit) म्हणजे सूर्याचे भासणारे भ्रमण. त्याचे बारा राशींतून हे भ्रमण पृथ्वीवरून जाणवते. प्रत्येक मासात हे संक्रमण जाणवतेच. 30-31 दिवसांत सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जातो, म्हणजे प्रत्येक मासात संक्रांत येतेच. आषाढात (जून-जुलै) सूर्य कर्क राशीत, तर पौष (जानेवारी) मासात तो मकर राशीत प्रवेश करतो. या दोन संक्रांती महत्त्वाच्या. कारण कर्क संक्रमण झाले की सूर्य दक्षिणेकडे सरकल्यासारखा दिसतो. म्हणजे दक्षिणायनाला प्रारंभ होतो, तर मकर संक्रमणाच्या वेळी तो उत्तरेकडे सरकत गेल्यासारखा दिसतो. हे दोन्ही दिवस महापर्व मानून पुण्यकर्मे (दान, स्नान इ.) करावीत, असे शास्त्र सांगते. विशेषत: मकर संक्रमण हे अधिक पुण्यकारक मानले, कारण इथूनच पुढे धर्मकार्याला प्रशस्त असे उत्तरायण सुरू होते.

याच प्रसंगी प्रयाग येथील त्रिवेणी संगमात (गंगा-यमुना आणि गुप्त सरस्वती यांच्या संगमात) स्नान करणे पुण्यकारक मानले जाते. याच पवित्र पर्वदिनी कुंभमेळा भरतो. यात तेरा आखाड्यांचे महंत, पीठाधीश, त्यांचे अनुयायी इथे लाखोंच्या संख्येने एकत्र येतात, आपापल्या गुरूंसोबत पवित्र स्नान करतात, दाने करतात, जपजाप्य करतात, प्रवचनांतून धर्मजागरण करून समाजाला सत्प्रवृत्त करण्याचे महत्कार्य करतात. हा कुंभमेळा विशेष ग्रहयोग असेल तेव्हाच भरतो. सूर्य मकर, कुंभ, मीन या राशीतून भ्रमण करत असता ग्रहांचा गुरू हा ग्रह वृषभ राशीत असेल, तेव्हा हा मेळा भरतो. असा योग 56 दिवस असू शकतो. तो महापुण्यकारक मानला आहे. याचे कारणही महत्त्वाचे आहे. यासाठी पुराणे व महाभारत यातील कथांचा आधार घेण्यात येतो. ती कथा अशी- पूर्वी दूर्वास ऋषीने स्वर्गाधिपती इंद्राला शाप दिला. त्यामुळे स्वर्गातील सर्व संपत्ती (कामधेनू, अमृत पारिजात, शस्त्रे इ. इ.) सागरात बुडाली. तेव्हा देव विष्णूला शरण गेले. कारण बळीराजा हा दैत्यराज स्वर्ग जिंकून तिथे राज्य करू लागला, देव देशोधडीला लागले,ते विष्णूच्या सल्ल्यानुसार बळीशी तह करून सागर घुसळायला निघाले. तेव्हा सागरात बुडालेली संपत्ती हळूहळू बाहेर पडू लागली. त्यात उच्चै:श्रवा नामक घोडा प्रकटला, तो बळीला मिळाला, कौस्तुभ हे रत्न आणि लक्ष्मी विष्णूला तर मदिरा दैत्यांना,ऐरावत हा हत्ती, अप्सरा, पारिजात हे स्वर्गात ठेवून दिले व शेवटी अमृतकुंभ घेऊन धन्वंतरी प्रकटला. दैत्यांनी चपळाइने तो कुंभ पळवला. अमृत हे देवांचे पेय, ते निसटले. देव ते मिळवण्यासाठी पाठलाग करत राहिले. तो अमृतकुंभ चार स्थानी राक्षसांनी टेकवला, ती स्थाने-हरिद्वार, उज्जयिनी, नाशिक आणि प्रयाग ही होत. आंध्र प्रदेशातील राजमहेन्द्री हेही पाचवे स्थान मानण्यात येते. ज्या स्थानी अमृतकुंभ ठेवला त्या त्या स्थानी हा कुंभमेळा भरतो. कोट्यवधी भाविक तेथील गंगा, यमुना, गोदावरी या पवित्र नद्यांत स्नान करतात, दाने देतात, जप करतात, स्वत:ला कृतार्थ मानतात.

कुंभमेळ्यात स्नान, दान, जप करून पुण्य प्राप्त करावे, असा शास्त्रांचा संदेश आहे. याची सामाजिक फलश्रुती काय, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे उत्तर देता येते. माणूस प्रपंचात गुरफटला जातो, तो मोहग्रस्त होतोच. त्यातून काही काळ का होईना, त्याला बाहेर काढणे, थंडी, वारा यांचा त्रास सहन करावा, म्हणजे एक प्रकारचे तपच होय. प्रवचने, कीर्तने यातून धर्मसंस्कार करण्यात येतात म्हणजे ज्ञान आले, दान केले जाते. म्हणजे आपण समाजाचे काही देणे लागतो, याचे भान येते. ही एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच की!

आमचे तप:पूत पूर्वज निरपेक्षपणे आजीवन झटत राहिले. दिग्भ्रांत समाजाला मार्ग दाखवण्यात त्यांना ब-या पैकी यश मिळाले. परंतु आज जे चित्र दिसते, ते मात्र फारसे उत्साहदायी वाटत नाही. मठाधीश, महंत, धर्माचार्य अपार संपत्तीचे स्वामी असूनही त्यांना अजून लोभ आहेच. त्यांचे वारस ही संपत्ती आपल्यालाच मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतात. या सर्व खटपटीत धर्मजागरणाचे कार्य किती घडते, ते न कळे. अर्थात याला काही सन्मान्य अपवाद आहेत, ते उत्तम धर्मकार्य करण्यात स्वत:ला कृतार्थ मानतात. अन्यथा आजचे चित्र मन विषण्ण करणारे आहे. तलवारी, शस्त्रे, हत्ती, घोडे, रथ असा सारा थाट, परत मानाचा, प्रतिष्ठेचा प्रश्न, कुणी आधी स्नान करावे, यासाठी वाद-संघर्ष, तो चिघळला की सर्रास शस्त्रांचा वापर, हे धर्मजागरणासाठी आवश्यक आहे काय? या सर्वांतून सामान्य जनांनी काय बोध घ्यावा?