आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राजकारणाचा तंबू तीन खांबावर उभा असतो. एक म्हणजे कुणीही कुणाचे नेहमीसाठी शत्रू नाही की मित्र नाही. दुसरे म्हणजे दिसते तसे नसते आणि तिसरे म्हणजे अशक्य काहीच नसते. युती अन् आघाड्यांच्या काळात सध्या मित्र कोण व शत्रू कोण याची सीमा रेषासुद्धा पुसट होत चालली आहे. जेव्हा सेना-भाजप युती झाली तेव्हा शिवसेना मोठा भाऊ तर भाजप लहान भाऊ होता. काळाच्या ओघात आता मात्र नेमके उलटे झाले आहे. त्यात विरोधी नेतेपदसुद्धा भाजपकडेच असल्याने शिवसेना सर्वात लहान भावासारखा झाला आहे. नाही म्हणायला आठवल्यांचा रिपाइं युतीत सामील झाल्याने सेनेला मोठा भाऊ झाल्याचे वाटत असेल. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांचे टाळी प्रकरण बरेच गाजले. उद्धव आता राजकारणात मुरले आहेत. व ते उगचच एखाद्या मुद्द्याला हात घालण्याइतके बाळबोध तर नक्कीच राहिले नाहीत. राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता नसतानाही उद्धव यांनी चार पावले पुढे येऊन टाळी देण्याविषयी भाष्य केले व भाजपनेही याला संमती दर्शवली. मात्र, राज यांनी प्रस्ताव झिडकारला याला सुद्धा कारण असावे फक्त निवडणुकांपूर्वी युती टाळण्यासाठी. शिवसेनेला पुन्हा एकदा मोठा भाऊ होण्याची संधी चालून आल्यासारखी परिस्थिती आहे. महायुतीत आठवले सोबत असल्याने त्यांनीही विधानसभा निवडणुकीत 35 जागा मागण्याचे सूतोवाच अगोदरच केले. भाजप जिथे मजबूत आहे. अशा ठिकाणी आठवलेंना जागा मिळाव्या यासाठी शिवसेना डाव आखू शकते. किंवा त्या जागांवर मनसेला छुपा पाठिंबा देऊन भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करू शकते. यामुळे एकतर आठवल्यांच्या जागा वाढतील. भाजपला धक्का बसेल किंवा भाजप व रिपाइं या दोघांनाही धक्का देऊन मनसेला पुढे आणण्याचे राजकारण शिवसेना करू शकते. ज्यामुळे भाजप कमजोर होईल व आठवल्यांचा वापर तर जसा जमेल तसा सर्वांनीच या आधीही करून घेतला आहे. राहता राहिला प्रश्न मनसेचा तर उद्धव यांनी मागितलेली टाळी निवडणुकांनंतर त्यांना रिटनविथ थॅँक्स मिळू शकते. विरोधाचे संकेत भाजपला शिवसेनेने अनेक वेळा दिलेत. मग ती राष्ट्रपतिपदाची निवडणूक असो किंवा स्थानिक पातळीवरील निवडणुका असोत. तेव्हा मोठा भाऊ या अर्विभावात राहणार्याला भाजपला शिवसेनेने मागितलेली ही टाळी धोक्याची घंटा ठरू शकते व भविष्यात लहान भाऊ म्हणून पुन्हा वावरण्याची तयारीही ठेवावी लागू शकते. दोन भावांच्या या खेळात भाजपला रांगण्याची वेळ येऊ शकते कुठे धडपडले किंवा खरचटलेच तर आठवले खुळखुळा घेऊन आणि राज व उद्धव टाळ्या वाजवून चेहर्यावर खोटेखोट हसू आणण्याचे प्रयत्न करतीलच, यात शंका नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.