आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाटक म्हणजेच अनेक शक्यता’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशयघन नाटकांनी मराठी जनमानस समृद्ध करणारे प्रख्यात नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांना सांगलीतील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीतर्फे दिले जाणारे विष्णुदास भावे पदक जाहीर झाले आहे. एलकुंचवार 2012 मध्ये अनंत भालेराव स्मृती पुरस्कार स्वीकारण्यासाठी औरंगाबादेत आले होते. त्या वेळी त्यांनी ‘मराठी नाटकाचे व्याकरण’ या विषयावर केलेल्या भाषणाचा संपादित अंश.


तुम्ही लिखाण करत असताना त्यात यश असे काही अंतिम नसते. तुम्ही लिहिता ते किती अक्षय आहे, त्याचा आनंद किती तेवत राहतो, हे महत्त्वाचे. खरं तर मला यश हा शब्द थोडा धोकादायक वाटतो. आता मी तुम्हाला माझा प्रवास उलगडून सांगणार आहे. त्यानिमित्ताने काही मूलभूत तत्त्वे सापडली. तुमच्या मनात काही भ्रम असतील
तर ते दूर होतील.


मुळात मी कधी नाट्यक्षेत्रात येईन असे वाटलेच नव्हते. कलेसाठी जीवन उधळून देणे वगैरे, असे काही नव्हते. गाणा-यांना कदाचित जीवन उधळून द्यावं लागत असेल. कारण ते चोवीस तास गातात. मला नुसतं जीवन उधळून द्यायचं होतं. मी अजूनही तसाच बेजबाबदार, अविचारी माणूस आहे. आणि हे सांगताना मला मुळीच संकोच वाटत नाही. लेखन हा माझा अग्रक्रम कधीच नव्हता. सगळ्याच क्षेत्रात किंवा लेखनाच्या म्हणा, लवकर यश मिळाले की जीवनाशी फारकत होत जाते. यशाच्या सापळ्यात लेखक अडकत जातो. म्हणून नाटक वगैरे असे काही डोक्यात नव्हते. आपल्याकडे लेखकाला फार प्रतिष्ठाही नाही. मी आरटीओ, रेशनिंग ऑफिसमध्ये जातो तर तिथल्या लोकांना माझे आडनावही माहीत नसते. त्यामुळे आपण लेखकाला फार प्रतिष्ठा आहे, असा समज करून घेऊ नये. हे आपलं सांस्कृतिक संचित आहे. माझ्या घरात नाटकाची परंपरा नाही. कुणीही नाटकाशी संबंधित नाही. सगळेजण गाणारे होते. मी अपघाताने नाट्यलेखनाकडे वळलो. मी लिहिलं आणि विजयाबार्इंनी (मेहता) केलं. मग दीड वर्षातच मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली. आपण ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले त्या जागी पाय रोवून उभे राहता आले पाहिजे, असे वाटू लागले. नाटकाकडे गंभीरपणे पाहणे गरजेचे आहे, हे लक्षात आले. मग मी या माध्यमाशी खेळत, लढत, कधी अबोला धरत प्रयोग करत राहिलो. आपल्याकडे मराठीत नाटकाला मोठी प्रतिष्ठा आहे. सहा पिढ्यांपासून नाटक लेखन करणारेही लोक आहेत. या नाट्यव्यवहारात लेखक हा सर्वात मोठा. त्यानं लिहिलं नाही तर सादर काय करणार, असा प्रश्न होता. 1960 च्या दशकात विजयाबार्इंसारखे दिग्दर्शक आले. आणि त्यांनी सांगितले की, लेखकापेक्षा दिग्दर्शक मोठा. कारण दिग्दर्शकच नाटकाला शारीररूप देत असतो. म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक दोन्ही महत्त्वाचे. नाटकासाठी हे दोन्ही घटक आवश्यक, पण पीटर ओक यांनी त्यांच्या ओपन स्पेस पुस्तकात असे म्हटले आहे की, नाटक म्हणजे काय, तर रंगमंचावर एक नट एका विंगेतून दुस-या विंगेत जातो आणि सभागृहात बसलेला एक प्रेक्षक ते पाहतो. हेही नाटक आहे. तेथे काही संहिता, दिग्दर्शकाची गरजच नाही.


मी पोलंडला रोडोस्कींसोबत होतो, तर त्यांनी मला काही प्रश्न विचारले. महेश, नाटकासाठी प्रकाशयोजना आवश्यक आहे का. म्हणजे प्रकाश नसेल तर नाटक होईल का, तर होईल. नेपथ्य नसेल तर होईल का, तर होईल. मेकअप नसेल तर होईल का, तर होईल. म्हणजे नाटकासाठी जो जो अनावश्यक फापटपसारा आहे तो काढून टाका. नाटककाराने काही लिहिले नाही तर नट येऊन बोलेल. लेखकाने किती लिहिले, दिग्दर्शकाने काहीही बसवले तरी रंगमंचावरचा खरा नट राजाच असतो. त्याने ठरवले तर तो लेखकाने काहीही लिहिले आणि दिग्दर्शकाने काहीही बसवले तरी तो त्याला रंगमंचावर बदलून टाकू शकतो. म्हणजे काय की, नाटकात अनेक शक्यता असतात. सिनेमाचे तसे नसते. त्याचा अर्थ बदलत नाही. नाटकाचा बदलत असतो. प्रत्येक लेखक, दिग्दर्शक नाटकाला वेगळ्या नजरेने बघू शकतो. एवढेच नव्हे तर एखादा नट प्रत्येक प्रयोगात त्यातील वेगळा अर्थ दाखवू शकतो. तरीही त्यातील आणखी एखादा अर्थ शिल्लक राहतोच. र. धों. कर्व्यांनी 1920 मध्ये लोकस्वास्थ्यामध्ये एकच प्यालाचे परीक्षण केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हे मद्यपानाच्या अतिरेकाचे दुष्परिणाम नाहीत तर अतिपातिव्रत्याचे दुष्परिणाम आहेत. लंडनमध्ये ऑथेल्लोच्या एका प्रयोगात सर लॉरेन्स ऑलिव्हिएंनी अचानकपणे राफ्ल रिचर्डसनचे चुंबन घेतले. विंगेत गेल्यावर राल्फ म्हणाले की, असे का केले, तर सर लॉरेन्स म्हणाले की, ऑथेल्लो-इयागोत एक सुप्त आकर्षण असावे, असे मला वाटले. तशी एक शक्यता आहे त्यात. नाटक हे अनेक शक्यतांचे असते. ज्या नाटकात एकच शक्यता असते ते दहा प्रयोगापर्यंत चालते आणि ज्यात अनेक शक्यता असतात ती नाटके पिढ्यान्पिढ्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत जातात.


तर सांगायचा मुद्दा असा की, नाटककाराला महत्त्व असतं. कारण सादरीकरणासाठी एक संहिता लागतेच, हे माझ्या लक्षात आले. मग मी त्यासाठी काय योगदान देऊ शकतो याचा आत्मशोध सुरू झाला. विजयाबाई मला म्हणाल्या की, अरे, तुझ्या नाटकात दोन-तीनच पात्रं असतात. तू रंगमंचाचा अवकाश वापरतच नाही. मलाही ते पटले की, या अवकाशातच मला संस्कृती, विनाश, प्रेम, लग्न, मृत्यू आणि एकूणच मानवी जीवन दाखवायचे आहे. मग मी पार्टी लिहिले. त्यात 12 पात्रे तिथंच राहतील. कुठेही हलणार नाहीत, अशी काळजी घेतली, पण रंगमंच म्हणजे काही रेल्वेचा प्लॅटफॉर्म नाही की कुणीही कधीही येते कधीही जाते. प्रत्येक पात्राच्या हालचालीत मोटिव्हेशन हवे. ते दिग्दर्शकाने निर्माण करावे, असे अपेक्षित असले तरी नाटककाराने लिहिले पाहिजे. दिग्दर्शकाने पात्रांचे मोटिव्हेशन निर्माण करण्याची वेळच येऊ द्यायची नाही. लेखकानेच ती निर्माण केली पाहिजे. नाटककाराला स्वत:ला कुठेतरी दिग्दर्शक असावे लागते. अनावश्यक गर्दी केली तर आशय राहू द्या, नटांनाच अडचण होते. पात्र कुठून कुठे जाणार, कशासाठी जाणार याची अस्पष्ट सूचना संहितेत हवी. रंगभूमीवर कोणताही अनावश्यक तपशील चालत नाही. लिखाणात कितीही सुंदर वाक्य असले तरी ते अनावश्यक असल्यास रंगमंचावर कुरूप होते. म्हणून लेखनापेक्षा संपादन, एडिटिंग, नको असलेला भाग कापून टाकणे जास्त महत्त्वाचे आहे. मी जे काही दृश्य लिहिले ते नाटकाला पुढच्या प्रवासाला नेते का, घटनांना वेगळा अर्थ देत नाटक पुढे जाते का, पात्रांबद्दल नवीन काही कळते का, नाटकाचा भाव किती गडद होतो, याचा विचार करायला हवा. अनेक आंतरसंहिता निर्माण होतील, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी विलक्षण संक्षिप्तीकरण महत्त्वाचे आहे. यापैकी निदान एकतरी मुद्दा साधलाच पाहिजे. नसेल तर कापाकापी हवी. अगदी एखादे पात्र उडवावे लागले तरी चालेल. नाहीतरी दहापैकी नऊ प्रयोग फसतात. एखादाच यशस्वी होत असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. लेखकाला तात्कालिकतेच्या पलीकडे जाता आले पाहिजे, तर तुमचे नाटक काही काळ टिकण्याची शक्यता आहे. नाहीतर प्रश्न सुटले की नाटक संपते. माझ्यावर असाही आरोप होतो की, मी सामाजिक बांधिलकीच्या प्रश्नावर लिहीत नाही. हुंकार काढत नाही, तर त्यावर माझे उत्तर असे की, मला त्या प्रश्नांबद्दल महत्त्व वाटत असते. त्या त्या वेळी तसा प्रतिसादही असतो. लेखक म्हणून मी कुठल्या गोष्टीबद्दल लिहायचे एवढे स्वातंत्र्य तुम्ही मला देणार नाही का? मग सामाजिक बांधिलकी नसलेली नाटके थोर नाही का? प्रत्येकाला वेगळ्या हाका ऐकू येतात. त्या त्या हाकेच्या मागे तो जातो. तुला पडलेली हाक बरोबर, न्याय्य, रास्त, पोलिटिकली करेक्ट आणि याला ऐकू आलेली हाकच नाही, हा पवित्रा लोकशाहीच्या विरोधात आहे. कलावंताला ऐकू येणा-या हाका त्याच्या त्याच्यापुरत्या अत्यंत ख-या असतात. त्या पटत नसल्या तरी आदर वाटलाच पाहिजे, असे मला वाटते.
शब्दांकन : श्रीकांत सराफ