आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - उत्साही असाल, तर निवृत्ती विसरा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्याच्या रुख्मिणी शितोळे यांचे वय 96 आहे. 1916 मध्ये एका नेत्याच्या घरी त्यांचा जन्म झाला होता. सध्या त्या एका बँकेच्या सल्लागार अध्यक्षा आहेत. पण या वयातही त्या सर्व बैठका आणि चर्चासत्रांना जाण्यासाठी सार्वजनिक बससेवेचा (पुण्यात पीएमटी) वापर करतात. ज्येष्ठ असल्यामुळे बसचालक त्यांना समोरच्या दरवाजामधून बसमध्ये चढू देतो, तसेच बसमध्ये प्रवेश करताच कोणीतरी त्यांना सीट रिकामे करून देते. या सर्वाचे कारण म्हणजे रुक्मिणी शितोळे या वयातही कामाच्या निमित्ताने बसमध्ये प्रवास याची सर्वांना माहिती आहे. आजवर त्यांनी जिजामाता महिला बँक आणि संतुलन ट्रस्टची एकही बैठक चुकवलेली नाही.
रुक्मिणी या पुणे जिल्ह्यातील थेऊर तालुक्यातील कोळेवाडी गावातील सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. मागच्या आठवड्यात संतुलन पाषाण शाळेद्वारे आयोजित पाचव्या शिक्षण हक्क परिषदेत सहभाग घेण्यासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. दगडांच्या खाणीमध्ये काम करणा-या कामगारांच्या मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत असताना रुक्मिणी या नेहमी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होत असत. त्यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्याकाळातही त्या परिसरातील सर्वात सुशिक्षित महिला होत्या. वयाच्या 12 व्या वर्षी कोंडिबा यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला, ते एक सक्रिय नेते होते. त्यामुळेच समाजकारण आणि सामान्यांची सेवा यासाठी रुक्मिणी शितोळे यांच्यासमोर त्यांच्या पतीचाच आदर्श होता. कोंडिबा आणि रुक्मिणी यांना एक मुलगी होती. त्यानंतर मुलगा व्हावा म्हणून कोंडिबा यांनी दुसरा विवाह केला. दुस-या पत्नीपासून त्यांना तीन मुले झाली. त्यापैकी एकाचा नुकताच मृत्यू झाला. त्याशिवाय त्यांना दोन मुलीही आहेत. सध्या त्यांची मुले आणि नातवंडे रुक्मिणी यांचा सांभाळ करतात. तर त्यांच्या मोठ्या घराची जबाबदारी कोंडिबा यांची दुसरी पत्नी आणि मुलगी सांभाळतात. त्यामुळे रुक्मिणी यांना समाजकार्यामध्ये योगदान देण्यासाठी वेळ मिळतो.
रुक्मिणी यांनी कुटुंब स्थिरावल्यानंतर राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी 1962 मध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली. त्यामध्ये त्यांचा दोन मतांनी विजय झाला होता. स्वत: सुशिक्षित असल्यामुळे त्यांना त्या वेळी महिलांना समाजात मिळणा-या वागणुकीची जाणीव होती. त्यामुळे त्यांनी दुग्धव्यवसायाशी संबंधित महिलांच्या सशक्तीकरणासाठी महिला संस्था आणि गणेश दूध उत्पादक संस्था सुरू केली. त्यानंतर 1972 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली. 12 वर्षे त्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या. ज्यावेळी फारसे काम नसेल तेव्हा रुक्मिणी या गावातील लोकांनी पाठविलेली शुभेच्छा पत्रे, निमंत्रणपत्रिका वाचण्यामध्ये व्यस्त असतात. नवीन विहीर खोदणे किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी जाणारे असे अनेकजण आधी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. त्यातही त्यांना वेळ मिळाला की, त्यांनी विकसित केलेल्या किचन गार्डनची देखभाल त्या करत असतात.
फंडा काय आहे? - जर तुमच्यामधील उत्साह कायम असेल तर, कोणीही निवृत्त करू शकत नाही. फक्त पैसे कमावण्यासाठी आॅफिसमध्ये नोकरी करणारे लोक रिटायर होत असतात. पण ज्यांच्याकडे अनेक उत्साहवर्धक कामे असतात, असे लोक कधीही निवृत्त होत नाहीत. कोणत्याही संस्था वयाच्या कारणामुळे कोणाला निवृत्त करत नसतात. तर तुम्ही आयुष्याच्या सायंकाळी आपल्या इच्छेप्रमाणे, छंद जोपासत जगावे हा त्यामागचा हेतू असतो. पण जर तुमच्याकडे एकही छंदच नसेल, तर त्यामघ्ये त्या संस्था काहीही करू शकत नाहीत.