आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - वाईट अनुभवावरून इतरांचे आकलन चुकीचे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी एक वरिष्ठ डॉक्टर घाईगडबडीत रुग्णालयात दाखल होतात. काही वेळापूर्वी ते डॉक्टर व त्यांचा चमू अशा ठिकाणी असतो ज्याठिकाणी खूप कमी लोक जातात. अत्यवस्थ रुग्णावर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल व्हावे लागले. रुग्णालयात येताच डॉक्टरांनी फटाफट कपडे बदलले आणि शस्त्रक्रिया खोलीत गेले. त्याठिकाणी एका मुलाचे वडील डॉक्टरांची आतुरतेने प्रतीक्षा करताना दिसले. त्यांना पाहताच मुलाचे वडील ओरडत म्हणाले, ‘तुम्हाला येण्यास इतका वेळ का लागला ? तुम्हाला माहिती असायला हवे की, माझ्या मुलाचे जीवन धोक्यात आहे. मला वाटते तुम्हाला जबाबदारीची जाणीव नाही.’ मुलाच्या वडिलांचा रोष पाहता डॉक्टरांनी त्यांना माफ करा असे नम्रपणे म्हटले आणि आपण रुग्णालयात नव्हतो त्यामुळे येण्यास उशीर झाल्याचे सांगितले. रुग्णाच्या वडिलांना धीर देत त्यांनी आपणाला काम करू देण्याचा सल्ला दिला. परंतु त्यांचा राग काही शांत होईना, त्यांनी परत एकदा डॉक्टरांना म्हटले, ‘माझ्या मुलाच्या ठिकाणी जर तुमचा मुलगा अत्यवस्थ असता तर तुम्ही असे म्हटले असते का ?’ त्यावर डॉक्टर नम्रपणे म्हणाले, ‘मी तुम्हाला तेच सांगितले असते जे धर्मग्रंथात म्हटले आहे. आपण या मातीतून आलो आहोत आणि एक दिवस याच मातीत जाणार. कितीही मोठा व पारंगत डॉक्टर असला तरी व्यक्तीला दीर्घायुष्य देऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या मुलाला वाचविण्याचा मी कसोशीने प्रयत्न करीन, परंतु तुम्हीही मुलाच्या आयुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करा.’ डॉक्टरांचा आणि रुग्णाच्या वडिलांचा संवाद पूर्ण होईपर्यंत शस्त्रक्रियेची पूर्ण तयारी झाली होती. डॉक्टर शस्त्रक्रियेला निघून गेले, परंतु त्या मुलाच्या वडिलांचा राग मात्र शेवटपर्यंत कमी झाला नव्हता. ते सतत डॉक्टर व त्यांच्या चमूला दोष देत होते. त्या मुलाचे वडील डॉक्टरांना काहीही बोलत असतील तरी रुग्णालयातील सर्वांनीच त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. कारण त्यांना रुग्णाचा जीव वाचवायचा होता. अनेक तासांच्या शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर शस्त्रक्रिया खोलीबाहेर आले आणि त्या मुलाच्या वडिलांना म्हणाले, ‘देवाच्या कृपेने तुमच्या मुलाचे प्राण वाचले’. एवढे बोलून डॉक्टर तत्काळ तेथून निघून गेले. काही वेळानंतर परिचारिका जेव्हा शस्त्रक्रिया खोलीबाहेर आली, तेव्हा त्या मुलाचे वडील तिला म्हणाले, ‘हे डॉक्टर एवढे खडूस का आहेत’? त्यांचे बोलणे ऐकून नकळत परिचारिकेचे डोळे पाणावले आणि ती म्हणाली, ‘काल एका अपघातात डॉक्टरांच्या मुलाचे निधन झाले होते. तुमच्या मुलाला रुग्णालयात दाखल केले आहे, असे कळाले तेव्हा आम्ही सर्वजण स्मशानभूमीत होतो. अंत्यसंस्काराचा विधी आटोपून आम्ही तुमच्या मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी येथे त्वरित दाखल झालो. तुमच्या मुलाचे प्राण तर वाचले परंतु डॉक्टर आपल्या मुलाच्या अंत्यसंस्काराचा इतर विधी पूर्ण करण्यासाठी स्मशानभूमीकडे गेले आहेत.’ हे ऐकून एका क्षणासाठी त्या मुलाचे वडील स्तब्ध झाले आणि डॉक्टर व त्यांच्या चमूला दोष देण्याचा त्यांना प्रचंड मनस्ताप झाला.
फंडा काय आहे? - आपणाला येणा-या वाईट अनुभवावरून इतरांचे आकलन करणे चुकीचे आहे. दु:खद प्रसंगांमध्ये आपली मन:स्थिती बरोबर राहत नाही. त्यासाठीच समजुतदार लोक म्हणतात, पहिल्यांदा दीर्घ श्वास घ्यायचा आणि नंतर कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया द्यायची. आपण कधीही जाणत नसतो की समोरील व्यक्तीच्या आयुष्यात काय चालले आहे. त्यामुळे प्रतिक्रिया देताना दक्षता बाळगणे आवश्यक आहे.