आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅनेजमेंट फंडा - मूल्यांवर ठाम राहणे गरजेचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षेवेळी माझी एका मुलाबरोबर ओळख झाली. तो मनमिळाऊ आणि अभ्यासाबाबत बराच गंभीर होता. दररोज तो नियमित वर्गात उपस्थित राहायचा. परंतु अचानक संपूर्ण एक सत्र तो अनुपस्थित राहिल्याचे लक्षात आल्यावर मला त्याच्याबद्दल चिंता वाटू लागली. परीक्षेला काही दिवस शिल्लक असताना तो महाविद्यालयात परतला. परंतु यंदा तो नेहमीप्रमाणे वाटत नव्हता. अधिक माहिती घेतली असता असे कळले की, त्याला गंभीर आजार झाला आहे. किमोथेरपीमुळे त्याच्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचे दिसत होते. परंतु या सर्वांचा त्याच्या अभ्यासावर काहीही परिणाम झालेला नव्हता.
त्यामुळे त्याची अनुपस्थिती लक्षात न घेता महाविद्यालय व्यवस्थापनाने त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसण्याची अनुमती दिली. इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत त्याला अधिक पर्शिम करणे गरजेचे होते त्यामुळे मी हसतमुखाने त्याची मदत करण्यास तयार झालो. सांगितलेल्या गोष्टी त्याला तत्काळ लक्षात राहत होत्या. परीक्षा तोंडावर असताना त्याने संशय व्यक्त केला की त्याला सवरेत्तम ग्रेड मिळणार नाही. मी त्याला समजावले की, परीक्षेपूर्वी ताण येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे घाबरून न जाता परीक्षेला सामोरे जाण्याचा त्याला सल्ला दिला.
योगायागाने मी परीक्षेत सुपरवायझर झालो. परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळानंतर माझ्याकडे हेल्प लिहिलेली चिठ्ठी आली. मी लगेच त्याचा चेहरा पाहिला. तेव्हा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तो माझी मदत मागत असल्याचे लक्षात आले. त्याचवेळी माझ्यासमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मी माझ्या पूर्ण शैक्षणिक जीवनात कधीही कॉपी केली नव्हती. सुरुवातीला मला वाटले की, मी त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे करावे. परंतु काही वेळेनंतर त्याची मदत करण्याची इच्छा झाली. आपले नैतिक मूल्य सांभाळत त्याची मदत कशी करता येईल, असा विचार मी करत होतो. परीक्षेत पास झाला तर तो आनंदी होईल आणि नापास झाला तर त्याच्या आयुष्यात नैराश्य येईल त्यामुळे त्याची मदत करावी असे एकीकडे वाटत होते, तर दुसरीकडे त्याला कॉपी करू देण्यासाठी मदत केली तर तो करत असलेल्या पापात माझा सहभाग राहणार असल्याने मन अस्वस्थ झाले होते. त्याची मदत केली तर इतर मुलांवर अन्याय होईल, असाही विचार मनात आला. सद्सद्विवेक बुद्धीचे ऐकून त्याची तक्रार केली तर महाविद्यालयातून त्याला काढले जाण्याची शक्यता होती आणि असे झाले तर भविष्यात तो कुठलीही परीक्षा देऊ शकला नसता. एकवेळ तर मला वाटले की त्याला स्पष्ट नकार द्यावा, कारण नैतिक मूल्यांसोबत विश्वासघात करणे मला योग्य वाटत नव्हते.
त्या परिस्थितीत मी काय केले हे महत्त्वाचे नाही तर या प्रसंगातून मला भरपूर काही शिकायला मिळाले. माझे पालन-पोषण करताना चूक काय आणि बरोबर काय, याची ओळख कशी करायची हे संस्कार उत्तमरीत्या माझ्यात रुजवण्यात आले. हेच संस्कार अनेकवेळा कामातही आले. याच संस्कार आणि विचारांमुळे मला समाधान आणि विश्वास मिळतो. त्याचमुळे प्रत्येक बाब मी याच सिद्धांतावर पडताळून पाहतो.
फंडा काय आहे?
आपल्या मूल्यांवर ठाम राहून समोरील व्यक्तीच्या डोळ्यातून स्थितीचे आकलन करायला हवे. यानंतरच तुम्ही खरी गरज असणार्‍या व्यक्तीला चांगल्या रीतीने समजू शकता. त्यानंतर कुठलीही तक्रार न करता तुम्ही चूक आणि बरोबर यात फरक करू शकता.