आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mandar Purkar Article About Maruti 800 Car History

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मारुती 800’ चा ऐटदार इतिहास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

14 डिसेंबर 1983 या तारखेला भारतीय वाहन उद्योगाच्या इतिहासात एक वेगळंच महत्त्व आहे. कारण त्या दिवशी नवी दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी पहिल्या मारुतीची किल्ली हरपाल सिंग यांना सुपूर्द केली. हरपाल सिंग हे मारुती विकत घेणारे पहिले असामी ठरले होते आणि त्यासाठी त्यांनी मोजले होते 47,500 रुपये. हरपाल सिंग जेव्हा आपल्या मारुतीतून नवी दिल्लीची सैर करायला निघायचे, तेव्हा ते जणू रोल्स रॉइसमधूनच निघाले आहेत, असे दिल्लीकरांना वाटे. अमेरिकेत फोर्डच्या मॉडेल टी आणि युरोपात फोक्सवॅगनच्या बीटलने जो इतिहास घडवला त्याचीच पुनरावृत्ती मारुतीने भारतात केली.

संजय गांधींनी सत्तरच्या दशकात जेव्हा भारतात मध्यमवर्गीयांसाठी कार निर्मितीचे स्वप्न पाहिले, तेव्हा तो कुचेष्टेचा विषय होता. शिवाय त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे हा प्रकल्प सरकारसाठी पांढरा हत्ती ठरेल असेच भाकीत अनेकांनी वर्तवले होते. ‘मारुती 800’ हे मॉडेल 30 वर्षांपूर्वी लाँच झाले त्या वेळेस सर्वसामान्य मध्यमवर्गीयाला परवडेल अशा किमतीत ते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्या वेळेस ‘मारुती 800’ची किंमत होती 55,000 रुपये. भारतात त्या काळी फक्त हिंदुस्थान मोटर्सच्या अ‍ॅम्बेसेडर आणि प्रीमियर पद्मिनीचे उत्पादन होत असे. संजय गांधींनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला, तेव्हा कार निर्मितीसाठीचे तंत्रज्ञान मिळवण्याचे कठीण आव्हान उभे ठाकले होते. भारतात जागतिक दर्जाच्या कारची निर्मिती होऊ शकते या बाबतीत वाहन उद्योगातील अनेक जागतिक कंपन्यांना खात्री वाटत नव्हती. त्यामुळेच हा प्रकल्प तब्बल एक दशक रखडला. प्रकल्पाला सरकारने दिलेल्या भांडवल आणि कर सवलतींमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. संजय गांधींच्या हट्टामुळे इंदिरा गांधींना मनस्ताप सहन करावा तर लागलाच; पण ‘माँ रोती’ असे विरोधी पक्षाचे वाक्बाणही सहन करावे लागले. संजय गांधींमुळेच हा प्रकल्प प्रचंड अडचणीत सापडूनही गुंडाळण्यात आला नाही आणि त्यांच्या विमान अपघातातील आकस्मिक मृत्यूनंतरही सरकारने त्याला पाठबळ पुरवण्यात कसर ठेवली नाही, तरी मारुतीच्या जन्माचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.

आज फार थोड्या लोकांना हे माहीत असेल की, संजय गांधींनी कधीकाळी रोल्स रॉइसमध्ये उमेदवारी केली होती. आॅटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये त्यांना प्रचंड रस होता. संजय गांधींना वाहन निर्मिती प्रकल्पात प्रचंड रस असल्याने सरकारने त्यांना त्यासाठी लागणारा परवाना, जमीन, कर सवलती अशा सर्व प्रकारचे पाठबळ देऊ केले; पण दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. त्याच वेळी भारतात जागतिक दर्जाची कारनिर्मिती होऊ शकत नाही याविषयी फोक्सवॅगन, फियाट आणि टोयोटा या बलाढ्य कंपन्यांना खात्री होती आणि त्यामुळे त्यांनी या प्रकल्पात फार स्वारस्य दाखवले नाही. त्या काळी तुलनेने लहान असलेल्या सुझुकीने मारुतीला तंत्रज्ञानाचे साहाय्य देऊ केले आणि नंतरच्या तीन दशकात भारतीय वाहन उद्योगाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचा चमत्कार मारुतीने करून दाखवला. ‘मारुती 800’ हे मॉडेल लाँच झाल्यानंतरच्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत कार विक्रीत दुपटीने वाढ झाली.

पुढे अनेक बाबतींत ‘मारुती 800’ने नवा पायंडा घातला. त्या काळी बाजारात उपलब्ध असलेल्या अ‍ॅम्बेसेडर आणि पद्मिनीच्या तुलनेत ‘मारुती 800’ मध्ये डिस्क ब्रेक, फ्रंट व्हील ड्राइव्ह आणि फ्लोरशिफ्ट गिअर्स, बकेट सीट्स, प्लास्टिक मोल्डेड डॅशबोर्ड आणि चालणारे वायपर्स हे म्हणजे भारतीयांसाठी रॉकेट टेक्नॉलॉजी हाती येण्यासारखे होते. त्यामुळे अल्पावधीतच ‘मारुती 800’ने लोकांना वेड लावले आणि बाजारपेठ काबीज केली. यात नवल वाटण्यासारखे काहीच नव्हते. ‘मारुती 800’ चालवणे सहज सोपे असल्यामुळे महिलांमध्येही तिला प्रचंड लोकप्रियता लाभली. त्या काळी जपानी दर्जाच्या या गाडीसाठी लोक कंपनी किमतीच्या दुप्पट किंमत मोजण्यास तयार होते. ‘मारुती800’चे मालक असणे हे त्या काळी प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई आणि पंजाबात तर ‘मारुती मॅरेज’ म्हणजेच विवाह निश्चित करताना मारुती हुंड्याचा अविभाज्य घटक बनला. एका अर्थाने भारतातील वाहन उद्योगाला मारुतीने जन्माला घातले असे म्हटले, तर ती अतिशयोक्ती ठरू नये. सुझुकीमुळे भारतात जपानी तंत्रज्ञानच नव्हे, तर त्यांच्या कामाची संस्कृतीही रुजली आणि त्यांच्या अत्याधुनिक उत्पादन पद्धतीच्या अवलंबामुळे कार्यक्षमतेचा जणू वस्तुपाठच भारतीयांना मिळाला.

मारुतीचे नेतृत्व आर. सी. भार्गव यांनी 16 वर्षे केले आणि त्यांच्या कारकीर्दीत या कंपनीने गगनभरारी घेतली. सुरुवातीच्या कालखंडात सरकारने पूर्ण ताकद या प्रकल्पाच्या मागे उभी केली. त्यामुळेही लालफितीचा फटका त्यांना बसला नाही. त्यामुळे मारुतीने वाहन उद्योगात अनेक मानदंड प्रस्थापित केले. भारतात वाहन उद्योगाला आवश्यक असणार्‍या सुट्या भागांच्या निर्मितीला मोठी चालना मारुतीमुळेच मिळाली. मारुतीने विक्रीच्या बाबतीतही अनेक नवे मार्ग चोखाळले. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवत विक्रीपश्चात सेवेकडेही मारुतीने पूर्ण लक्ष दिल्याने जीवघेण्या स्पर्धेतही त्यांनी बाजारपेठेतील आपली पकड कायम ठेवली. अखेरीस मारुती उद्योगाचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून व्ही. कृष्णमूर्ती यांची नेमणूक करण्यात आली. व्ही. कृष्णमूर्ती आणि आर. सी. भार्गव यांच्या नेतृत्वाखाली मारुती उद्योगाने भरारी घेतली. जपानच्या सुझुकीने तंत्रज्ञान देऊ केले आणि त्यानंतर मारुतीने कधीच मागे वळून बघितले नाही.

मारुतीच्या यशाने भारतीय वाहन उद्योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. मारुतीमुळे वाहनांच्या सुट्या भागांच्या निर्मितीला मोठी चालना मिळाली. मारुतीचे अनेक पुरवठादार आज जगभरातल्या अनेक आघाडीच्या वाहन कंपन्यांना सुटे भाग पुरवतात. मारुतीमुळेच भारतातली वाहनांची बाजारपेठ प्रचंड विस्तारली. भारत वाहन उद्योगात जागतिक स्तरावर दर्जाच्या बाबतीत स्पर्धेत तग धरू शकतो, हे आत्मभान केवळ आणि केवळ मारुतीच्या निर्मितीने दिले. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘मेरे डॅड की मारुती’ ही मारुतीला दिलेली मानवंदनाच म्हणावी लागेल. एका अर्थाने मारुती उद्योगाने भारतीय उद्योग, अर्थव्यवस्था, सामाजिक मन्वंतर घडवले, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
(mandarpurkar@gmail.com)