आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjushri Kulkarni Article About Sammelan, Divya Marathi

स्वकर्तृत्व सिद्ध करणार्‍यांचे संमेलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलन असं लिहिताना/वाचताना वा उच्चारताना एक वैषम्य दाटून येते. त्याचे कारण साहित्याच्या आधी लागलेला अपंग हा शब्द! साहित्य अपंग असू शकते? विकलांग असलेल्या व्यक्तीची निर्मिती साहित्यात गणली जावी, अशी असू शकते. नव्हे असते! वर्षानुवर्षे साहित्य संमेलने आयोजित केली जातात. त्या ठिकाणी सादर होणारे कविसंमेलन किंवा परिसंवाद ऐकल्यानंतर किंवा सध्या प्रकाशित होत असणार्‍या पुस्तकांची संख्या अन् त्यातले साहित्य वाचल्यानंतर का हे अक्षरचिन्ह मन:पटलावर उमटल्याशिवाय राहत नाही. लगेचच त्या पुस्तकांना मिळणारे पुरस्कार पाहून (अपवाद निर्विवाद आहेतच!) समर्थ रामदास स्वामींचे रोज एक ओळ तरी लिहावी हे वचन न जाणता मनावर घेतले की काय, असा संभ्रम निर्माण झाल्याखेरीज राहत नाही. दरवर्षी त्याच त्या साहित्यिकांचा सहभाग हाही विवादाचा विषय असल्याचे समाजमन बोलतेच! या पार्श्वभूमीवर अपंग साहित्यिकांचा सहभाग विचारातही न घेतला जावा ही निषेधात्मक बाब!
अर्थात साहित्य हे विवेक विचाराशी निगडित आहे त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अपंग या वर्गात गणल्या जाणार्‍या सद्विचारी व्यक्ती सुदृढ साहित्यिक म्हणून आपली भूमिका बजावत आहेत. कुठलाही निषेध न नोंदवता काही अपंग बांधवांनीच पुढाकार घेऊन काही ठिकाणी अपंग साहित्य संमेलनांचे आयोजन करायला सुरुवात केली. त्याचीही दखल किती घेतली गेली, हे सांगणे न लगे!
गेल्या तीन वर्षांपासून बापूसाहेब बोभाटे (सातारा) यांनी अपंग साहित्य व सांस्कृतिक परिषदेच्या माध्यमातून अपंग साहित्य संमेलन आयोजित करायला पुढाकार घेतला. सातारा, वसई, कराड या ठिकाणी तीन साहित्य संमेलने पार पडलीत. तिसर्‍या साहित्य संमेलनात पुणे येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. रवींद्र नांदेडकर समारोपीय अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांनी एकंदर संमेलनाचे स्वरूप पाहून आणि आयोजनामागची तळमळ जाणून त्यात लक्ष घालण्याचे ठरवले. हा केवळ अपंग मेळावा ठरू नये तर खर्‍या अर्थाने साहित्य मेजवानीसह मंथन प्रक्रियेची देवाण-घेवाण ठरावी या उद्देशाने चौथे साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
काही पथ्य पहिल्या बैठकीपासूनच पाळण्याचे ठरवले गेले. नव्वद टक्के सहभाग अपंग साहित्यिकांचा राहील. कार्यक्रमाचा दर्जा उत्तम ठेवला जाईल. परिसंवादातून विचारमंथन प्रक्रिया घडून येईल आणि कायमस्वरूपी क्रांतिकारी परिवर्तनाचा श्रीगणेशा होईल. आयोजनामागची दुसरी भूमिकाही तेवढीच महत्त्वाची. ती म्हणजे अपंग बांधवांना ‘परिस्थितीसमोर हात टेकणे’ या मन:स्थितीतून बाहेर काढणे! अपंगत्व म्हणजे समाजासमोर फक्त हात पसरणे नाही. आम्हाला मिळालेच पाहिजे हा अट्टहास धरून जगण्याच्या कृतिशील प्रयत्नांपासून दूर पळणे नव्हे. शिक्षणाने विचारांची बैठक तयार होते, अवांतर वाचनामुळे ती पक्की होते. प्रगतीच्या वाटा समोर ठळक होतात. त्या वाटेवर सकारात्मक इच्छाशक्तीसह निघालो तर मार्गदर्शकही सामोरे येतात आणि अपंगत्व प्रगतीला बाधक नाही तर बोधक ठरू शकते, हा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आज अनेक अपंग बांधव अपंगांना लाजवतील, असे कर्तृत्व सिद्ध करताहेत. ही उदाहरणे इतर विकलांग व्यक्तींकरिता प्रेरक ठरतील आणि संमेलन, अधिवेशन वा इतर कुठल्याही कार्यक्रमात सामील होणे ‘काय मिळणार?’ या अटीवर अवलंबून राहणार नाही. या दुहेरी उद्देशासह या संमेलनाची तयारी सुरू आहे. तन-मन-धनासह जगन्नाथाचा हा रथ ओढण्याकरिता हातभार लावावा या सदिच्छेसह अनेक जण कामाला लागले आहेत.
उद्देश चांगला असला की कार्यपूर्ततेसाठी अवघे चराचर मदतीला धावून येते. समाजाला संस्कारातून समृद्धीकडे नेण्याचा प्रयत्न करणार्‍या संस्कार ग्रुपने सर्वसंमतीने सहर्ष स्वागत करून संमेलनाचे पालकत्व स्वीकारले. वैकुंठ कुंभार या संस्कार ग्रुपमधील युवकाने स्वागताध्यक्ष ही जबाबदारी उचलली. समाजात सत्कार्य करणार्‍या अनेक संस्था पुढे सरसावल्या. प्रमुख अतिथीपदीही तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्ती विराजमान झाल्या.संमेलनाध्यक्ष म्हणून युवा अपंग साहित्यिक सोनाली नवांगुळ, उद्घाटक म्हणून फ. मुं. शिंदे, प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, मुख्य आयुक्त (अपंग कल्याण) भारत सरकार बाजीराव जाधव, संजय नावकारे समाजकल्याण राज्यमंत्री यांसह इतर मंडळींच्या उपस्थितीत संमेलनाचा सोहळा संपन्न होईल. संमेलनस्थळाला संत सूरदासनगरीचे रूप देण्यात येईल. संमेलनातील परिसंवादाचे विषय परिवर्तन प्रक्रियेला साजेसे आहेत. कविसंमेलनातले निमंत्रित कवीही देशभरातून येत आहेत. भारतभरातल्या अपंग कलाकारांचा कलाविष्कार या वेळी सादर होणार आहे. (त्यात व्हिलचेअर दांडिया, प्रज्ञाचक्षू मुलींचे दीपनृत्य हे विशेष आकर्षण) यशोगाथा या सत्रांतर्गत अपंगत्वावर मात करून स्वकर्तृत्व सिद्ध करणार्‍या किमयागारांची मुलाखत घेतली जाणार आहे. ‘अपंगत्व म्हणजे केवळ वेदना नाही,’ हा विचार रुजवणार्‍या राजेंद्र चव्हाण या कवीचा ‘हसरे क्षण’ हा कार्यक्रमही हास्यमेजवानीसाठी कार्यक्रम पत्रिकेत आरूढ झाला आहे. मनाची मरगळ दूर करून जगण्याची नवी उमेद देणारा ‘मी झेप घेणारच’ हा संजय बैरागी यांचा कार्यक्रमही होणार आहे.
साहित्य संमेलनाचा अविभाज्य भाग म्हणजे पुस्तक प्रकाशन. या ठिकाणीही ब्रेल पुस्तकांसह इतर पुस्तके प्रकाशनासाठी सज्ज आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक ठरणारा 12000 पानांचा ज्ञानकोश या संमेलनाचे कार्यवाह असलेले नीलेश छडवेलकर यांच्या अथक परिश्रमातून साकार झाला आहे. त्याच्या मोबाइल आवृत्तीचे विमोचन या ठिकाणी होणार आहे. संमेलनस्थळी अनेक संस्था आपले कार्य, त्या कार्याशी निगडित उपकरणे, अपंग बांधवांनी निर्माण केलेल्या वस्तू यांची माहिती देणारे स्टॉल लावणार आहेत. निसर्ग मंगल कार्यालयाच्या विशाल प्रांगणात सरस्वतीचे वालुकाशिल्पही अकोला येथील अष्टपैलू कलाकार राजेश टावरी साकारणार आहेत.
या संमेलनातून घ्यायचे आहे ते मौलिक विचारधन, ज्यातून अविचारी, अविवेकी गोष्टींना आयुष्यातून वजा करण्याचा अव्यक्त करार सार्‍यांनी करायचा आहे. मान-अपमानाला, समज-गैरसमजाला दूर सारून आयोजन यादीत नाव नसले तरी आपलेपणाच्या भावनेने या संमेलनात सर्वार्थाने सहभागी व्हायचे आहे. मनोरंजन, विचारमंथन, प्रेरणा, मार्गदर्शन अशा विविध पैलूंनी नटलेल्या या साहित्य संमेलनाला अपंग साहित्य संमेलन म्हणावे का, हा विचार प्रत्येकाने करावा, या उदात्त उद्देशाने हे संमेलन होत आहे.