आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manmohan Singh Gives A Solid Punch To Opposition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पंतप्रधानांचा काटशह (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी एका लहानशा वाटणा-या खेळीने राजकीय बुद्धिबळाच्या पटावरील सोंगट्यांचे समीकरण बदलून टाकले आहे. सुशीलकुमार शिंदे हे ‘आदर्श’ प्रकरणात अडकल्यामुळे त्यांचे करिअर संपले असे त्यांच्या ब-याच हितशत्रूंना वाटत होते. राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची तर शिंदे यांच्यावर विशेष खुन्नस! एक कारण म्हणजे शरद पवारांनी शिंदे यांना प्रथम काँग्रेसमध्ये आणि नंतर त्यांच्या समाजवादी काँग्रेसमध्ये (1978) आणून ‘उपकृत’ केले, अशी राष्ट्रवाद्यांची भावना. पण पुढे शिंदे यांनी पवारांचा हात सोडला आणि ते राजीव-सोनिया-राहुल परिवाराचे निष्ठावान अनुयायी झाले. शिंदे यांना केंद्रात महत्त्वाचे पद मिळणार आणि ते पद पवारांनाही सीनियर असणार या कल्पनेनेच राष्ट्रवादी नेत्यांनी हवालदिल होऊन थयथयाट सुरू केला होता. गेल्या आठवड्यातील पवारांचे बंड हेही त्याच कारणामुळे होते. शिंदे यांना थोपवण्याचा तो एक केविलवाणा प्रयत्न होता. त्या बंडामुळे शिंदे यांची नियुक्ती आठवडाभर लांबलीच इतकेच. पण डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी त्या बंडाचा ‘फियास्को’ झाल्यावर लगेच शिंदे यांची गृहमंत्रिपदावर नियुक्ती केली. ‘ढोर’ म्हणून ओळखली जाणारी त्यांची अतिशय मागासलेली दलित जात. अशा व्यक्तीची गृहमंत्रिपदी नियुक्ती करून काँग्रेस पक्षाने फक्त जातीयच नव्हे तर शिंदे यांच्या दीर्घ राजकीय अनुभवालाही दाद दिली आहे. महाराष्ट्र अडचणीत असताना 2004 मध्ये त्यांनी राज्यात काँग्रेसला पुन्हा बहुमत मिळवून दिले होते. महाराष्ट्रात ते अर्थमंत्रिपदावर एकूण 9 वर्षे होते. केंद्रातही त्यांनी कॅबिनेटची अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. त्यामुळे केवळ जातीच्या निकषावर त्यांना गृहमंत्री केले हा त्यांच्या विरोधकांचा कांगावा किती पोकळ आहे हे सहज लक्षात येऊ शकेल. त्याचप्रमाणे पी. चिदंबरम यांना पुन्हा अर्थमंत्रिपद देऊन डॉ. मनमोहन सिंग यांनी भाजपच्या पायाखालील जाजम खेचून घेतले आहे. चिदंबरम यांना लक्ष्य करून सरकारला नामोहरम करण्याचा प्रयत्न भाजप गेले वर्षभर करत आहे. त्यांच्या त्या दांडगाईला न जुमानता चिदंबरम यांची नियुक्ती करून पंतप्रधानांनी आपण पूर्ण ‘कमांड’मध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी ज्या विभागाचे प्रमुख पद म्हणून आज शिंदेंकडे आली आहे, त्याच म्हणजे पोलिस खात्यात अतिशय खालच्या पदावर केलेल्या कामाचा त्यांना अनुभव असल्याने ते या विभागात सर्वात प्रभावी गृहमंत्री ठरू शकतात. कारण त्यांना या खात्याच्या खालच्या स्तरापासून ते गृहसचिवापर्यंत सर्व स्तरांवर चालणा-या कामाचे स्वरूप माहीत आहे. पी. चिदंबरम यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी दिल्याने संपूर्ण उद्योग जगतात आनंदाची लहर उमटली आहे. संपूर्ण जगासमोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक अडचणींना अखेर आपल्यालाही तोंड द्यावे लागत आहे. एकीकडे शेतीवर अवलंबून असलेली 55 टक्के जनता तर दुसरीकडे नव्याने उदयास आलेला मध्यमवर्ग व त्याच्या अर्थव्यवस्थेकडून असलेल्या अपेक्षा यांचा मेळ घालता घालताच जागतिक मंदीच्या सावटामुळे देशाच्या गुंतवणुकीवर विपरीत परिणाम झालेला आहे. त्यामुळे एकीकडे देशातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार या वर्गाला असे वाटते आहे की यूपीएचा राज्यकारभार हा केवळ ‘आहे रे’ वर्गासाठीच सुरू आहे. तर दुसरीकडे कॉर्पोरेट जगताला उदारीकरणाचे धोरण अचानक थांबल्यासारखे झाल्याने काँग्रेस पुन्हा एकदा 1991 पूर्वीच्या मिश्र अर्थव्यवस्थेकडे सरकते आहे की काय, अशी भीती वाटायला लागली आहे. अशा परिस्थितीत देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये विश्वासाचे वातावरण तयार करायचे असल्यास त्यासाठी देशाची आर्थिक घडी व्यवस्थित लावणे हे प्रथम कर्तव्य आहे. हे ओळखूनच सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा चिदंबरम यांच्यावर या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी टाकलेली दिसते. वीरप्पा मोइली यांनी कॉर्पोरेट क्षेत्राचे मंत्री म्हणून पार पाडलेली जबाबदारी उल्लेखनीय नसली तरी समाधानकारक नक्कीच होती. त्यामुळे सध्या विविध प्रश्नांनी त्रस्त असलेल्या ऊर्जा खात्याची अतिरिक्त जबाबदारी काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांच्या खांद्यावर टाकलेली दिसते. मात्र या केंद्रीय मंत्रिमंडळातील खाते फेरबदलामुळे भाजप व अण्णा परिवार या दोघांनाही मोठा पोटशूळ उठण्याची शक्यता आहे. सगळे मुसलमान हे अतिरेकी नसले तरी सगळे अतिरेकी मात्र मुसलमानच असतात हा संघ परिवाराचा सिद्धांत देशातील दोन उच्चवर्णीय हिंदूंनी हाणून पाडला. त्यातले एक शहीद हेमंत करकरे व दुसरे पी. चिदंबरम हे होत! या देशातील सर्वच अतिरेकी हे मुसलमान नसून त्यात केशरी रंगही बेमालूमपणे मिसळलेला आहे, हे ठासून जगासमोर आणण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. त्यातील हेमंत करकरे हे अतिरेक्यांशी लढतानाच धारातीर्थी पडल्याने त्यांच्यावर संघ परिवार सध्या काही बोलत नाही. अन्यथा ते हयात असताना संघ परिवार, शिवसेना यांनी करकरे यांच्यावर ज्या पातळीवर घसरून टीका केली होती, ती आठवली तरी अंगावर शहारे येतात. करकरे यांनी उघड केलेल्या सत्यावर चिदंबरम यांनी देशाच्या संसदेतच शिक्कामोर्तब केल्याने चिदंबरम हे संघ परिवाराचे अत्यंत आवडते टार्गेट आहेत. हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलेल्या चिदंबरम यांनी कायद्याचाही अभ्यास केल्याने व अत्यंत मृदू शैलीत समोरच्याच्या मुद्द्यांना तार्किकदृष्ट्या खोडून काढण्यात त्यांच्याइतका वाकबगार दुसरा कुणीही नसल्याने संसद या देशाच्या सर्वोच्च चर्चा मंचावर चर्चेला फाटा देऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याचे असंसदीय हत्यार त्यामुळेच भाजपला उचलावे लागले. अर्थातच, चिदंबरम यांच्यावर अर्थमंत्रिपदाची जबाबदारी टाकल्याने सर्वाधिक मिरच्या जर कुणाला झोंबल्या असतील तर त्या संघ परिवार व त्यांची राजकीय आघाडी असलेल्या भारतीय जनता पक्षाला, यात काहीच वाद नाही. त्यामुळेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आता पुन्हा एकदा भाजपचे चाणक्य काही ना काही कारण काढून चिदंबरम यांच्या निमित्ताने अर्थखात्यावर अकारण टीका करण्यात स्वत:चा व संसदेचा वेळ वाया घालवणार हे नक्की आहे. मात्र नवी जबाबदारी आलेले सुशीलकुमार शिंदे व पी. चिदंबरम या दोघांसमोरही आव्हाने खूपच मोठी आहेत. सध्या आसाममध्ये जे काही सुरू आहे, ते लवकरात लवकर कसे शमवावे यासाठी शिंदे यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.