आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय करायचा तर जगातील बदलत्या प्रवाहाप्रमाणे बदलले पाहिजे. महाराष्ट्री य उद्योजकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यांचे एकमेकांशी नेटवर्कींग होणे खूप गरजेचे आहे. आताचे जग झपाट्याने बदलत आहे, या बदलांचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. आपणा सर्वांनाच ज्ञात आहे की आपण आपला व्यवसाय आपल्या वर्तुळापुरता मर्यादित ठेवला तर त्याची तितकीशी प्रगती होणार नाही. आजच्या जगात ‘बिझनेस नेटर्वकिंग’ हा उद्योगाच्या यशाचा मंत्र आहे. ‘बिझनेस नेटर्वकिंग’ म्हणजे नेमके काय? यामध्ये उद्योजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उद्योजकांना भेटणे, त्यांना वैयक्तिकरीत्या तसेच उद्योगाच्या बाबतीत जाणून घेणे, त्यांच्याशी व्यावसायिक चर्चा करणे आणि त्यांच्या संपर्कात राहणे याचा समावेश होतो.
बदलत्या काळाची पावले ओळखून महाराष्ट्री य उद्योजकांसाठी कार्यरत असणा-या ‘सॅटर्डे क्लब’ मार्फत उद्योजकांना प्रोत्साहन मिळावे, आपल्या सभासदांचे संघटन व्हावे, त्यांच्यामध्ये व्यावसायिक आदानप्रदान व्हावे व एकंदरीत व्यवसाय वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘उद्योगबोध 2013’ या नावाने उद्योजकांची भव्य आंतरराष्ट्री य परिषद (ग्लोबल कॉन्फरन्स) येत्या 2 फेब्रुवारी रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित केली आहे. ही परिषद दिवसभराची असून आपल्या व्यवसायास विशिष्ट उंचीपर्यंत नेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, व्यवसायातील जबाबदा-या वाटून ख-या अर्थाने स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी कोणती भूमिका अंगीकारली पाहिजे आणि उद्योगातील यशाची गमके अशा विविध विषयांवर तज्ज्ञ मंडळी परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
काळाच्या प्रवाहात आणि बदलत्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उद्योजकांचे अचूक संघटन, योग्य नियोजन करणे अतिशय आवश्यक आहे, यासाठी ‘उद्योगभरारी 2013’ ही परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचा मानस या संघटनेचे संस्थापक विश्वस्त इंजिनिअर माधवराव भिडे यांनी व्यक्त केला. या परिषदेमध्ये विविध उद्योग क्षेत्रातील, व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे अनुभव, उद्योग उभारताना त्यांना आलेल्या अडचणी, त्यावर त्यांनी केलेली मात, शासनाची धोरणे यांबाबत चर्चा होते. त्यामुळे ही परिषद केवळ प्रस्थापित उद्योजकांसाठी नसून नवउद्योजकांनाही त्याचा निश्चितच लाभ होणार आहे.
आंतरराष्ट्री य परिषदेच्या निमित्ताने ज्यांनी उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, अशा उद्योजक स्त्री-पुरुषांना ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ ही जागतिक संघटना जगभरातील उद्योजकांना एकत्र आणून त्यांचे व्यावसायिक आदानप्रदान व्हावे, नेटर्वकिंग वाढावे, या उद्देशाने 17 डिसेंबर 2000 रोजी माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून स्थापन झाली. सॅटर्डे क्लबचा कार्यविस्तार हा केवळ महाराष्ट्रापुरता, देशापुरता मर्यादित न राहता परदेशातही अनेक ठिकाणी सॅटर्डे क्लब कार्यरत आहे. सॅटर्डे क्लबच्या बैठकीमध्ये आर्थिक, औद्योगिक, तसेच गुंतवणूकविषयक, मार्केटिंग विषयांतील तज्ज्ञांच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाते. सभासदांना व्यवसाय करताना येणा-या अडचणी, मार्केटिंग, गुंतवणूक, औद्योगिक कायदे यांच्याविषयीची माहिती मिळते.
महाराष्ट्री य माणसाजवळ बुद्धिमत्ता आहे, त्याच्यावर चांगले संस्कार आहेत, त्याने एकदा ठरवले तर प्रचंड कष्ट करायची त्याची तयारी आहे, पण उद्योजकतेचा अजूनही अभाव आहे, म्हणूनच सॅटर्डे क्लब उद्योजकता वाढीस लागण्यासाठी प्रयत्नशील आहे. सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून त्यांच्या सदस्यांना केवळ देशातच नव्हे तर देशाबाहेरही आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी संधी मिळते. आंतरराष्ट्री य परिषदेच्या निमित्ताने सॅटर्डे क्लबच्या परिषदेमध्ये विशेषकरून परदेशातून मान्यवर उद्योजक मंडळी येतात, त्यांच्याबरोबर क्लब सदस्यांचे नेटर्वकिंग होते आणि या ओळखीमधून, नेटर्वकिंगच्या साहाय्याने सॅटर्डे क्लबच्या अनेक सभासदांना परदेशात व्यापार करण्याच्या दृष्टीने संधीची नवी दालने खुली झाली आहेत. उद्योजकांनो, आपण आपल्या उद्योगाच्या चौकटी, कक्षा रुंदावल्या पाहिजेत. सकारात्मक दृष्टिकोनातून एखाद्या परिस्थितीकडे पाहणेसुद्धा आवश्यक आहे. स्वत:च्या उद्योगाचा विकास हा आपल्या कक्षेत राहून प्रत्येक जण करतच असतो, पण आपल्या उद्योग विश्वात इतरांना सहभागी करून त्यांच्या उद्योग विश्वाला मनापासून साथ द्यायला जर प्रत्येक उद्योजक शिकला तर नक्कीच औद्योगिक क्रांती होईल. मराठी माणसांची वृत्ती खेकड्याची आहे, अशी भावना पुसून जाऊन सहकार्यातून, जिव्हाळ्यातून, एकमेकांशी संवाद साधून एकमेकांचा व्यवसाय वाढवण्याची विचारधारा सॅटर्डे क्लबचे ब्रीदवाक्य ‘एकमेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत’ ख-या अर्थाने सार्थ ठरेल.
आजचे युग हे संवादाचे युग आहे. आपल्या दिमतीला ई-मेल, टेलिफोन, फॅक्स, इंटरनेट तर आहेच, पण सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक उद्योजकांच्या संपर्कात तुम्ही याल, त्यांचा तुमच्याशी परिचय होईल व त्यांच्या व्यवसायाच स्वरूप, उद्योगाचे स्वरूप याची तुम्हाला माहिती होईल. आपल्या व्यवसायात काय बदल आणले पाहिजेत, यावर विचार करता येईल.
sarikapawar2@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.