आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी चित्रपटांचे सुपरहिट यश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिना मराठी चित्रपटसृष्टीत नवी परिमाणे घेऊन आला आहे. संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या मराठी चित्रपटाने भाग मिल्खा भाग, लुटेरा, रमय्या वस्तावय्या, डीडे, पोलिसगिरी अशा पाच बिग बजेट हिंदी चित्रपटांच्या भाऊगर्दीत दमदार व्यावसायिक यश मिळवून चित्रपट समीक्षकांना चकित केलेले आहे. दोन आठवड्यांत या चित्रपटाने सव्वादोन कोटींचा पल्ला गाठला असून तिस-या आठवड्यात या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत आहेत. व्यावसायिक चित्रपट निर्मितीवर आमचीच मक्तेदारी असे मानणा-या हिंदीवाल्यांना हे एक जबरदस्त आव्हान मानता येईल.


प्रसिद्ध मराठी साहित्यिक सुहास शिरवळकर यांच्या रेट्रो लूक या कादंबरीतील 80 च्या दशकातील कथानक आणि हिंदी चित्रपटासारखा लूक घेऊन आलेला दुनियादारी चित्रपट तरुणाईसह सर्वच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला आहे. शिवाय स्मरणात राहणारे डायलॉग, अभिनय आणि कथानकाच्या प्रभावी मांडणीमुळे हा चित्रपट हिंदीच्या जवळ जातो. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मराठी चित्रपटही व्यावसायिक यश मिळवू शकतात, हे नवे समीकरण मांडले आहे. ‘दुनियादारी’पूर्वीही मराठी चित्रपटांनी यश मिळवले आहे. दुनियादारीच्या बरोबरीने प्रदर्शित झालेला श्रीमंत दामोदरपंत हा केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटही चांगलेच यश मिळवतोय. पण, ‘दुनियादारी’ने केवळ व्यावसायिक यश मिळवले नाही तर हिंदी चित्रपटांना डोक्यावर घेणा-या आणि मल्टिप्लेक्स चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत, हे महत्त्वाचे आहे.


बीपी-बालक पालक, विहीर, बाबू बँड बाजा, अजंठा, बालगंधर्व या चित्रपटांनीही आपले वेगळेपण जपले आहे. कमी बजेट, मोठमोठ्या कलावंतांचा अभाव, तंत्राचा अभाव अशा सगळ्या गोष्टींची कमतरता असताना होणारी चित्रपट निर्मिती. तसेच चित्रपट तयार झाल्यानंतर चित्रपटगृह मिळवण्यासाठी वेगळी धावपळ करावी लागते. अशा सर्व अभावांचा सामना करत एका मराठी चित्रपटाने मिळवलेले व्यावसायिक यश नजरेत भरणारे आहे, असेच म्हणावे लागेल. मराठी चित्रपटाचा प्रारंभीचा काळ हा अध्यात्म व पौराणिक चित्रपटांचा होता. या काळात तमाशा आणि गावपातळीवरील राजकारण या विषयांचा मराठीवर प्रभाव राहिला. त्याकाळात तमाशाशिवाय मराठी चित्रपटाची कल्पनाच केली जात नव्हती. काही चित्रपट याला अपवादही राहिले. पुढे दादा कोंडके यांच्या द्व्यर्थी संवाद असलेल्या चित्रपटांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवले. त्यानंतर अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या विनोदी चित्रपटांची लाट आली. मधल्या काळात लेक चालली सासरला, माहेरची साडी या चित्रपटांनी महिला समस्यांवर प्रकाश टाकणा-या चित्रपटांचे युग आणले. एखादा चित्रपट हिट झाला की त्याच कथानकावर चित्रपट काढण्याची प्रथाच जणू पडली. त्यानंतर नवा प्रवाह घेऊन येणा-या श्वास चित्रपटाने मराठी चित्रपटाला या प्रथेतून बाहेर काढले असे म्हणावे लागेल. या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली. श्वास चित्रपटानंतर बरेच चांगले प्रयोग मराठीत पाहायला मिळाले. राष्ट्रीय पुरस्कार आणि चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाची छाप पडत असताना व्यावसायिक पातळीवर मराठी चित्रपटांचा प्रभाव कमीच होता. आता दुनियादारी, श्रीमंत दामोदरपंत या चित्रपटांनी व्यावसायिक यशाचे नवे मापदंड घालून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एक चांगला मराठी चित्रपट हिंदीच्या जवळपास पोहोचला असून मराठी चित्रपटसृष्टीच्या बळकटीकरणाची ही नांदीच म्हणता येईल.


हिंदी चित्रपटात दर्जापेक्षा व्यावसायिक यश प्रमाण मानले जाते. सध्या 100 कोटींच्या
क्लबची चलती आहे.हिंदी चित्रपटाच्या 100 कोटी व्यवसायाची वाटचाल पाहिल्यास मुंबई- पुणे या शहरांत मिळणा-या यशाचा वाटा सिंहाचा असतो. दक्षिणेत हिंदी सिनेमाला प्रादेशिक भाषेपेक्षा दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे मुंबईत मिळणा-या व्यावसायिक यशावरच हिंदी चित्रपटाचे सुपरहिट, हिट, सरासरी फ्लॉपचे भवितव्य ठरत असते. त्यामुळे चित्रपट वितरकांचे यशाची गणिते मुंबईवरच केंद्रित असतात. आता शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’साठी ‘दुनियादारी’ला काही चित्रपटगृहांतून हटवण्याचा प्रयत्नही झाला .आता ‘दुनियादारी’सारखे व्यावसायिकदृष्ट्या सक्षम चित्रपट मराठीत येऊ लागल्यास हिंदी चित्रपटांसमोर धोक्याची घंटा म्हणता येईल. आशयपूर्ण
चित्रपटांतील गुणवत्ता मराठीने यापूर्वीच सिद्ध केली आहे. आता ‘दुनियादारी’च्या निमित्ताने व्यावसायिक दृष्टिकोनाची सुरुवात मराठीत होतेय, असे म्हणता येईल.