आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटसृष्टीतील मराठमोळा निर्माता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधाकर बोकाडे यांचे रविवारी रात्री कोकिळाबेन इस्पितळात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सोमवारी सकाळीच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्काच बसला. सुधाकर बोकाडे नेहमीप्रमाणे एकाच वेळेस चार चित्रपटांच्या निर्मितीत व्यग्र होते. सुधाकर बोकाडे यांनी चित्रपटात अनेक वेगवेगळे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच यशस्वी ठरले होते. साजन, प्रहार, इज्जतदार हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. त्यांनी केवळ हिंदीच चित्रपट तयार केले असे नाही, तर पटली रे पटली आणि मायलेक या दोन मराठी आणि पडका या एका गुजराती चित्रपटाचीही निर्मिती केली होती. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुधाकर बोकाडे त्यांच्या कुटुंबातील पहिले पदवीधारक होते. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटांची आवड होती आणि फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणे त्यांना आवडत असे. एअर इंडियामध्ये लोडर म्हणून काम करीत असतानाच त्यांनी 1989 मध्ये आपल्या मुलीच्या म्हणजेच दिव्याच्या नावावर दिव्या फिल्म्स इंटरनॅशनल बॅनरची स्थापना करून चित्रपट निर्मितीत उडी घेतली होती. त्यांच्याकडे पैसा कुठून आला, कसा आला याबाबत त्या वेळी बरीच चर्चा झाली होती. डी गँगने सुधाकर बोकाडे यांना निर्माता म्हणून बॉलीवूडमध्ये उभे केले असल्याची खमंग चर्चा होत असे.


दिलीपकुमार, गोविंदा यांना घेऊन ‘इज्जतदार’ चित्रपटाला सुरुवात केली होती. दिलीपकुमार यांना चित्रपटात घेणे म्हणजे त्या वेळेस मोठी गोष्ट मानली जात असे. दिलीपकुमार सहजासहजी चित्रपटात काम करण्यास तयार होत नसत. मात्र, सुधाकर बोकाडे यांच्यासारख्या नव्या निर्मात्याबरोबर ते तयार झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बोकाडे यांचा डी गँगशी संबंध असल्यानेच दिलीपकुमार, गोविंदा, माधुरी दीक्षित काम करण्यास तयार झाल्याचे बोलले जात होते. चित्रपटाला संगीत त्या वेळचे आघाडीचे संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते, तर दिग्दर्शन दक्षिणेतील प्रख्यात दिग्दर्शक के. बापय्या यांनी केले होते. एका नव्या निर्मात्याने, त्यातही मराठी, पहिल्याच चित्रपटात अशी मोठी फौज जमवणे तसे कठीणच होते, परंतु सुधाकर बोकाडे यांनी ते करून दाखवले होते. डी गँगशी संबंध असल्याबाबत ‘साजन’च्या यशानंतर त्यांना थेट विचारले असता त्यांनी, मी व्याजावर पैसे घेऊन चित्रपट निर्मितीत उतरलो आहे असे सांगितले. मला चित्रपटांची आवड आहे आणि चांगले चित्रपट निर्माण करण्यासाठी मी आलो आहे.


‘इज्जतदार’ तिकीट खिडकीवर म्हणावा तसा यशस्वी ठरला नाही, परंतु निर्माता म्हणून सुधाकर बोकाडे यांचे नाव झाले. चित्रीकरणाच्या दरम्यानच त्यांचे आणि दिलीपकुमार यांचे संबंधही गहिरे झाले होते. ‘इज्जतदार’नंतर त्यांनी जितेंद्र, जयाप्रदा आणि शिल्पा शिरोडकर यांना घेऊन ‘न्याय अन्याय’ चित्रपट तयार केला. या चित्रपटासाठी त्यांनी प्रख्यात कॅमेरामॅन लॉरेन्स डिसुझा यांना दिग्दर्शक म्हणून उभे केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही, परंतु तरीही त्यांनी लॉरेन्स डिसुझा यांच्यावर विश्वास ठेवला आणि ‘साजन’ चित्रपटाची सुरुवात केली. सलमान खान, माधुरी आणि संजय दत्त द्वारा अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणारा ठरला. या चित्रपटाने सलमान आणि संजय दत्त यांच्या कारकीर्दीची गाडी सुसाट दौडवली.


सुधाकर बोकाडे यांनी फक्त लॉरेन्स डिसुझा यांनाच दिग्दर्शक बनवले असे नाही, तर त्यांनी नाना पाटेकर यांनाही ‘प्रहार’मधून दिग्दर्शकाच्या रूपात प्रेक्षकांसमोर आणले. वेगळ्या कथेवरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब-यापैकी यशस्वी झाला होता. चित्रपटाने अनेक पुरस्कारही पटकावले. यानंतर सुधाकर बोकाडे यांनी अजय देवगण, सैफ अली, जॅकी श्रॉफ, करिना कपूरसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांबरोबर काम केले. त्यानंतर त्यांनी दिलीपकुमार यांना दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांसमोर आणण्याचे स्वप्न पाहिले आणि ‘कलिंगा’ चित्रपटाला सुरुवात केली, परंतु हा चित्रपट त्यांच्यासाठी अत्यंत अडचणींचा आणि कठीण परिस्थितीत नेणारा ठरला. अत्यंत महागडा असा हा चित्रपट दिलीपकुमार यांच्या संवादशैलीप्रमाणेच हळूहळू पुढे सरकू लागला. सुधाकर बोकाडे यांनी दिलीपकुमार, नाना पाटेकर, लॉरेन्स डिसुझा यांना जसे दिग्दर्शक म्हणून उभे केले तसेच आदेश श्रीवास्तवलाही संगीतकार म्हणून प्रेक्षकांपुढे आणले. चार-पाच वर्षांपूर्वी सुधाकर बोकाडे यांनी पुन्हा एकदा नव्याने आपल्या इनिंगला सुरुवात करण्याचे ठरवले आणि सुधाकर बोकाडे मोशन पिक्चर्स बॅनरअंतर्गत एकाच वेळेस चार चित्रपटांची निर्मिती सुरू केली. हे चित्रपट होते स्कॉटलंड एक्स्प्रेस, हँडस अप, बाय बाय गुड बाय आणि व्हाय, क्यों. या चारही चित्रपटात त्यांनी कलाकार, गायक, संगीतकाराच्या रूपात नव्या चेह-यांना संधी दिली. मात्र, सुधाकर बोकाडे ‘साजन’मुळे नेहमीच प्रेक्षकांच्या आठवणीत राहतील हे नक्की.