आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संमेलनाच्या खर्चात काटकसर व्हावी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदरणीय फ . मुं. शिंदे सर,
सस्नेह नमस्कार!
सासवड येथे होणार्‍या 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फ. मुं. शिंदे सरांची निवड झाल्याचा मनस्वी आनंद झाला. या प्रसन्नतेमागे काही कारणे आणि आशाही आहेत. अत्यंत आनंददायी म्हणजे कळमनुरी तालुक्यास हा बहुमान दुसर्‍यांदा मिळतो आहे. माझ्या तालुक्यातला, शिवेशेजारचा माणूस साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, याचा अभिमान वाटतो. यापूर्वी पणजी (गोवा) येथे 1994 मध्ये झालेल्या 67 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्राचार्य राम शेवाळकर यांची बिनविरोध निवड झाली. तेव्हाही आम्हास असाच अपूर्व आनंद झाला होता. तब्बल दीड दशकानंतर हा सुवर्णक्षण अनुभवण्याचा योग आपल्या रूपाने मिळालेला आहे.

प्राचार्य शेवाळकरांची निवड बिनविरोध झाली होती. आपणास निवडणूक लढवावी लागली असली तरी आपले व्यक्तिमत्त्व दूरवर पोहोचल्याची पावती मिळाली. विदर्भातूनही आपण आघाडीवर होता. ही आपल्या साहित्यिक योगदानाची महती आहे. तसेच या निवडणुकीत एक महत्त्वाची बाब म्हणजे, निवडणुकीदरम्यान कोणताही वाद उफाळून आला नाही. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक पार पडली. भविष्यात आपल्या नेतृत्वाखाली हीच प्रथा पुढे चालू राहावी. अध्यक्षांची निवडणूक म्हटले की कोणता ना कोणता वाद दरवर्षी होत असल्याचा इतिहास आहे. 1878 मध्ये पुणे येथे भरलेल्या साहित्य संमेलनात न्या. महादेव रानडे यांच्या निवडीवरून पहिल्याच साहित्य संमेलनात वादाचे पडघम वाजले होते.

प्राध्यापक असताना आपण ‘कलगीतुरा’ या सदरातून अनेक प्रश्नांना खुमासदार उत्तरे दिली होती. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड टाळता यावी, यासाठी प्रयत्न व्हावेत असे मला वाटते. साहित्य संमेलन आणि वादविवाद एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामान्य रसिकांना वादही नको आणि संमेलनही नको असे म्हणण्याची वेळ आली आहे. साहित्यिकही या निवडणुकीच्या संदर्भात प्रतिकूल मत नोंदवत आहेत. तर अनेक ज्येष्ठ साहित्यिक निवडणुकीच्या धुरळ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. अनेकांचा मतदार यादीवर आक्षेप असतो. या संमेलनाशी जोडलेल्या ज्या संस्था आहेत, त्यांची संख्या 50 हजारांच्या वर आहे. मतदार मात्र 1100-1200 असतील. अरुण गोडबोले यांनी असेच मत नोंदवले आहे. मतदार यादी आणि सभासद संख्या यातील तफावत दूर करायची असेल तर त्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी लागते. त्यासाठी कोणाची हरकत असण्याचे कारण नाही.

साहित्य संमेलनाच्या निवडणूक प्रक्रियेकडे आपण कसे पाहता? या प्रक्रियेचा आपण अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यात काही बदल आवश्यक आहेत का? अनेकांच्या मते माजी अध्यक्षांची एक निवड समिती असावी. त्यांनी नव्या अध्यक्षाची निवड करावी. याबाबत अनेकांनी विविध मते मांडली आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी असे सुचवले आहे की, वर्षभरात ज्या लेखकाच्या पुस्तकाची जास्त विक्री होईल, त्या लेखकाची साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड व्हायला हवी. अनेक मत-मतांतरे आहेत. त्यावर मंथन व्हायला हवे. परंतु त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आपण चाळीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात आहात, या प्रश्नावर आपणच तोडगा काढायला हवा.

संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी असावेत की नसावेत ही चर्चा सातत्याने सुरू असते. या प्रश्नावर आपण नुकतीच ‘असावेत’ अशी भूमिका मांडली. खरे तर हा प्रश्न तसा कालबाह्य आहे. कारण राजकारण आणि साहित्य एकमेकांशी पूरक आहेत असे मला वाटते. साहित्यिक रा. ग. जाधव म्हणाले, साहित्य संमेलनाचे उत्सवी रूप हे एका मोठ्या सामाजिक आजाराचा घटक आहे. संमेलनास येऊ पाहणारे उत्सवी स्वरूप अवाढव्य खर्च टाळता येईल का? कारण या खर्चापोटी स्थानिक साहित्यिकांना सरकारदरबारी किंवा दानशूर संस्था अथवा व्यक्तीकडे हात पसरावे लागतात.

विनामानधन संमेलन आणि काटकसर असा काही कमी खर्चाचा ताळेबंद अमलात आणलात तर चांगले होईल. तसे पाहता आपणाकडे केवळ वर्षभराचाच अवधी आहे. परंतु साहित्य रसिकांना विश्वास आहे की, आपण भरीव कार्य कराल. रत्नागिरी येथे दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत आपण संमेलने कमी खर्चात झाली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आपण चंगळवादी झालो आहोत असेही म्हटले आहे. परंतु संमेलने काटकसरीनेच व्हावीत अशी आम्हा रसिकांची अपेक्षा आहे.
आपला,
नागेश शेवाळकर