आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारस्वतांची टूरटूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी भरणारा मराठी सारस्वतांचा साहित्य संमेलनरूपी सोहळा यंदा थेट अटकेपार पंजाबच्या भूमीत घेण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. तसेच विश्व साहित्य संमेलनाची वारी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्गला जाऊन थडकणार आहे. महामंडळाची बैठक सुरू होईपर्यंत उस्मानाबादचे नाव असताना अचानक बैठकीत संमेलन बृहन्महाराष्ट्रात घेण्यावर एकमत कसे काय झाले, हा अनुत्तरित प्रश्न आहे.

महामंडळ घटनेनुसार काम करते, असा डांगोरा पिटणार्‍या महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी स्थळ निवड समितीचा अहवाल गुलदस्त्यात ठेवल्याचा आरोप केला जात आहे. संमेलनासाठी विक्रमी दहा निमंत्रणे महामंडळाकडे आली होती. त्यामुळे निवडीसाठी अनेक पर्याय होते; पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत संमेलन थेट पंजाबात नेण्याचा निर्णय तडकाफडकी कसा झाला, याविषयी पदाधिकार्‍यांनी मिठाची गुळणी धरली आहे.

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग येथे चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन घेण्यातही महामंडळ पदाधिकार्‍यांची टूरची हौसच अधोरेखित झाल्याची भावना व्यक्त होत आहे. पंजाब काय किंवा जोहान्सबर्ग काय, दोन्ही ठिकाणी महामंडळाचे पदाधिकारी (नेहमीप्रमाणेच) स्थानिक संयोजकांच्या जिवावर दौरे करणार, हे आता उघड गुपित आहे. यापूर्वी सॅन होजे, दुबई, सिंगापूर येथे झालेली संमेलने म्हणजे पदाधिकार्‍यांचीच टूरटूर होती. कॅनडात टोरंटोची टूर घडवण्यास स्थानिक आयोजकांनी आर्थिक असमर्थता दर्शवल्याचा इतिहास ताजा आहेच. त्यामुळे चौथे विश्व संमेलन रहित करावे लागले. तेव्हाची हौस महामंडळाचे पदाधिकारी आता जोहान्सबर्गला भागवणार असल्याचीही चर्चा आहे.

कॅनडातील विश्व संमेलनासाठी कवी ना. धों. महानोर यांची निवड करण्यात आली होती, पण ते संमेलनच झाले नसल्याने आता जोहान्सबर्गला तरी महानोरांची वर्णी लागणार का, असाही प्रश्न आहे. खरे तर साहित्य संमेलन मराठी भूमीत होणे, हीच त्याची शान आहे. गेल्या सातशे वर्षांत जिथे मराठीची कुठलीही अ‍ॅक्टिव्हिटी नाही, अशा सुदूर ठिकाणी साहित्य संमेलन भरवण्यात लाखो मराठी जनांना या साहित्यिक सोहळ्यापासून आपण वंचित ठेवत आहोत, याचीही महामंडळाला जाणीव नसावी, हे खेदजनक आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)