आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक आत्मभानाचा ‘सुधारक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक सुधारणांबाबतीत गोपाळ गणेश आगरकरांचं स्थान फार मोठं आहे. नव्या जगात वावरण्यासाठी आवश्यक सामाजिक आत्मभान त्यांनी महाराष्‍ट्रालाच नाही तर देशाला दिलं आहे. टिळकांशी वैचारिक मतभेद झाल्यावर आगरकरांनी ‘सुधारक’ हे साप्ताहिक वर्तमानपत्र काढलं. त्याचा पहिला अंक 15 ऑक्टोबर 1888 रोजी निघाला. या घटनेला आज 125 वर्षे पूर्ण होत आहेत. 1 ऑगस्ट 1888 रोजी ना. गोपाळकृष्ण गोखले आणि गोपाळ गणेश आगरकर या द्वयींनी ‘सुधारकाचे जाहीर पत्रक’ काढले. व्यापक जनप्रबोधनासाठी आगरकरांनी घेतलेली भूमिका स्तिमित करणारी आहे : ‘सर्व गोष्टींचा विचार करून पत्राचा साचा तूर्त केसरीएवढा धरला आहे व किंमत दोन रुपये ठेविली आहे.

बाहेरच्या वर्गणीदारांस किमतीशिवाय 13 आणे टपालहशील पडेल. ज्यांना घेण्याची इच्छा असेल त्यांनी आपली वर्गणी मॅनेजर, आर्यविजय छापखाना, बुधवार पेठ, पुणे या पत्त्यावर पाठवावी. ज्यांना हे पत्र घ्यावेसे वाटत असेल, पण ते बाहेर पडल्याशिवाय वर्गणी भरण्याचे धाडस होत नसेल, त्यांनी गोपाळ गणेश आगरकर, एम.ए, गोपाळ कृष्ण गोखले, बी.ए. या पत्त्यावर सध्या आपली नावे कळविली तरी बस होणार आहे.’


‘आमचे काय होणार?’ या लेखात धर्मविचारांची वाढ व उन्नतावस्था याबाबतीत आगरकरांनी सखोल वैज्ञानिक चर्चा केली आहे. त्यात ते म्हणतात, ‘सृष्टीतील भव्य जड पदार्थांविषयी, झाडाझुडपांविषयी व लहानमोठ्या जंतूंविषयी त्याला एक प्रकारची भीती उत्पन्न होऊन, त्याच्या अंत:करणात धर्मकल्पनेचा आविर्भाव होतो व उत्तरोत्तर तिचा स्पष्ट विकास होत जाऊन ती शुद्ध होत जाते. वारा, पाऊस, पूर, चंद्रसूर्याच्या गती वगैरे गोष्टींची कारणे व त्या घडून येण्याचे प्रसंग नीट कळून येऊ लागले, म्हणजे त्या वस्तूंवरील धर्मश्रद्धा हळूहळू उडू लागते व असाच प्रकार देव मानलेल्या वनस्पतींच्या व जनावरांच्या संबंधाने हळूहळू घडून येतो. हे सर्व विचारांतर होण्यास विशेषत: कार्यकारणाचे ज्ञान कारण होते. अशा रीतीने मनुष्याच्या धर्मकल्पनांत थोडा थोडा फरक होता होता, बहुतेक अचेतन व सचेतन पदार्थांतील देवतत्त्व नाहीसे होऊन, त्या सर्वांचे आदिकारण एक परमेश्वर आहे, असा बुद्धीचा ग्रह होतो. नंतर या परमेश्वराच्या गुणाविषयी व स्वरूपाविषयी नाना त-हेच्या कल्पना निघू लागतात.’


राष्टÑभावनेविषयीचे आगरकरांचे विचार समजून घेण्यासारखे आहेत. समाजातल्या न्यूनगंडाचा आगरकरांनी ‘गुलामांचे राष्टÑ’ या लेखात खरपूस समाचार घेतला आहे. कोणताही नवीन प्रघात रूढ होण्यापूर्वी त्याला तीन पहा-यांतून जावे लागते. पहिला पहारा मनाचा, दुसरा वाणीचा आणि तिसरा आचरणाचा, हा विचार आगरकरांनी मांडला. ते म्हणतात, ‘ज्या गोष्टींपासून त्रास किंवा अडचण होते त्या दूर करणे आणि ज्यांपासून सोय व सौख्य होते त्या जवळ आणणे याचेच नाव सुधारणा.’


आज शिक्षण हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा घटनात्मक मूलभूत हक्क आहे. ‘शिक्षणाबद्धल सक्ती करावी काय’ हा प्रश्न मांडून त्याची योग्य उकल आगरकरांनी सुचवली : शिक्षणाविषयी सक्ती करणे म्हणजे अमुक प्रकारच्या शाळांत, अमुक फी देऊन, अमुक वर्षे मुले पाठविणे असाच केवळ अर्थ नाही तर अमुक एक शिक्षण अमुक एक वयाच्या आत प्रत्येक मुलीस व मुलास मिळण्याची खबरदारी त्यांच्या आई-बापांनी किंवा पालकांनी घेतलीच पाहिजे, न घेतल्यास ते अमुक दंडास पात्र होतील असा अर्थ आहे. प्रजेचे हित चिंतणा-या प्रत्येक सरकारने असा नियम करून तो अमलात आणावा व त्याकरिता लागेल तेवढा खर्च आनंदाने करावा, असे आमचे मत आहे.’


शतकापूर्वी स्त्री शिक्षणाची भारतातली अवस्था अत्यंत दयनीय होती. स्त्री सक्षमीकरणासाठी आगरकरांनी स्त्रियांना चरितार्थसंपादक शिक्षणाची गरज असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर ‘सुधारक’ वर्तमानपत्राच्या अंकात त्यांनी ‘सुशिक्षित स्त्रियांना स्त्रीशक्षणादी विषयांवर प्रकट करिता यावे व आमच्या वाचकांसही ते वाचण्यास मिळावेत, म्हणून स्त्रीलिखित लेखांकरिता स्वतंत्र स्थल राखून ठेवण्याची आम्ही योजना केली आहे.’ असे नमूद केले आहे.
महाराष्‍ट्राचं हे दुर्दैव की आगरकरांचा सहवास फार कमी काळ लाभला. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. सामाजिक सुधारणा प्रथम की राजकीय, या आगरकर-टिळक वादावर महाराष्‍ट्रात बराच खल झाला आणि होत राहील. मात्र सध्याच्या सामाजिक प्रश्नांचे स्वरूप आणि नुकत्याच घडलेल्या घटनांकडे बघता, स्वातंत्र्योत्तर काळात विकसित व स्थिर होत गेलेल्या राज्यसंस्थेच्या चौकटीच्या तुलनेत, सामाजिक सुधारणांचा गाडा मागे पडला असं दिसतं. त्यास गती येण्यासाठी गोपाळरावांच्या विचारांचा पुन्हा नव्याने शोध घ्यावा लागेल.