आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीचा उगम, विकास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी भाषेच्या पाऊलखुणा इतिहासकाळात शोधत गेल्यास त्यातून मराठीचा उगम केव्हा झाला असेल, याचा अंदाज बांधता येतो. दक्षिण कर्नाटकात श्रवणबेळगोळ येथे एका टेकडीवरील अखंड खडकातून कोरलेला बाहुबली या जैन तीर्थंकराचा सर्वोच्च जागतिक उंचीचा भव्य पुतळा आहे. त्याच्या पायांपाशी ‘चावुंडराये करवियले गंगराजे सुत्ताले करवियले.’अशा फक्त मराठीतल्या कोरीव ओळी आहेत. (दुस-या कोणत्याही भाषेतला शिलालेख तेथे नाही.) हा पुतळा इसवीसनाच्या दहाव्या शतकातील मानला जातो. त्याचा अर्थ त्या काळात तेथे मराठी राजकारण व मराठी भाषा दीर्घकाळ अस्तित्वात होती, असा लावता येईल.’


मराठीतले आद्यकवी मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे अनुक्रमे बाराव्या/तेराव्या शतकातले. त्यांनी विशेषत: ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ग्रंथांत आध्यात्मिक तत्त्वज्ञान, योगशास्त्रीय विचार, भक्तिमार्गीय श्रद्धा आणि काव्यात्म रसाळ वाणी (भाषिक सौंदर्य) यांचा एवढा अद्वितीय मिलाफ साधला आहे की आजतागायतचे सर्व मराठी लेखक त्यांना गुरुस्थानी मानतात. समाजात त्या काळात जलद प्रवासाची साधने, प्रसारमाध्यमे इ. काहीही उपलब्ध नसताना मराठी भाषेतून आविष्काराची एवढी उंची (बहिष्कृत) ज्ञानदेवांना गाठता आली, त्याचे विविध बहुजन समाजातील संतांनी अनुकरणही केले. यावरून तत्पूर्वी 5-6 शतके मराठी भाषा विकसित होत आली असावी, असा अंदाज भाषेचे सांस्कृतिक अभ्यासक आज वर्तवतात. तत्त्वज्ञानविषयक अमूर्त चिंतन हे भाषाविकासाचे कळसरूप आहे. यावरून मराठीचा उगम इसवीसनाच्या सहाव्या-सातव्या शतकात झाला असावा. (मराठी भाषा वयोमानाने दीड हजार वर्षांची झाली असावी.)


मराठीला आरंभापासून संघर्ष करावा लागला- आरंभी संस्कृत या देववाणीशी, नंतर अरबी व पर्शियन भाषांशी, नंतर इंग्रजी साम्राज्य भाषेशी. बंडखोरी, चिवटपणा आणि निर्धार यांच्या बळावरच मराठी टिकाव धरून राहिली आणि बहुजनांची भाषा बनली, हे लक्षात ठेवले पाहिजे. सततच्या संघर्षातूनच तिचा विकास झाला आहे. ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, रामदासांपर्यंत ती भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक समानता यांची भाषा बनली. शिवाजीराजांनी तिला राजभाषेचे स्थान मुस्लिम राजवटींच्या वेढ्यात मिळवून दिले. नंतरच्या शतकात ती बखरकार व शाहीर यांच्याद्वारे वीरश्रीची वाणी झाली. पुढे इंग्रजी राजवटीत तिचा आधुनिक शास्त्रांद्वारे ज्ञानभाषा म्हणून विस्तार होत गेला. त्याच काळात विविध अनुभव, शास्त्रे आणि साहित्य इ. कला याविषयक प्रगत विचार व संशोधन यांनी संपन्न झालेली इंग्रजी भाषा यांचा भारतीय भाषांवरचा प्रभाव वाढत गेला. किंबहुना इंग्लिश हीच आपल्या देशाची सर्व व्यवहारांची भाषा बनून गेली. राज्यकर्त्या ब्रिटिशांना ‘चले जाव’ केल्यानंतरही आजवर 70-80 वर्षे आपण त्यांच्या भाषेच्या मोहपाशातून मुक्त होऊ शकलो नाही- हे आपण वृत्तीने गुलाम, ज्ञानाने खुरटे आणि विचारानेही अपरिपक्व राहिल्याचे निदर्शक आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दादाभाई नौरोजी, लो. टिळक, म. गांधी इ. नेत्यांनी राष्ट्रीय जागृतीसाठी ‘राष्ट्रीय’ शिक्षण भारतीय भाषेतून दिले पाहिजे, याची स्पष्ट जाणीव आपल्याला करून दिली होती. देशभर ‘राष्ट्रीय शाळा’ कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी सुरू केल्या होत्या व त्यातून भारताचे स्वतंत्र ‘राष्ट्रीय मन’ घडत आले होते. आज आपण इंग्रजीला पुन्हा सर्वोच्च स्थान देऊन राष्ट्रभावनेला सुरुंग लावत आहोत. हे एक प्रकारचे राष्ट्रविध्वंसक कृत्यच आहे. भारतीय मने इंग्रजीतून कधीही जोडली जाणार नाहीत, हे एक राष्ट्रीय सत्य आहे. त्याला भावनिक आणि शास्त्रीय अशा दोन्ही बाजू आहेत. भारतात अनेक विकसित व संपन्न अशा प्रादेशिक भाषा आहेत. त्या सर्वांमध्ये सामाजिक-धार्मिक विचार, सण-उत्सव, रूढी, संस्कार, लोककला, लोकवाङ््मय इ.चे विपुल सामाजिक संचित आहे आणि त्याबद्दल प्रत्येक भाषकाला मनोमन आत्मीयता वाटत असते. कारण ती मातृभाषा त्या सामाजिक संचितासह प्रत्येक व्यक्तीच्या अंतरंगाशी एकरूप झालेली असते. बांगलादेश हे बहुसंख्येने मुस्लिम राष्ट्र. पण पाकिस्तानपासून अलग होऊन त्याने रवींद्रनाथ, सुभाष चंद्रादिकांच्या बंगाली भाषेचे प्रेम कायम ठेवले आहे, हे आपण आजही पाहतो आहोत. बेळगाव-निपाणी सीमाप्रश्न महाराष्ट्राच्या पायाशी अजून धुमसतो आहे. यात भावनात्मक घटक प्रबळ आहे. ईशान्येकडील सीमावर्ती राज्यांतही भाषेशी निगडित भावनिक समस्या आहेतच. इंग्रजीबद्दल अशी भावनिक आत्मीयता - असलीच तर- अगदी मूठभर लोकांच्या मनी असू शकेल. काहींची मातृभाषाही ती असू शकेल. पण त्यासाठी सर्वांना इंग्रजी सक्तीने शिकवणे वा इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणे समर्थनीय होऊ शकत नाही.