आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हुतात्मा आणि आधुनिक कर्मकांड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला. तो पुण्यात व्हावा, हा योगायोग नव्हे. पुणे हे जेव्हा पुनवडी नावाचे छोटेसे खेडे होते तेव्हा मध्ययुगात मातलेल्या म्लेच्छांनी, या गावावर गाढवाचा नांगर फिरवला होता. स्वराज्य स्थापन करण्यासाठी जिजाऊ जेव्हा बाल-शिवाजीला घेऊन येथे आल्या, तेव्हा त्यांनी या पुनवडीची जमीन सोन्याचा फाळ लावलेल्या नांगराने नांगरली.


त्यांना अन्याय, अत्याचार खणून काढायचे होते. छत्रपतींना त्यात काही यशही आले, हा इतिहास आहे, पण अन्याय-अत्याचार हे उपभोगणा-यांची वासना आणि सोसणा-यांची अंधश्रद्धा यांच्या खत-पाण्यावर पुन्हा पुन्हा फोफावत असतात. नागवलेल्या रयतेला वाचवायला धर्मकारण पुढे आले नाही. फुले आले. आगरकर आले. लोकहितवादी आले, पण पुणं मात्र उणंच राहीलं. शिक्षणप्रसार वाढला. औद्योगिकीकरण वाढलं. तरीही प्रदूषण वाढलं अंधश्रद्धेचं. पूर्वी एकट्या ब्राह्मण जातीत ब्राह्मण्य होतं. आता ते सर्वच्या सर्व जातीत पसरलं, रुजलं आणि वाढलं. उच्च शिक्षणानं देखील माणसं फक्त साक्षरच झाली. ती सुशिक्षित किंवा सुसंस्कृत नाही होऊ शकली. अंधश्रद्धा अमर होती. आधुनिक महाराष्‍ट्रात, शाहू-फुले-आंबेडकर हा केवळ मंत्र ठरला निवडणुका जिंकण्याचा. घाशीराम कोतवालांची फक्त पैदास वाढली, इतकेच. भट कोठडीत कोंडून मारले हा काय संतोष बाळगण्याचा विषय आहे का? पिचत पडलेल्या रयतेसाठी स्वच्छ कारभार कुणी करायचा?


दाभोलकर निष्णात डॉक्टर होते. त्यांनी अट्टहास, धसमुसळेपणा केला नाही. पेशंटची नाजूक प्रकृती आणि असहकार लक्षात घेऊन, त्यांनी दरवेळी औषधाचा डोस कमी करीत आणला. उगीच अपस्मार, फेफरं यायला नको. तरीही असहकारच. नरबळी, कुमारी बालिकेच्या गुप्तांगाच्या रक्तानं केलेली अघोरी तांत्रिक पूजा, पोतराजानं अंगावर जखमा काढण्याला कायद्याने गुन्हा ठरवणे हे देखील या महाराष्‍ट्रात पाप होतं. हा महाराष्‍ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा नव्हताच मुळी. शाहू-फुले- आंबेडकर हा मंत्र या आधुनिक घाशीरामांनी पोटपूजेसाठी बनवलेलं केवळ आधुनिक कर्मकांड होतं. त्यांच्या नावाने इथं फक्त दुकानदारी चालते.


अलीकडे वीस वर्षांत मलबार हिलवरची वर्षा नावाची वास्तू हादरायला लागल्यानंतर, तांत्रिक उपायांनीच शांत व्हायला लागली होती. केस सोडलेल्या, मळवट भरलेल्या, अंगात येऊन पिंगा घालून घुमणा-या बाया वर्षाची वास्तू शांत करू लागल्या होत्या. काळं धोतर परिधान केलेले, मळवट-काजळ ल्यायलेले, फुल मेकअपमधले, उघडेबंब तांत्रिक, आपल्या लाडक्या नेत्यासाठी पक्षकार्यकर्ते दिवसाढवळ्या मेटल-डिटेक्टरमधून वर्षावर आत आणत होते. धर्मांधता, बुरसटलेपणाचा आरोप खास उजव्या राजकीय पक्षांसाठी या मंडळींनी राखून ठेवला होता. ही फक्त वरवरची व्यवस्था होती. आतून सगळाच राजकीय वर्ग एकच होता. सर्वांच्या अंधश्रद्धा एकच होत्या. निवडणूक जाहीरनामा फक्त वेगवेगळे होते. कारण आम्ही वेगवेगळे आहोत, हे ठसवण्यासाठी, भंपक मीडिया हाताशी होताच ना.
एका काँग्रेसी प्रांताध्यक्षांनी तर आपल्या घरी 288 चौरंग मांडून, पूजेसाठी तांत्रिक बसवून, सर्वच्या सर्व 288 विधानसभा जागा पक्षानं जिंकण्याचा आटापिटा केला होता. त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल केल्याचे ऐकिवात नाही. नवीन मुख्यमंत्री कोण होणार, हे टीव्हीवरच्या बातम्या बघून, या महाभागाच्या आधी यातल्या काही तांत्रिकांना कळालं, अन् ते तडक, होऊ घातलेल्या मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले. त्यांच्या अंगावर विड्याच्या पानांनी गोमुत्र शिंपडलं. आम्ही तुमचेच, हे जाहीर केलं. मी तिथं हजर होतो. हसून मरायची पाळी. डोईवर टोपलंभर केस वाढवलेल्या एका बाबानं, काही वर्षांपूर्वी एका मुख्यमंत्र्यांना हवेतून दहा तोळे वजनाची सोन्याची साखळी काढून दिली होती. त्याचे फोटो पेपरात त्यावेळी प्रसिद्ध झाले होते. राज्यात त्यावेळी मोठा दुष्काळ होता. दुष्काळाने मोडून पडलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाला या मुख्यमंत्र्यांनी बाबांकडून अशीच सोनसाखळी काढून दिली असती तर राज्याचे जवळपास सर्व प्रश्न निकालात निघाले असते. आजही आपल्याला दरवर्षी हजार टन सोनं आयात करून अर्थव्यवस्था जी मोडकळीला आली आहे, तीपासून वाचवता आलं असतं. आपला महाराष्‍ट्र असल्या घाशीरामांचा आहे. तो शाहू-फुले-आंबेडकरांचा नक्कीच नाही. कसं काय होणार होतं इथं जादूटोणाविरोधी विधेयक पास?


एक मात्र खरे. दाभोलकरांचा खून करून, मारेक-यांनी अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम आणखी थोर करून ठेवले आहे. अपघाती मृत्यू व्यक्तीचा झाला. पण पिशाच बनलेय जादूटोणाविरोधी बिलाचे. अन् ते आता गच्च बसलंय मानगुटीवर सरकारच्या. बिल पास झाल्याशिवाय ते काही आता मानगुटीवरून उतरत नाही.