आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Editorial About Mass wedding Ceremony Organised By Shiv Sena

हिंदुत्व यांचे आणि त्यांचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू हा धर्म आहे की संस्कृती, यावर आतापर्यंत बराच खल झाला आहे आणि यापुढेही तो अव्याहतपणे होत राहणार आहे. जोपर्यंत राजकारणात धर्माचा - मग तो कोणताही धर्म असो - वापर फायदेशीर ठरत राहील तोपर्यंत असल्या चर्चांना खंड पडण्याची शक्यताही नाही. अशा चर्चांत कधी धर्मातील कट्टरतेचे समर्थन करण्यात त्याचा वापर करणाऱ्यांना फायदा दिसत असतो, तर कधी त्यातील सुधारणावादी, सर्वसमावेशक विचारधारेचे समर्थन करणे त्यांच्यासाठी लाभदायक ठरत असते. केव्हा आणि कुठे कट्टरतेचे समर्थन करायचे आणि कुठे लवचिकतेचा झेंडा फडकवायचा याचे तारतम्य ज्याला आहे तोच त्या संकल्पनेचा पुरेपूर आणि प्रभावी वापर करू शकतो. त्याला ना धर्मांच्या नावावर दुकाने थाटून बसलेले तथाकथित धर्ममार्तंड अपवाद आहेत, ना राजकारणी. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेच तारतम्य शनिवारी औरंगाबादमध्ये दाखवले. शिवसेनेच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांनी सर्वधर्मसमावेशकतेच्या एका प्रतिमेकडे बोट दाखवून तेच आमचे हिंदुत्व आहे असा शिक्का त्यावर ठसठशीतपणे मारला. वरवर पाहता ठाकरे यांचे विधान संयमी राजकारण्याला शोभणारे होते; पण ज्या शहरात आणि ज्या वातावरणात त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वाची कृतिशील व्याख्या केली ते लक्षात घेता त्यांचे हे विधान आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्यावर कडी करण्याच्या प्रयत्नाचा भाग होता, हे वेगळे सांगावे लागत नाही.
दुष्काळाचा दाह वाढलेला असताना मुलीचे लग्न करणे शेतकऱ्याच्या आवाक्यात राहिलेले नाही आणि शेतकरी आत्महत्यांमागे काही प्रमाणात तेही एक कारण आहे. त्यामुळे शिवसेनेने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन सुरू केले. त्यातलाच एक भव्य सोहळा शनिवारी औरंगाबादला झाला. त्यात १९४ हिंदू जोडप्यांसह ०८ मुस्लिम आणि ४२ बौद्ध जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे स्वत:बरोबर राज्यपालांनाही घेऊन आले. राज्यपालांनी या सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे कौतुक करणे अभिप्रेतच होते. तोच धागा पकडून उद्धव यांनी हेच शिवसेनेचे हिंदुत्व आहे, असा शेरा मारला. खरे तर कुणाची विचारधारा काय आहे हे एका प्रसंगातून ठरवले जात नाही. प्रसंगाच्या आणि त्यातील वर्तणुकीच्या, प्रतिक्रियांच्या मालिकांतून विचारधारा स्पष्ट होत असते. उद्धव ठाकरे यांनी सर्वधर्मीयांचा, विशेषत: हिंदूंबरोबरच मुस्लिम आणि बौद्ध जोडप्यांचाही विवाह लावण्यासाठी शिवसेनेने घेतलेला पुढाकार हेच त्यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आहे, असे जाहीरपणे सांगितले असले तरी शिवसेनेचे हिंदुत्व काय आहे, हे कुणाला वेगळे सांगावे लागत नाही. अर्थात, त्याची जाणीव उद्धव यांनाही आहे. तरीही ते बोलले, कारण त्यांना शिवसेनेच्या हिंदुत्वापेक्षा भाजपच्या हिंदुत्वाकडे सर्वांचे लक्ष वेधायचे होते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वसमावेशकतेची भाषा करीत असले तरी ती केवळ भाषाच राहिली आहे आणि शिवसेनेने मात्र कृती करून ते सिद्ध करून दिले आहे, हा त्यांच्या त्या विधानाचा अर्थ आहे. भाजपला उघडे पाडण्याची आणि त्या पक्षावर कुरघोडी करण्याची एकही संधी उद्धव सोडत नाहीत. म्हणूनच सत्तेत सहभागी असूनही दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यात भाजपचे मुख्यमंत्री आणि सरकार अपयशी ठरत असल्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका ते सातत्याने करीत आले आहेत. सामूहिक विवाह सोहळे आयोजित करूनही त्यांनी भाजपवर आधीच कुरघोडी केली आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपलाही असे विवाह सोहळे आयोजित करायला लावून त्यांनी एक प्रकारे फरपटत नेले आहे. शिवसेनेच्या या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा पार पडला. त्यात ५५० जोडप्यांचे विवाह लावण्यात आले असले तरी ते सर्वधर्मीयांचे नसल्याची खंत भाजपच्या नेत्यांच्या मनात उद्धव यांच्या विधानामुळे राहणार आहे. त्याच कारणामुळे उद्धव यांच्या ‘आमचे हिंदुत्व’वर ना मुख्यमंत्री कडी करू शकले ना भाजपचे प्रदेशाध्यक्ष. आता शिवसेनेपेक्षा जास्त जोडप्यांचे विवाह लावण्याची ईर्षा भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा लाभदायकच ठरणार आहे. अशी स्पर्धा निर्माण करण्याचे श्रेयही लोक शिवसेनेला देऊ लागले तर आश्चर्य वाटायला नको. तसे झाले तर उद्धव यांच्या संयमी राजकीय नेतृत्वालाच त्याचेही श्रेय द्यावे लागेल. लाखालाखाच्या जाहीर सभा घेऊन आणि विकासाच्या स्वप्नांच्या ब्ल्यूप्रिंट काढून राज ठाकरे यांना जे जमले नाही ते उद्धव असेच संयतपणे करीत राहिले तर उद्याच्या महाराष्ट्रातले राजकीय चित्र पूर्णपणे वेगळे असू शकते. तसे झाले तर दुष्काळ ही शिवसेनेसाठी इष्टापत्तीच म्हणावी लागेल.