आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाभोलकरांच्या बलिदानाचा अर्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येने देश ढवळून निघावयास हवा होता. मात्र, तसे काही घडले नाही. असा आगडोंब उसळण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. आमची माध्यमे आजकाल कोळसा घोटाळ्यामधील गहाळ फायली, सरकार आणि रुपयाची घसरण, सीमेवर पाकिस्तानच्या कारवाया आदी घटनांतच गुंतलेली आहेत. संसदेतही याच गोष्टींवर चर्चा होते आणि त्यावरूनच वारंवार कामकाज बंद पडते. त्यांना दाभोलकरांच्या हत्येवर प्रतिक्रिया देण्यास सवडही नाही. एखादा लोकप्रतिनिधी अथवा नेत्याचे निधन झाले तर संसदेचे सत्र स्थगित करण्याची बाब आपण समजू शकतो, परंतु दाभोलकरांसारख्या क्रांतिकारक आणि समाजसुधारकांच्या निर्घृण हत्येप्रसंगी आमची संसद मौन बाळगते हे कशाचे द्योतक आहे? आपला भारतीय समाज हिरा आणि दगडातला फरक ओळखू शकत नाही, असे तर दर्शवत नाही ना?
दाभोलकरांसारखे असे किती लोक भारतात आहेत? ते 19 व्या शतकातील महान समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती आणि राजा राममोहन राय यांच्या महान परंपरेचे वारसदार होते. या परंपरेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, डॉ. राम मनोहर लोहिया आदींचा समावेश होतो. दाभोलकरांचा डॉक्टरी पेशा होता, परंतु त्यांनी साधारणत: तीस वर्षांपूर्वीच आपली डॉक्टरकी सोडली होती. घरच्या जबाबदरीचा सगळा भार त्यांनी डॉक्टर पत्नीवर टाकू न आपला संपूर्ण वेळ समाजसुधारणेला दिला होता. त्यांनी स्त्रियांना मंदिरात प्रवेश देण्याचे आंदोलन चालवले. महाराष्‍ट्रातील विविध गावांतून, शहरांतून आलेल्या हजारो महिलांना अहमदनगर जिल्ह्यातील मंदिराचे दरवाजे खुले केले. यासाठी डॉ. दाभोलकर अनेक वेळा कोर्टातही गेले. त्यांनी स्त्रियांना मंदिरात प्रवेश करण्याचा कायदेशीर अधिकारही मिळवून दिला. ज्या संघटनांनी त्यांना सुरुवातीला विरोध केला होता त्याच संघटनांनी नंतर आपल्या भागात त्यांचे आंदोलन चालवले.


अंधश्रद्धेच्या विरोधात चालवलेल्या आंदोलनामुळेच डॉ. दाभोलकरांची हत्या झाली! त्यांच्या महाराष्‍ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने देशात चालू असलेले भूतप्रेतांवर तोडगे, जादूटोणा तंत्र-मंत्र, जाणकार-भोंदूबाबा, हवेतून वस्तू काढून चमत्कार करणा-यांना जोरदार विरोध करण्यात आला. ‘साधना’ नियतकालिकातून त्यांनी या लोकांचे भांडे फोडले होते. सामान्य जनतेला यापासून ते सावध करत होते.


मानवी जीवनात नेहमीच विज्ञान आणि गणिताच्या आधारावर अवलंबून चालणे कठीण असते. विज्ञान-गणित आणि अंदाज याशिवाय वेगळे जग आहे. त्याचे क्षेत्र विस्तृत आहे. परंतु दाभोलकरांसारख्या लोकांचे म्हणणे असे की, तुम्हाला दिसत असूनही तुम्ही माशी गिळत आहात. श्रद्धेचा अर्थ आहे सत+धा म्हणजे सत्याद्वारे धारण करणे. परंतु आपल्या दैनंदिन कारभारात आणि सामाजिक जाणिवेला धर्म आणि श्रद्धेच्या नावावर आपल्यावर कधी नियंत्रण मिळवले जाते आपल्यालाच कळत नाही. मूर्ती दूध पिऊ शकते का? एखाद्या बाबाला कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ बोटाने शस्त्रक्रिया शक्य आहे का? एखाद्या तांत्रिकाने एखाद्या स्त्रीच्या तोंडात केवळ द्रव्य टाकले तर तिला मूल होईल का किंवा एखाद्या बाबाचे उष्टे जेवण जेवल्याने कोणाला परीक्षेत यश मिळेल का?


अशा प्रकारचे थोतांड केवळ भारतातच नव्हे, तर जगातील इतर देशांतही चालू आहे. ज्या देशात साम्यवाद आहे तेथील लोकही अंधश्रद्धेत बुडालेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. असे का घडते? सर्व धर्मांत अंधश्रद्धेलाच जास्त महत्त्व दिले गेल्याने असे घडते आहे. ज्याद्वारे ईश्वराच्या चमत्कारांचे थोतांड पसरवले जात आहे अशा कितीतरी धर्मग्रंथांची नावे सांगता येतील. या धर्मग्रंथांत अनेक विज्ञानविरोधी आणि तर्कहीन गोष्टींचा समावेश असतो. परंतु याला विरोध क ोण करणार? प्रवाहाच्या विरुद्ध कोण पोहणार? युरोपमध्ये गॅलिलिओसारखे वैज्ञानिक आणि नित्शे, इमॅन्युएल कांट आणि टॉलस्टॉयसारख्या विचारवंतांना कठोर टीकेला सामोरे जावे लागले. आपल्या देशात पसरत चाललेले थोतांडाचे ध्वज गाडण्यासाठी महर्षी दयानंदाना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले.


दाभोलकरांची हत्या हा सर्वसाधारण गुन्हा नव्हे. केवळ एक किंवा दोन माथेफिरू तरुणांनी केलेले हे कृत्य आहे, असेही नव्हे! आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या आजारांचा हा स्फोट आहे. आमचा समाज अशा आजाराने ग्रस्त असता तर आतापर्यंत संपूर्ण देशात या हत्याकांडाच्या विरोधात लाट उसळलेली दिसून आली असती. परंतु ही निर्घृण हत्या आपण सहज पचवली असे वाटते. रामलीला मैदान आणि जंतर-मंतरवर झालेल्या नाटकांची या घटनेशी तुलना तर करून पाहा. त्या औटघटकेच्या महानायकांची आणि कर्मवीर दाभोलकरांची तुलना करा! गेल्या 18 वर्षांपासून दाभोलकर अंधश्रद्धाविरोधी कायदा बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. महाराष्‍ट्रसरकारला आता जाग आली. त्यांनी वटहुकूम काढला. परंतु केवळ कायदा करून अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास संपवता येणार आहे का? कायद्याने जो व्हायचा तो परिणाम होईलच, त्याऐवजी लहानपणापासूनच मुलांमध्ये बुद्धिप्रामाण्यवाद आणि तर्कशास्त्राचे संस्कार करण्याची गरज आहे. लोकांना आपल्या प्रत्येक समस्येचे निराकरण अत्यंत स्वस्त आणि सहजपणे प्राप्त झाले पाहिजे. यामुळेच समाजात ढोंगीपणा आणि थोतांड जिवंत राहिले आहे. आपल्याकडे लोक स्वत:ची फसवणूक करून घेतात म्हणूनच तर अशा स्वस्त आणि सोपा मार्ग सांगणा-या तांत्रिक-मांत्रिकांची दुकाने चालतात.


दाभोलकरांच्या बलिदानाने आपल्या लोकशाहीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. राजकारणच देशाचा उद्धार करू शकते, अशी आपली समजूत आहे. परंतु आपली राजकीय व्यवस्थाच इतकी भ्रष्ट झाली आहे की, संपूर्ण समाज अंधविश्वासाचा शिकार बनला आहे. एकच नेता, एक परिवार, एका पक्षावर असलेल्या अंधविश्वासामुळे आपल्या राजकीय व्यवस्थेला अपंग बनवले आहे. त्यातील द्वंद्व नाहीसे झाले आहे. राजकीय व्यवस्था बदलण्यासाठी आपण सर्वप्रथम समाज बदलला पाहिजे. दाभोलकरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन समाज बदलण्याचे रणशिंग तर फुंकले आहे.