आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांचे मन्वंतर (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन यासारख्या सोशल मीडिया कंपन्या काही माहितीचा अपवाद वगळता आदानप्रदान जेवढे वेगाने करतात, तेवढा वेग सध्याच्या टीव्ही माध्यमाला नाही. वर्तमानपत्रे तर या शर्यतीत नाहीतच. कारण त्यांना 24 तासांनंतर बातम्या द्याव्या लागत असतात. पण तरीही वाचकांची-समाजाची माहितीची किंवा बातम्यांची भूक दिवसेंदिवस वाढत आहे किंवा ती वाढावी यासाठी ही माध्यमे प्राणपणाने लढत आहेत. एका युरोपीय संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात आजच्या घडीला जगभरात फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे सुमारे 90 कोटी ग्राहक आहेत, तर ट्विटर या सोशल मीडियाचे सुमारे 10 कोटी ग्राहक आहेत. सोशल मीडिया लोकांपर्यंत पोहोचण्याचा वेग बघता येत्या काही वर्षांत जगातील प्रत्येकी 10 माणसांपैकी 1 व्यक्ती फेसबुक, ट्विटर किंवा लिंक्डइन या किंवा अन्य सोशल मीडियाचा वापर करत असेल आणि या सोशल मीडिया कंपन्यांची बरकत अब्जावधी डॉलरच्या घरात गेलेली असेल. गेल्या वर्षी फेसबुकने शेअर बाजारात आपल्या कंपनीचे समभाग विक्रीस आणणार असल्याची घोषणा केल्यानंतर इंटरनेट कंपन्यांमध्ये मोठा गहजब उडाला होता. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गवर तर तो लोभी भांडवलदार असल्याचा आरोप झाला होता. फेसबुक आपल्या कंपनीचे जे ग्राहक आहेत, त्यांच्या खासगी किंवा सामाजिक मत-मतांतरांचे बाजारपेठीय मूल्य तयार करत असून त्यावर कोट्यवधी डॉलरचा नफा कमवेल, असा आरोप त्या वेळी झुकरबर्गवर झाला होता. या आरोपाच्या निमित्ताने सोशल मीडिया कंपन्यांनी धंदा करावा का? त्यांनी नैतिकता पाळावी का? या कंपन्यांच्या बेबंदपणाला (?) आवर घालण्यासाठी नव्या कायद्यांची गरज आहे का? असे अनेक प्रश्न साहजिकच निर्माण झाले. या वादामध्ये व्यक्तीच्या खासगी जीवनात फेसबुकने किती घुसखोरी केली आहे इथपासून फेसबुकचे व्यसन व्यक्तीच्या मानसिक अधोगतीसाठी किती साहाय्यभूत आहे, इथपर्यंत मुद्दे चर्चेस आले. (15 जुलै रविवार ‘रसिक’ पुरवणीत आम्ही ‘फेसबुक हे माध्यम बदलत्या मानवी नातेसंबंधांचे एक अपरिहार्य अंग आहे का?’ यावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.) पण तंत्रज्ञानाच्या जगतातील हे मन्वंतर अपरिहार्य आहे व 21 व्या शतकाच्या काळात सोशल मीडिया आपल्या बदलत्या जीवनशैलीतील एक भाग असणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, हे समजून घ्यावे लागेल. काही दिवसांपूर्वी ट्विटर हे तंत्रज्ञान आता सोशल मीडिया कंपनीत रूपांतरित होणार असल्याची वावडी उठली होती. या वावडीने इंटरनेट व्यवसायात धंद्याची समीकरणे आमूलाग्रपणे बदलत जातील, यावर चर्चा झाली. जर टेक्स्ट मेसेजेसचे वहन करणा-या कंपन्या ग्राहकांची माहिती विकू लागल्या तर त्याचे मोल ग्राहक सोडून या कंपन्या कसे ठरवणार, हा कळीचा मुद्दा पुढे आला. त्याचबरोबर सध्या बाजारात आलेल्या विविध कंपन्यांच्या मोबाइल सेटमधील अ‍ॅप्लिकेशन्स (अ‍ॅप्स) कोणकोणत्या कंपनीची असणार, याबाबतही व्यावसायिक चढाओढ सुरू झाली आहे. ग्राहकांना कोणत्या स्वरूपाची माहिती हवी आहे, त्यांना आपण नवे काय देऊ शकतो किंवा त्यांना माहितीच्या आदानप्रदानाची सवय आपल्या अ‍ॅप्सद्वारे कशी लावू शकतो, हा इंटरनेट कंपन्यांचा नवा बिझनेस सुरू झाला आहे. पण ग्राहकही आता आपल्या गरजेनुसार स्वत:च्या आवडीचे अ‍ॅप्स तयार करू शकत असल्याने कंपन्या आणि ग्राहक अशीही स्पर्धा सुरू झाली आहे. या व्यवसायातील स्पर्धेचा एक भाग म्हणून लिंक्डइन या कंपनीने आपल्या सेवेतून ट्विटरला बाद करण्याचा निर्णय घेतला होता. लिंक्डइनच्या या निर्णयामुळे या साइटद्वारे ट्विटरचा वापर करणा-या लक्षावधी ग्राहकांची गैरसोय झाली. 2006 मध्ये ‘अ‍ॅपल’ या कॉम्प्युटर निर्मिती कंपनीचा प्रमुख स्टीव्ह जॉब्ज याने आयफोन बाजारात आणला तेव्हा त्याचाही आपल्या आयफोनवर फेसबुक, ट्विटरची सेवा देण्याला कडवा विरोध होता. आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून या कंपन्या स्वत:चे उखळ पांढरे करून घेतात आणि त्यांचा ग्राहकवर्ग आपोआप वाढत जातो, असे त्याचे मत होते. पण अ‍ॅपलची मॅनेजमेंट त्याच्याशी सहमत नव्हती. मॅनेजमेंटच्या मते, आयफोनच्या माध्यमातून सोशल मीडियाचे नवे जग मिळत असल्याने ग्राहक इतर मोबाइल कंपन्यांच्या तुलनेत आयफोनला पसंती देत आहे. त्यामुळे काही दिवसांतच पुढे आयफोनला आपल्या जाहिरातीत ट्विटर, फेसबुकची जाहिरात करावी लागली व त्यांची विक्रमी विक्री झाली. मोबाइलच्या बाजारपेठेतील ही घडामोड पाहता सोशल मीडिया आपली जीवनशैली कशी बदलवून टाकत आहे आणि त्यांची अपरिहार्यता दिवसेंदिवस कशी वाढत आहे, हे समजून येईल. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तंत्रज्ञानाच्या आविष्कारातून, मानवी कल्पनेतून जी माध्यमे जन्माला आली होती, त्या माध्यमांमध्येच आता ग्राहकवर्ग कमावण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. रोज नवा ग्राहक कमावणे किंवा असलेला ग्राहक बांधून ठेवणे, हा या स्पर्धेचा एक भाग असला तरी बातम्यांच्या जगात टीव्हीला सोशल मीडियाचा खरा धोका आहे. कारण टीव्ही माध्यमाची व्यावसायिक समीकरणे बघता, टीआरपीचे गणित बघता आणि प्रेक्षक वर्गाची पसंती बघता टीव्हीसमोर आव्हानांचे अनेक डोंगर उभे आहेत. आपल्याकडील न्यूज चॅनल्सचे स्वरूप पाहता येथे बातमी दृश्यांसह देण्यासाठी बराच खर्च करावा लागतो. हा खर्च परवडत नसल्याने आपले न्यूज चॅनल्स खर्चाचे गणित मांडून देशभरातील इव्हेंट साजरे करत असतात. गेली दोन वर्षे रामलीला मैदानावरचा भ्रष्टाचार चळवळीचा लाइव्ह शो झोकात सादर करण्याचे एकमेव कारण म्हणजे हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी चॅनल्सना कमी पैसा लागला होता. त्याउलट दूरवर असलेल्या मणिपूरच्या राज्यातील शर्मिला इरोम हिच्या आमरण उपोषणाकडे या न्यूज चॅनल्सनी पैशाअभावी पाठ फिरवली होती. तशीच गोष्ट आंतरराष्ट्रीय बातम्यांची आहे. आपल्याकडील अनेक न्यूज चॅनल्समधून आंतरराष्ट्रीय बातम्यांची वृत्तांकने गायब झाली आहेत. हे जे माहिती तंत्रज्ञान व्यवसायाचे गणित आहे ते बघता सोशल मीडिया भविष्यात टीव्हीचे स्थान घेईल, यात शंका नाही. सध्या तळागाळातल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम काही अंशी वृत्तपत्रे करत असतात, पण उद्या सोशल मीडियाच्या आव्हानामुळे वर्तमानपत्रांना बातम्यांमागचे निरूपण द्यावे लागेल. हे निरूपण समाज बदलाचा एक भाग असेल व ते मानवी मूल्ये, सामाजिक व्यवस्थेवरही परिणाम करणारे असेल. हा बदल सोशल मीडियाकडून कसा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
‘मजबूत इतना... दारासिंग जितना’ (अग्रलेख)
आम्ही बि-घडलो... (अग्रलेख)
रोगापेक्षा इलाज भयंकर... (अग्रलेख)
जो जीता वही...! ( अग्रलेख)
संकटांवरच्या चर्चेचा फार्स (अग्रलेख)
पंतप्रधानांची पंचसूत्रे (अग्रलेख)
मोदींची मिजास, केशुभाईंचे बंड! (अग्रलेख)
देवालाच आव्हान! (अग्रलेख)