आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसारमाध्यमांनी गमावली विश्वासार्हता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी केलेल्या एका विधानावरून भारतीय पत्रकारांनी लगेच आपल्या बाह्या सरसावल्या. भारतातील प्रसारमाध्यमांची स्थिती फारशी चांगली नाही असे नमूद करून काटजू यांनी पुढे म्हटले होते की, भारतीय प्रसारमाध्यमांतील बहुसंख्य पत्रकार सुमार बुद्धीचे आहेत. या पत्रकारांना आर्थिक सिद्धांत, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य यातील सखोल माहिती नसते. जनहिताच्या दृष्टीने भारतीय प्रसारमाध्यमे काम करताना दिसत नाहीत. काटजू यांच्या विधानांबद्दल क्षोभ व्यक्त झाला तो मर्यादित वर्तुळात म्हणजे फक्त पत्रकारिता क्षेत्रामध्येच. जे वृत्तपत्रे वाचतात, दूरचित्रवाहिन्या पाहतात, त्याप्रमाणे जे माध्यम या क्षेत्राचे बारकाईने निरीक्षण करतात त्यांना काटजू यांनी केलेले प्रतिपादन वास्तववादी असल्याचे मान्य होईल. भारतातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध होणा-या बातम्या तसेच वृत्तवाहिन्यांवरून संध्याकाळच्या वेळी प्रसारित करण्यात येणा-या बातम्यांचा दर्जा पाहिला की काटजूंचे मत पटायला लागते.
वृत्तपत्राच्या पानांमध्ये वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांचे छोटे छोटे तुकडे जणू पसरलेले असतात. पानपानभर असलेल्या विविध उत्पादनांच्या जाहिराती व प्रामुख्याने पाश्चिमात्य ललनांच्या प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांच्या जंजाळातून आपल्याला हवी ती बातमी शोधताना सजग वाचकाची पुरती दमछाक होते. खरीखुरी बातमी कोणती हे कळणेही तसे मुश्किल होऊन बसले आहे. कारण एखादी बातमी सरकारी एजन्सी किंवा प्रायव्हेट कंपनीने प्रायोजित केली आहे की ती बातमी अनपेड आहे हे चटकन लक्षात येणे तसे सोपे राहिलेले नाही. दूरचित्रवाहिन्यांमध्ये तर स्थिती याहूनही गंभीर झालेली आहे. अनेक वृत्तवाहिन्या केवळ वृत्तांकनच करतात असे राहिलेले नाही. सहा ते आठ तज्ज्ञांचे पॅनल तयार करून रोजच्या घडामोडींवर चर्चा घडवून आणण्याचा फॉर्म्युला सध्या सर्व वृत्तवाहिन्यांनी अमलात आणला आहे. या तज्ज्ञांमध्ये विविध राजकीय पक्षांचे प्रवक्ते, वृत्तपत्रे, नियतकालिकांचे संपादक यांचा समावेश असतो. त्याचबरोबर या चर्चेमध्ये लॉबी करणारे सेलिब्रिटी, पीआर एजंट, भाष्यकार ( त्यांचा तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये का समावेश असतो यामागचे निश्चित कारण कधीच स्पष्ट होत नाही) हे जणू एकमेकांशी हातघाईवर आल्यासारखे व तारस्वरात बोलत आपले म्हणणे मांडत असतात. त्यामुळे या चर्चेचे सूत्रसंचालन करणा-यापेक्षा या तज्ज्ञांचे आवाजच चढे असतात. त्यामुळे वृत्तवाहिनीचा प्रेक्षक या चर्चेकडे फारसे लक्ष न देता टीव्हीच्या स्क्रीनवर खालच्या बाजूस सरकत्या पट्टीवर ज्या बातम्या दाखवल्या जातात, त्यावरून आपले डोळे फिरवत असतो.
हे सर्व चित्र पाहिले तर असे दिसते की बातमीला आता मनोरंजनाचे साधन बनवण्यात आलेले आहे. बातमीदाराने दिलेले वृत्त प्रेक्षकांना आकर्षित करून घेईल अशा पद्धतीने पेश केले गेले तर त्यात काहीही गुन्हा नाही. मात्र मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांचा मुख्य कल हा राजकीय बातम्या, बॉलीवूड, क्रिकेटच्या बातम्या देण्याकडेच प्रामुख्याने असतो. मात्र या तीन क्षेत्रांतील समस्या म्हणजेच जणू काही सा-या देशाच्या समस्या असे जे भासवले जाते ते अधिक चिंताजनक आहे. प्रेक्षकांना या तीन क्षेत्रांबद्दलच्या बातम्याच अधिक बघायला आवडतात असे चित्र उभे केले जाते. प्रसारित केल्या जाणा-या बातम्यांमध्ये वस्तुस्थितीचा विपर्यास करणे, वृत्तांकनात गंभीर चुका असणे अशा बाबी सर्रास घडतात. अगदी मथळ्याच्या बातम्या, मुख्य फीचर्स यांच्यामध्ये या गंभीर चुका आढळून येतात. बातमी देताना त्या घटनेची सखोल व विश्लेषणात्मक माहिती देण्याचे कष्ट वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या फारच कमी वेळा घेताना दिसतात. जी वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे, ज्याविषयी आधी नोंद घेण्यात आलेली आहे अशा बाबींचाच उल्लेख करून बातम्या देण्याकडे कल दिसतो. एक्सक्लुझिव्ह बातमी देतानाही नवी माहिती खणून काढण्याचे प्रयत्न फारसे होताना दिसत नाहीत. वैविध्य असलेल्या भारतामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडत असतात. त्या बदलांची नोंद घेत अनेक उत्तमोत्तम बातम्या करता येऊ शकतात. मात्र तसे मनापासून कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्याचप्रमाणे मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांच्या बातमी देण्याच्या दृष्टिकोनाबद्दलही काही मुद्दे मांडावेसे वाटतात. बातम्या देताना सर्व वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांचा सूर काहीसा असंबद्धच असतो. अगदी राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित विषयाबाबतची वृत्ते देतानाही हे दिसून येते. काश्मीरमधील दहशतवादापासून ते मध्य व पूर्व भारतातील नक्षलवादी चळवळ, पाकिस्तानबरोबर भारताचे असलेले संबंध ते पूर्वांचल राज्यांमध्ये असलेली अस्वस्थता यांच्याबाबतचे वृत्त देताना हे दिसून आले आहे. एखाद्या बाबीसंदर्भातील सरकारचा दृष्टिकोन वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रे चुपचाप मान्य करीत असल्याचे या बातम्या पाहून दिसते. एखाद्या घटनेमागची जी कारणे सांगितली जातात त्यात कितपत तथ्य आहे याची खातरजमा खूपच कमी प्रमाणात केली जाते. सरकार जे सांगत आहे त्यावर खरेच विश्वास ठेवावा की नाही हे स्पष्ट करणा-या, अधिक खोलात जाऊन सत्यशोधन करणा-या बातम्या करण्याचे मनापासून फारसे प्रयत्न केले जात नाहीत. बातम्या देताना अगदी टोकाची भूमिका गाठली जाते. अण्णा हजारे हे कधी देशात होऊ घातलेल्या क्रांतीचे नेतृत्व करीत आहेत असे चित्र रंगवले जाते, तर दुस-या वेळी दिलेल्या बातम्यांतून नाठाळांचे नेतृत्व अण्णा हजारे करीत असल्याचे सांगण्यात येते. तर कधी टाटा मोटर्सने सर्वसामान्यांसाठी स्वस्त किमतीची कार बनवून प्रत्येकाला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी केली
आहे किंवा देशातील आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने
सिंगूर हा संघर्षाचा टप्पा आहे अशा परस्परविरोधी पद्धतीने बातम्या देण्यात येतात. ही बातम्यांची यादी अजूनही वाढवता येईल.
भारतीय प्रसारमाध्यमांच्या वस्तुनिष्ठतेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पीआर एजंट नीरा राडियाच्या संभाषणाच्याऑडिओ टेप्स गेल्या वर्षी उजेडात आल्या होत्या. राडिया व पत्रकारांचे किती ‘सौहार्दाचे’ संबंध होते हे त्यातून स्पष्ट झाले. पत्रकारांनी ज्या विषयाच्या बातम्या देणे अपेक्षित होते त्याचे वृत्तांकन त्यांनी कशा पद्धतीने चालवले होते हे राडियाबरोबरच्या संभाषणातून पुरेपूर दिसून आले होते. 2009 मध्ये यूपीएच्या घटक पक्षांमध्ये सरकार बनवण्यासंदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी एका वाहिनीच्या निवेदिकेने मध्यस्थाची भूमिका बजावली होती, असे ऐकण्यात आले होते. वर्तमानपत्रातील आपल्या स्तंभांमध्ये काय मजकूर लिहावा याचा सल्ला स्तंभलेखक आता पीआर एजंट्सकडून घेऊ लागले आहेत. प्रसारमाध्यमे अत्यंत स्वतंत्र बाण्याची असल्याचे म्हटले जाते. मात्र ते तसे नाही. लिलावात सर्वात जास्त बोली लावणा-याच्या प्रभावाखाली काम करण्यास प्रसारमाध्यमे आतुर झालेली आहेत असेच चित्र राडिया यांच्यासंदर्भातीलऑडिओ टेपमधील संभाषणातून दिसले. त्यामुळे एखादी बातमी प्रसिद्ध करीत असताना, अन्य पाच बातम्यांच्या विषयाकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जाते ही बाब सत्य आहे. भारतीय प्रसारमाध्यमांबद्दल अशा अनेक गोष्टी खटकणा-या आहेत. त्या गोष्टींत सुधारणा होऊन पत्रकारिता पुन्हा चांगली बहरायला हवी.