आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैद्यकीय व्यवसायातला ‘धंदा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील एका निदान केंद्राने महाडच्या डॉ. हिंमतराव बाविस्कर यांना त्यांनी सदर केंद्रात ‘एमआरआय’ करण्यासाठी पाठवलेल्या रुग्णाकडून घेतलेल्या फीमधून 1400 रुपयांचा चेक त्यांची रेफरल फी म्हणून पाठवल्याने आणि त्यांनी त्यासंदर्भात महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे तक्रार केल्याने वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’चा मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेस आला आहे. रुग्ण तपासणीसाठी पाठवण्याच्या बदल्यात रुग्ण पाठवणा-या डॉक्टर्सना कट देणे सार्वत्रिक झालेले असतानाही यासंदर्भात तक्रार दाखल करण्याचे प्रमाण जवळजवळ शून्य असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाविस्करांची कृती अभिनंदनीय आहे. त्याचबरोबर कट देण्याच्या या प्रकाराला बहुसंख्य डॉक्टर्सचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसते. अशा अनिष्ट प्रकारांमुळे वैद्यकीय क्षेत्र हे व्यवसाय न राहता धंदा बनले आहे.
‘धंदा’ हा शब्द ब-याच वैद्यकीय व्यावसायिकांना आवडत नाही. अपमानास्पद वाटतो. मेडिकल प्रोफेशन हे नोबल प्रोफेशन असल्याचा त्यांचा दावा असतो. ढ१ङ्माी२२्रङ्मल्ल ढ१ङ्मा्र३ीङ्म१ या मूळ लॅटिन शब्दापासून निर्माण झाला आहे. ढ१ङ्मा्र३ीङ्म१ या शब्दाचा अर्थ बांधिलकीविषयी, वाचनाविषयी, घोषणेविषयी वा कबुलीजबाबाविषयी जाहीर विधान करणे, असा आहे. प्रोफेशन या संज्ञेचा शब्दकोशात दिलेला अर्थ पाहता ही संज्ञा विद्वत्तापूर्ण शिक्षित लोकांच्या पेशासाठी मर्यादित असल्याचे म्हटले आहे. कारण ही संज्ञा केवळ उच्चशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञ यांच्या पेशाला नाही, तर या संज्ञेत दृढ निर्धाराची आणि अविभक्त अशी नैतिक बांधिलकी जाहीरपणे घोषित केली असणे अभिप्रेत आहे. ही नैतिक बांधिलकी जेव्हा या ना त्या बहाण्याने वा कायदेशीर वा बेकायदेशीर मार्गाने बाजूला सारली जाते तेव्हा तो पेशा प्रोफेशन न राहता, व्यवसाय न राहता धंदा बनलेला असतो. प्रोफेशन शब्दात अंतर्भूत असलेला आशय आजच्या वैद्यकीय क्षेत्राला लावला तर या क्षेत्राचा धंदा झाला आहे असेच म्हणावे लागेल.
वैद्यकीय क्षेत्राचा जसा विकास होत गेला तसे यासंदर्भात नियम आणि कायदे बनवण्यास प्रारंभ झाला. सर्वप्रथम रुग्णांची फसवणूक होऊ नये, त्याचबरोबर ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले आहे त्यांच्या क्षेत्रावर वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या परंतु स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेणा-या लोकांचे अतिक्रमण होऊ नये म्हणून कायदा 19 व्या शतकाच्या सुरुवातीसच अमलात आला. या प्रकारे वैद्यकीय व्यावसायिकानेही आपला व्यवसाय रुग्णाचे हित डोळ्यासमोर ठेवून करावा, यासाठी व्यावसायिक नीतितत्त्वे (ए३ँ्रू२) ठरवण्यात आली. ही नीतितत्त्वे वैद्यकीय क्षेत्रात कायद्याहून मोठी मानली गेली आहेत. वैद्यकीय व्यावसायिक जी शपथ घेतात ती शपथ म्हणजे इथिक्सच आहे. व्यावसायिक नीतितत्त्वच आहे.
याच नीतितत्त्वान्वये एखाद्या रुग्णाच्या फीमध्ये तो रुग्ण पाठवणा-या डॉक्टरला हिस्सा देणे अनैतिक ठरवण्यात आलेले आहे. ही अनैतिकता आजच सुरू झालीय, असे समजायचे कारण नाही. 40 वर्षांपूर्वी समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते डॉ. अरुण लिमये यांनी लिहिलेल्या ‘क्लोरोफॉर्म’ या पुस्तकातून वैद्यकीय व्यवसायातील अनिष्ट गोष्टींवर आणि त्यातील गोरखधंद्यांवर प्रकाश टाकला आहे. आता या प्रकारच्या धंद्याची व्याप्ती वाढली आहे. प्रथमत: काही थोडक्या व्यावसायिकांपुरता मर्यादित असलेला हा व्यवहार आता सार्वत्रिक झाला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या व्यवहाराचे पूर्वीचे छुपेपणाचे स्वरूप बदलून आता हे व्यवहार रेफरल फी वा प्रोफेशनल फी या नावाने उघडपणे होऊ लागले आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरने रुग्ण पाठवणा-या डॉक्टरला दिलेला त्याच्या फीमधील हिस्सा हा रुग्ण परत मूळ डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याला तो डॉक्टर जो सल्ला वा वैद्यकीय उपचार देईल त्यासाठी देण्यात येतो आणि तसे देणे योग्य आहे, असे या कट प्रॅक्टिसचे समर्थन आजकाल केले जाते. वरकरणी हे स्पष्टीकरण ऐकायला बरे वाटत असले तरी ही गोष्ट रुग्णाच्या नकळत होत असते. आपणाकडून घेण्यात आलेली फी दोन डॉक्टरांनी घेतलेली फी आहे याची जाणीव रुग्णास नसते. म्हणूनच अशा प्रकारे घेतली जाणारी फी आणि त्यातून दिला जाणारा हिस्सा हा व्यावसायिक नीतिमत्तेच्या विरोधी आहे आणि यात रुग्णाचे केवळ आर्थिक नुकसान होते असे नाही तर अनेकदा रुग्ण उत्तम दर्जाच्या वैद्यकीय सुविधांपासून आणि योग्य उपचारांपासून वंचित होऊ शकतो. कारण एकदा फीमधील हिस्सा मिळणार ही गोष्ट स्पष्ट झाल्यावर जो तज्ज्ञ आपल्या फीमधला जास्त हिस्सा देतो किंवा देईल, त्याच्याकडे रुग्ण पाठवणे ही गोष्ट साहजिक होते. त्यामुळे त्या डॉक्टरचा अनुभव आणि त्याच्याकडे असलेल्या सुविधा या गोष्टी गौण बनून जातात.
आणखी एका प्रकारे तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांच्याकडे रुग्ण पाठवणा-या डॉक्टर्सना त्यांचा अनैतिक मोबदला चुकवत असतात. या प्रकारात डॉक्टर्सना किमती भेटवस्तू दिल्या जातात. सण, वाढदिवस, वर्धापन दिन या नावाने हे केले जाते. विविध कारणे शोधून दिल्या जाणा-या ओल्या पार्ट्या ही गोष्ट आता वैद्यकीय क्षेत्रातली सर्वसाधारण बाब बनली आहे.
कट प्रॅक्टिससाठी आणखी एक क्षेत्र आता संघटितपणे पुढे आले आहे, ते म्हणजे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी. या लॅबोरेटरीज तीस टक्क्यांपासून पन्नास टक्क्यांपर्यंत कट रुग्ण तपासणीसाठी पाठवणा-या डॉक्टरांना देतात. डॉक्टर मंडळींनी रुग्ण पाठवावेत आणि त्यांचा कट त्यांना वेळेवर मिळावा म्हणून अशा लॅबोरेटरी या कामासाठी माणसे नेमतात. सभ्य भाषेत त्यांना पीआरओ म्हटले जाते. कॉर्पोरेट पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज हे कार्य तर अगदी उत्तम क्षमतेने पार पाडत असतात. त्यांचे दरही जास्त असतात. म्हणूनच आता पॅथॉलॉजिकल तपासण्यांसाठी अशा महागड्या लॅबोरेटरीजमध्ये रुग्ण पाठवण्याचा कल वाढला आहे. त्यात आर्थिक नुकसान रुग्णाचे होते.
कॉर्पोरेट हॉस्पिटल्सही आता या धंद्यामध्ये चढाओढीने उतरली आहेत. रुग्णाच्या केवळ फीवरच नव्हे तर त्याच्या वास्तव्यापासूनच्या सर्वच चार्जेसवरती ही हॉस्पिटल्स रेफर करणा-या डॉक्टर्सना कट देत असतात. या हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याला एक ठरवीक रकमेचा धंदा या हॉस्पिटल्सना द्यावा लागतो. तो न दिल्यास या डॉक्टर्सची संलग्नता जाऊ शकते, म्हणून असे डॉक्टर्स रक्कम वाढवण्यासाठी अनेक प्रोसिजर्स गरज नसताना करतात. इंडोस्कोपी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हे आता वारंवार ऐकू येतात, याचे कारण हेच आहे. या सर्वांमुळे रुग्णाला वैद्यकीय सेवा महाग झाली आहे. केवळ यासाठीच नव्हे तर व्यवसाय आणि धंदा यात फरक राहावा यासाठी आणि शतकांची वैद्यकीय व्यवसाय नीती अबाधित राहावी यासाठी कट प्रॅक्टिसवर कायदेशीर बंदी व ती अमलात आणण्यासाठी प्रभावी उपाय योजणे आवश्यक आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलने यासाठी तातडीने पावले उचलावीत म्हणून समाजाच्या सर्व स्तरांतून दबाव निर्माण केला.