आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी हे मोदींचा मुखवटा?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुब्रमण्यम स्वामी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. असा माणूस जेव्हा भारताच्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर असलेल्या व्यक्तीवर सातत्याने असभ्य भाषेत टीका करतो आणि आपले पंतप्रधान त्याबद्दल मौन बाळगत असतील तर सुब्रमण्यम स्वामींच्या मुखातून आपले पंतप्रधानच बोलत आहेत हाच निष्कर्ष निघतो. कारण आपले पंतप्रधान हे काही डॉ. मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे कमजोर पंतप्रधान नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी कोणी असावे हे ठरवणे हा सरकारचा अधिकार असतो. रघुराम राजन यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपते. त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय सरकार तत्त्वतः घेऊ शकत होते. मग सुब्रमण्यम स्वामींच्या तोंडून अशी असभ्य टीका का करवून घेण्यात आली? त्याची दोन कारणे संभवतात. पहिले कारण म्हणजे ही टीका असभ्य असली तरीही तिला भाजपमधील मोठ्या गटाला मान्य असलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे परिमाण होते. दुसरे कारण म्हणजे रघुराम राजन यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली अभूतपूर्व अशी प्रतिष्ठा. अशी प्रतिष्ठा आजवर कोणत्याही गव्हर्नरला नव्हती. तेव्हा त्यांना मुदतवाढ न देणे हे मोदी सरकारला न परवडणारे होते.
‘राजन यांना लाथ मारून बाहेर घालवा’ यासारख्या स्वामींच्या असभ्य विधानांकडे आपण दुर्लक्ष करूया. पण ‘राजन हे मनाने पूर्णतः भारतीय नाहीत, म्हणून ते गव्हर्नरपदी राहता कामा नयेत,’ या स्वामींच्या म्हणण्यात संकुचित (सांस्कृतिक) राष्ट्रवाद दिसतो. कारण राजन हे अमेरिकेतील विद्यापीठात शिकवतात आणि त्यांच्याकडे अमेरिकेचे ग्रीन कार्ड आहे याचाशी या टीकेचा संदर्भ आहे.

जगभरातून अमेरिकेत जाणारे अनेक लोक असतात आणि त्यांच्या प्रेरणादेखील भिन्न भिन्न असतात. आज अर्थशास्त्र, विज्ञान या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे अनेक भारतीय अमेरिकेत असतात याचे कारण अमेरिकेत त्यांच्या प्रतिभेला मोठा वाव मिळतो. अमेरिकेतील विद्यापीठात या सृजनशीलतेला वाव देणारा कमालीचा मोकळेपणा असतो. अमेरिकेत जाणारे दुसऱ्या गटातील लोक अर्थार्जनाच्या प्रेरणेने तेथे जातात (त्यांच्यावर टीका करण्याचा अजिबात उद्देश नाही). मॅडिसन स्क्वेअरला मोदींच्या भाषणाला गर्दी करणारे प्रामुख्याने या गटात मोडतात. तेदेखील अमेरिकेचे ग्रीन कार्ड होल्डर असतात. सुब्रमण्यम स्वामींना यात विसंगती दिसली नाही. (मोदींनाही ती नाही दिसली). पण राजन यांच्यासारखे लोक अमेरिकेत असले तरी एका अर्थाने जगाचे नागरिक असतात. २००५ मध्ये एका परिषदेत अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे प्रमुख अॅलन ग्रीनस्पॅन यांच्यासमोर उभे राहून राजन यांनी आज अमेरिकन अर्थव्यवस्था खूप जोमदार वाटत असली तरी ती लवकरच एका मोठ्या अरिष्टाच्या गर्तेत जाणार आहे, असे भाकीत केले. ते खरे ठरले.

या अरिष्टाचा सबंध जगाला फटका बसला. राजन सर्व जगाचे हीरो झाले. आज जागतिकीकारणामुळे सर्व जग एकमेकांशी अर्थकारणाने घनिष्ठपणे जोडले गेले आहे. त्यामुळे प्रत्येक देशातील केंद्रीय बँकेच्या प्रमुखपदी असलेली व्यक्ती कमालीची तज्ज्ञता असलेली असणे ही त्या देशाचीच नव्हे तर साऱ्या जगाची गरज बनली आहे. असा माणूस जो तज्ज्ञ आहे आणि राजकीय दबावापुढे न झुकणारा आहे, असा माणूस रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदी असणे हे भारतीयांचे भाग्य आहे, असे जगभरच्या या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ज्या दिवशी राजन यांनी आपले पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला त्याच दिवशी प्रसिद्ध झालेल्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने राजन यांना सेवामुक्त करणे ही मोदींची मोठी चूक ठरेल असे बजावले होते. स्वामींनी राजन यांच्यावर केलेल्या टीकेचाही या नियतकालिकाने समाचार घेतला. राजन यांच्याविरुद्ध असा हलक्या दर्जाचा प्रचार का करण्यात येत आहे, याचे एक प्रमुख कारण या नियतकालिकाने नोंदवले आहे. ते म्हणजे राजन यांनी बड्या भांडवलदारांची लाखो कोटी रुपयांची बुडीत कर्जे ही कर्जे आहेत आणि ती वसूल करायची आहेत हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना कबूल करण्यास भाग पाडले.

आपली ही सर्व कर्जे माफ होतील या आशेने बसलेल्या या उद्योग घराण्यांना राजन यांचा धोका न वाटला तरच नवल. राजन यांची खासियत म्हणजे त्यांनी व्याख्यानाद्वारे सोप्या भाषेत भारतीयांना बड्या उद्योगधंद्याच्या बुडीत कर्जाचा लहान उद्योगांना होणाऱ्या कर्जपुरवठ्यावर कसा विपरीत परिणाम होतो हे समजावून सांगितले. बँकांच्या या अकार्यक्षम कारभारामुळे रिझर्व्ह बँकेने जरी व्याजाचे दर कमी केले तरी ते खालपर्यंत झिरपत नाहीत हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला. अत्यंत सोप्या उदाहरणाद्वारे भाववाढ आणि कमी व्याजदर यांचे नाते सांगितले आणि भाववाढीचा फायदा श्रीमंतांना आणि ज्यांचे कर्ज थकलेले आहे अशा उद्योगांना कसा होतो आणि भाववाढीचा, कमी व्याजदराचा फटका मध्यमवर्गीयांच्या बचतीवर कसा विपरीत परिणाम करतो हे लोकांना सांगितले. हे सर्व अर्थातच भारतातील प्रस्थापित व्यवस्थेला परवडणारे नव्हते. त्यामुळे राजन यांना सोडून जाणे भाग पाडणे आवश्यक होते. त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय सरकार घेऊ शकले असतेच. पण तसे करण्याचे समर्थन करणे सरकारला अशक्य होते. त्यासाठी सुब्रमण्यम स्वामींचे हत्यार वापरण्यात आले आणि त्यांच्या असभ्य भाषेकडे पंतप्रधानांनी दुर्लक्ष केले आणि राजन यांना संदेश दिला.

व्यवस्थेबाहेरील मूल्यांवर निष्ठा असलेला माणूस स्थानिक हितसंबंधीयांचे जाळे तोडण्याची धमक दाखवण्याची शक्यता असते. २००५ ते २०१३ या काळात अमेरिकन विद्यापीठातील प्राध्यापक, अमेरिकेचे ग्रीन कार्ड असणारे स्टॅनले फिशर हे इस्रायलच्या केंद्रीय बँकेचे प्रमुख झाले आणि त्यांनी तेथील बँकेभोवती धनिकांचा पडलेला वेढा दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. ते यशस्वी झाले कारण त्यांना तेथील पंतप्रधानांचे पूर्ण सहकार्य लाभले. राजन यशस्वी नाही ठरले हे आपले दुर्दैव.

मिलिंद मुरुगकर
आर्थिक घडामाेडीचे विश्लेषक
milind.murugkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...