आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिल्स आणि बूनची ‘प्रादेशिक’ प्रेमकथा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मिल्स आणि बून’ या जगात सर्वात जास्त खपणा-या प्रेमकथा प्रकाशित करणा-या ‘हर्लेक्वीन यू. के. लिमिटेड’ या कंपनीने आपली पुस्तकं भारतीय प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा प्रकाशित करायला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला ते आपल्या दोन पुस्तकांची हिंदी भाषांतरे जूनअखेरीस प्रकाशित करतील. पाठोपाठ मल्याळी, तामिळ आणि मराठी भाषेत ते आपल्या काही पुस्तकांची भाषांतरे प्रसिद्ध करतील. त्यानंतर इथल्याच प्रादेशिक लेखकांकडून नव्या प्रेमकथा लिहून घ्यायची त्यांची योजना आहे.


‘मिल्स आणि बून’ हा ब्रॅँड गेल्या शंभर वर्षांहूनही अधिक काळ पुस्तके प्रकाशित करतो आहे. या पुस्तकांना मिळत असलेली लोकप्रियता अद्भुत आहे. आज जगातल्या 109 देशांमध्ये आणि 31 भाषांमध्ये ही पुस्तकं प्रसिद्ध होतात. दरवर्षी जवळपास दीड हजार पुस्तकं प्रकाशित केली जातात. जगातल्या बहुतेक पुस्तक विक्री करणा-या दुकानांत या पुस्तकांसाठी वेगळा बुकशेल्फ राखून ठेवलेला असतो. भारतामध्येसुद्धा इंग्रजी पुस्तके विकणा-या प्रत्येक दुकानामध्ये मिल्स आणि बूनच्या पुस्तकांसाठी वेगळा राखीव शेल्फ असतो आणि प्रत्येक महिन्याला प्रकाशित होणारी ही पुस्तकं भारतीय वाचकांमध्येसुद्धा आवडीने वाचली जातात.


या कादंब-यांचा नायक हा उंच, सावळा आणि देखणा असतो. तो आपल्या व्यवसायात अत्यंत यशस्वी झालेला करोडपती असतो. अत्यंत कठोर मनोवृत्तीच्या या नायकाच्या मनात कोणत्याही कोमल भावनांना थारा नसतो. हा नायक नायिकेला भेटतो. नायिका ही नायकाच्या तुलनेत सामान्य असते, पण अत्यंत भावनाप्रधान असते. पहिल्या काही भेटीतच नायिका नायकाच्या प्रेमात पडते. त्याचा कोरडेपणा तिला त्याच्याकडे अधिकच आकर्षित करू लागतो. ती त्याच्यामधल्या माणसाचा शोध घ्यायचा प्रयत्न करू लागते. त्यासाठी ती त्याच्या अधिक जवळ जाऊ लागते आणि त्याच्या प्रेमात संपूर्णपणे बुडून जाते. दरम्यान, नायकही तिच्या जवळ येऊ लागतो; परंतु त्याचं जवळ येणं हे प्रामुख्यानं शारीरिक पातळीवर असतं. नायिकेलासुद्धा त्याची कल्पना असते. तरीही त्याच्या शारीरिक जवळिकीला ती उत्कट प्रतिसाद देते. त्यामध्येच आपल्या स्त्रीत्वाचं पूर्णत्व आहे, अशा भावनेनं ती त्याला समर्पित होते. त्यानंतर ब-याच वेळा नायकसुद्धा नायिकेमध्ये भावनिक पातळीवर गुंततो, तर काही वेळा तो तिच्यापासून कायमचा दूर निघून जातो. या एका सर्वसाधारण कथासूत्राभोवती मिल्स आणि बूनच्या कादंब-या गुंफलेल्या असतात. या कथासूत्रामध्ये भावनिक गुंतवणुकीच्या आणि शारीरिक प्रणयाच्या वेगवगळ्या छटा रंगवलेल्या असतात. कथानकाची पार्श्वभूमी आणि लेखनाची शैली यामध्ये थोडेफार म्हणजे नेहमीच्या वाचकांना रुचेल इतपतच बदल केले जातात. आणि तरीही, मिल्स आणि बून महिन्याला शंभराहून अधिक पुस्तकं प्रकाशित करतं. आणि या कादंब-यांच्या जगभरात प्रत्येक सेकंदाला जवळपास चार प्रती विकल्या जातात. मिल्स आणि बूनला गेल्या शंभर वर्षांपासून मिळत असलेली ही प्रचंड लोकप्रियता हा मानस आणि समाजशास्त्रज्ञांसाठी स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरला आहे.


नवतरुणी आणि मध्यम वयाकडे झुकू लागलेल्या स्त्रिया हा मिल्स आणि बून कादंब-यांचा सर्वात मोठा वाचक वर्ग आहे. स्त्रियांमधली एखाद्या माणसाला आपलंसं करण्यासाठी वाटेल तो त्याग करायची असलेली तयारी, प्रेम मिळवताना आणि समोरच्या माणसाला सुधारताना ठेवावी लागणारी सोशिक वृत्ती, भावनिक गुंतवणुकीच्या अत्युच्च शिखरावर शारीरिक समर्पणासाठी झालेली तयारी आणि त्याची लागलेली ओढ आणि त्या समर्पणानंतर स्वत:च्या स्त्रीत्वाबद्दल वाटणारा अभिमान आणि कृतज्ञता या सगळ्या स्त्रीमनाच्या अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या भावनांचं प्रणयाच्या पातळीवर केलेलं हळुवार चित्रण हे या कादंब-यांच्या यशाचं सर्वात प्रमुख कारण आहे.


या कादंब-यांच्या कथानकामध्ये असणारा एकसुरीपणा, ब-याच कादंब-यांचा शेवट गोड करण्यासाठी केलेला अट्टहास आणि लिखाणाच्या शैलीतला सरधोपटपणा यावर समीक्षक टीका करत असतात, परंतु वाचकांना मात्र या गोष्टी म्हणजे या पुस्तकांची जमेची बाजू वाटते. या कादंब-यांची नायिका स्वत:ला नायकापेक्षा सतत कमी समजते. त्या दोघांच्या नातेसंबंधात तिची भूमिका नेहमीच दुय्यम असते. नायक तिची भावनिक आणि शारीरिक पातळीवर पिळवणूक करत असतो आणि ती त्यामध्ये एक प्रकारचा आनंद मानत राहते. आणि पुढे, त्याच्यासमोर समर्पित होऊन स्वत:ला धन्य समजते. अशा प्रकारे या कादंब-यांतून पुरुषाकडून होणा-या पिळवणुकीतच आनंद मानणा-या नायिकेच्या चित्रणावर गंभीर टीका केली जाते. भारतामध्ये मिल्स आणि बूनने आपल्या कादंब-यांची अधिकृत विक्री 2008पासून सुरू केली. ‘मिल्स आणि बून’ पुस्तके प्रकाशित करणारी ‘हर्लेक्वीन’ ही कंपनीसुद्धा या पुस्तकांकडे कलात्मक अभिजात साहित्य म्हणून न पाहता बाजारपेठेत उत्तम उठाव असलेले उत्पादन म्हणूनच पाहते.


त्यामुळेच ग्राहकांच्या मागणीप्रमाणे आपल्या पुस्तकात आवश्यक ते आणि आवश्यक तेवढेच बदल करते. त्यामुळेच पूर्वी इटालीयन अब्जाधीश किंवा अर्जेंटिनाचा पोलो खेळाडू असलेला नायक, अरबस्तानात अमर्याद पैसे येऊ लागल्यानंतर अरबी शेख बनला. आणि खास भारतीय वाचकांसाठी बनलेल्या पुस्तकात तो नायक बॉलीवूडमधला स्टार दाखवण्यात आला.
पण आता मिल्स आणि बूनला भारतातल्या त्यांच्या इंग्रजी वाचकवर्गाच्या पलीकडे जायचे आहे. इथल्या मध्यम आणि छोट्या गावात राहणा-या तिथल्या संस्कृतीत रुजलेल्या आणि मुख्यत्वे आपल्या प्रादेशिक भाषांमधली पुस्तके वाचणा-या वाचकांपर्यंत पोहोचायची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. या आपल्या वाचकांच्या प्रेम आणि प्रणयाविषयीच्या कल्पना मिल्स आणि बूनच्या पारंपरिक कल्पनांपेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत.


आजही आपण भावनिक पातळीवरचे प्रेम हे शारीरिक जवळिकीपेक्षा कितीतरी मोठे मानतो. मनात जपून ठेवलेले अव्यक्त प्रेम हे सफल झालेल्या प्रेमापेक्षा उदात्त समजतो. वेगवेगळ्या मर्यादांमुळे आपल्या हळव्या भावना मनातच ठेवून आपले आयुष्य जगणे ही आपल्या समाजासाठी स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या समाजाच्या भावनिक गुंतागुंतीचे पदर समजून घेऊन त्याला भावतील अशी पुस्तके देणे हे मिल्स आणि बूनकडून अपेक्षित आहे.